• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

SAFAR CINEMACHI / सफर सिनेमाची / PUSHPAK

!! ” सफर सिनेमांची “….!!

भारतीय सिनेमात खूप मोठ्या अंतराने एक ” सर्वभाषीक सिनेमा ” आला. अत्यंत अनोखा असा.सर्वभाषीक याचा अर्थ आपल्या देशातील कोणत्याही भाषेत तो सिनेमा डब झाला नाही पण प्रत्येक भाषेतील माणसाला समजेल , उमजेल असा तो सिनेमा तयार करण्यात आला. जेव्हा बॉलीवूड पूर्णपणे व्यावसायिक मूडवर होते आणि समांतर सिनेमाचे पहिले पर्व संपत आले होते अशा मोक्याच्या क्षणी हा ” प्रयोग ” करण्यात आला. हा प्रयोग करणे मोठे साहस होते. व्यावसायिक अपयशाची पक्की खात्री होती. पण तरीही हा सिनेमा पडद्यावर आला आणि आजही हिंदी आणि अन्य भाषेतील खरा सिनेरसिक हा सिनेमा आवर्जून आठवेल. हा सिनेमा सर्वभाषीक होता असे जे मी नोंदवतोय त्याची मुख्य व खरी बाजू ही आहे की , मूळातच या सिनेमात कोणतीच भाषा वारण्यात आलेली नव्हती . पूर्णपणे तो ” मुकपट ” होता. तरीही सिनेरसिकांना तो नीट समजला आणि आवडला देखील .सिंगीतम श्रीनिवास राव यांनी कथा पटकथा लिहिली , सिनेमाचे निर्माता बनले आणि दिग्दर्शन देखील त्यांनीच केले. तीन महत्वाच्या जबाबदाऱ्या घेणारे सिंगीतम श्रीनिवास राव यांना सिनेरसिकानी सलाम ठोकावा असा तो अजरामर सिनेमा म्हणजे ” पुष्पक “.

पुष्पक….कमल हसनच्या अजरामर अभिनयाचा आविष्कार असणारा हा सिनेमा आहे.जोडीला अमला ही अभिनेत्री आणि टिनू आनंद , समीर खक्कर आणि फरिदा जलाल आहेत. सिनेमात कोणतीही भाषा नसली तरी या सिनेमाला दोन ” टच ” आहेत . पहिला आहे कॉमेडी आणि दुसरा आहे गांभीर्य . होय , या दोन्ही टच एकत्र येऊन ” पुष्पक बनला. बेरोजगार तरुण एका चाळीत राहतोय एकटाच. दिवसभर नोकऱ्या शोधणे आणि अपयशी म्हणून परतणे. खिशात डिग्री आहे पण पैसा नाही . परिस्थिती अशी,आहे की , एका रस्त्यावरचा भिकारी त्या बेरोजगार तरुणाला त्याच्या पेक्षा जास्त पैसे जवळ असल्याबद्दल अक्षरशः चिडवतो. भिकारी त्या बेरोजगार तरुणापेक्षा श्रीमंत असतो. तो तरुण आपल्या परिस्थितीवर पूर्णपणे नाराज आहे आणि जीवनात हताश आहे. अशा परिस्थितीत एकदा एक श्रीमंत मनुष्य , अगदी पूर्णपणे बेवडा त्याला दिसतो. रस्त्याच्या एका कडेला त्या पडलेल्या श्रीमंत माणसाला अक्षरशः उचलून आपल्या चाळीतील खोलीत तो घेऊन येतो. त्या श्रीमंत मनुष्याच्या खिशात हॉटेलच्या रुमची चावी आहे. त्याला बांधून ठेवून आणि ती चावी घेऊन तो बेरोजगार आलिशान हॉटेलमध्ये प्रवेश करतो. त्याच्या रुममध्ये शिरतो आणि तिथे त्याला सगळे उंची सामान दिसते. कपडे , घड्याळ , बुट आणि चक्क पैश्याची सातआठ पुडकी. आपला जुना पेहराव तिथेच टाकून तो बेरोजगार युवक तिथल्या तिथे स्वतःचे रुपडं पालटतो. उंची बनतो. समोरच हॉटेल रुममध्ये एक जादूगार आहे.त्याच्या मुलगीवर बेरोजगार तरुण भाळतो आणि दोघात प्रेमसंबंध सुरू होतात. त्या श्रीमंत मनुष्याला घरात कोंडून ठेवून हा बेरोजगार त्याच्या जीवावर उंची राहणी करु लागतो. त्या श्रीमंत मनुष्याला सतत दारु पाजून बेहोश करून ठेवतो आणि आपण मजेचे आयुष्य जगतो. त्या श्रीमंत माणसाच्या पत्नीचे दुसऱ्या एका माणसासोबत शारीरिक संबंध आहेत.ती दुसरी व्यक्ती एका किलरला त्या श्रीमंत मनुष्याला ठार मारण्याची सुपारी देते. तो किलर हॉटेल मध्ये पोचतो. त्या श्रीमंत माणसाच्या रुममध्ये राहणाऱ्या बेरोजगार तरुणालाच आपले सावज समजून मारण्याचा प्रयत्न करत राहतो. पण अपयश येत राहाते.बेरोजगार तरुणाला त्या किलरची गोष्ट कळते आणि त्याचा पाठलाग तो करतो. त्याला सगळी गोष्ट कळून येते. ह्या उंची राहण्याची फोलता तेव्हा कळून येते जेव्हा त्याच्या समोर तो पहिला भिकारी , जो त्या बेरोजगार तरुणापेक्षा श्रीमंत असतो , तो बेवारस मृत्यू पावतो.त्याच्या प्रेताला उचलण्यासाठी म्युनिसिपालटीचे कर्मचारी पोचतात आणि त्या भिकारीच्या पोत्याखाली असणारे पैसे पाहून , प्रेत सोडून पैसे गोळा करु लागतात. ह्या दृश्याने त्या बेरोजगार तरुणाच्या मनात कालवाकालव होते आणि तो ” प्रामाणिक आयुष्य ” जगण्याचा निर्धार करतो. हॉटेल मध्ये परततो आणि आपले जुने कपडे घालतो. सर्व पैसे व वस्तु ठेवून देतो.जाता जाता एका चिठ्ठीत आपली खरी कहाणी लिहून त्या जादूगाराच्या मुलीला देतो आणि बाहेर पडतो. त्या श्रीमंत मनुष्याला उचलून पुन्हा त्याच जागेवर आणून सोडतो.सकाळ होताच तो श्रीमंत मनुष्य जागा होतो आणि रस्त्याच्या कडेला स्वतः ला पाहून ओशाळतो.हॉटेलवर पोचतो तर सगळे काही जैसे थे असते. त्याच्या बायकोला देखील पश्चात्ताप झालेला असतो.ती त्याला घेऊन जायला गाडी घेऊन आलेली असते. जादूगाराची मुलगी त्या बेरोजगार तरुणाच्या प्रामाणिकपणावर फिदा होते. जाता जाता आपल्या घरचा पत्ता व गुलाबफुल त्याला देते. त्याच्या हातून तो पत्ता निसटतो आणि चक्क एका मोठ्या गटारीत जाऊन पडतो. बेरोजगार तरुण पूर्णपणे एकटा पडतो ….सकाळ होताच एका कामाच्या अपेक्षेने इंटरव्यूह करता भल्या मोठ्या रांगेत उभा राहतो. ” पुष्पक ” सिनेमाची ही अप्रतिम गोष्ट आहे.लेखक , निर्माता व दिग्दर्शन सिंगितम श्रीनिवास राव यांची अजोड कामगिरी एक जबरदस्त सिनेमा आपल्याला देते.जादूगाराची मुलगी म्हणून अमला आणि किलर म्हणून टिनू आनंद खूपच लक्षवेधी. समीर खक्करने बेवडा श्रीमंत मनुष्य जबरदस्त साकारलाय. सर्वाधीक लक्षात राहतो तो प्रतिभावंत कमल हसन. बेरोजगार तरुणाच्या सर्व छटा आपल्या अभिनयातून तो सहजपणे उलगडतो.त्याचा हा अभिनय अगदी अविस्मरणीय बनलाय. कॉमेडी करता करता एका मोठ्या गांभीर्याला सिनेमा जेव्हा स्वतःला जोडून घेतो तेव्हा तो एकदम ” क्लासिक कल्ट ” बनतो. ” पुष्पक ” एक अप्रतिम असा अनुभव आहे.

भाषेच्या सहाय्याशिवाय आपली कलाकृती इतकी जिवंत उभी करणे ही सामान्य बाब नक्कीच नाही .पण हे शिवधनुष्य सिंगीतम रावने यशस्वीपणे उचलले.जोडीला कमलसारखा प्रतिभावंत कलावंत . बेरोजगार तरुणाईच्या प्रश्नाला इतक्या मुकपणे सामोरे जाणे आणि त्याच्यातील भीषणता दाखवणे खूपच कठीण होते.पैसे नाहीत म्हणून हाफ कटींग चहा घेऊन त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकून तो फुल कप चहा बनवण्याची क्लुप्ती , रस्त्यावर पडलेल्या आईस्क्रीमला आपल्या सावली रुपात हाताने धरण्याची विवशता , श्रीमंती जगण्याचा थाट काही दिवस अनुवण्याची लालसा , भिकारी पेक्षा आपण गरीब आहोत ही अवमानजनक भावना आणि भिकारीचे मरण पाहून डोळे उघडलेला आणि माणूसकी जागलेला तो बेरोजगार तरुण भारतीय बेरोजगार तरुणाईचे दाहक वास्तव समौर ठेवतो. शेवटी सारे काही निसटून जाते त्याच्या हातून आणि तो पहिल्यासाखाच नोकरीच्या रांगेत उभा राहतो तेव्हा सिनेमाचे गांभीर्य आपल्याला अंतर्बाह्य हेलावते.हा सिनेमा ” राष्ट्रीय पुरस्कार ” प्राप्त ठरला …तो याच त्याच्या बलस्थानामुळे. अजिबात चुकवू नये असा हा मुकपट असणारा पुष्पक सिनेमा…भाषेशिवाय बेरोजगारीच्या दाहक प्रश्नावर अतिशय खोलवर भाष्य करतो. तो केवळ अनुभवावाच.

उमेश सूर्यवंशी umeshsuryavanshi111@gmail.com

IMAGE SOURCE GOOGLE, PUSHPAK WIKIPEDIA IMAGE COPYRIGHTS @ Singeetam Srinivasa Rao, Mandakini Chitra productions

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !