• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

SAFAR CINEMACHI / सफर सिनेमाची / GARDISH

!! ” सफर सिनेमांची “… !!

” बापाचे जोडे मुलांच्या पायात बसू लागले की बाप धन्य होतो ” असं बरेचदा आपण ऐकलेल असते. यामध्ये तथ्य नक्कीच आहे.बाप आणि मुलाचे नाते बरेचदा अनोखे असते. बाप मुलासाठी काही स्वप्न पाहतो आणि जबाबदार मुलगा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतो.पण या जगात ” परिस्थिती ” नावाची एक गोष्ट असते. ही ” परिस्थिती ” त्या स्वप्नाला अनुकूल असेल तर स्वप्न साकार होते.आणि परिस्थिती प्रतिकूल असेल तेव्हा स्वप्न भंगतात. पण यामध्ये आणखी एक निराळी पायरी येऊ शकते. जे स्वप्न पाहिलेले असते त्याच्या पेक्षा अधिक मोठे कार्य आपल्या हातून परिस्थिती प्रतिकूल असताना घडत असते. फक्त याकरिता द्यावयाची किंमत देखील तितकीच मोठी असते. हिंदी सिनेमात एक छानसा सिनेमा या अशा आशयाचा झळकला. साल होते १९९३. प्रियदर्शन या नामांकीत आणि अभ्यासू दिग्दर्शकाने अत्यंत कौशल्याने हाताळलेला ” गर्दीश ” पडद्यावर झळकला. एक अत्यंत सुंदर असा सिनेमा सिनेरसिकाना पाहता आला.

गर्दीश….जॅकी श्रॉफ , अमरीशपूरी , मुकेश ऋषी यांच्या प्रमुख भुमिका असणारा सिनेमा . जोडीला फरीदा जलाल , दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या , सुरेश ओबेरॉय आणि अन्नू कपूर यांच्या जबरदस्त भुमिका असणारा ” गर्दीश ” आजदेखील सिनेरसिकाच्या डोक्यात पक्का बसलेला आहे. त्याची काही वेगवेगळी कारणे आहेत. पुरुषोत्तम साठ्ये या पोलिस हवालदाराचे एकच स्वप्न आहे.ते म्हणजे आपला मुलगा शिवा साठ्ये हा पोलिस इन्स्पेक्टर बनावा आणि आपण किमान एकदा तरी त्याला salute एक जबाबदार व अभ्यासू मुलगा आहे. आपण भले आपला अभ्यास भला असा याचा व्यवहार आहे. दोनतीन मित्राच्या समवेत तो शिक्षण घेत आहे.बापाचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनात बाळगून शिवा अभ्यासात मग्न आहे. एक सुंदर मुलगी त्याच्या प्रेमात आहे. या दोघांचे लग्न देखील ठरवले गेलेय.एके दिवशी पुरुषोत्तम आमदाराच्या मुलाची गाडी पकडतो आणि याचा राग मनात धरून तो आमदार त्याची बदली ” कालाचौकी पोलिस ठाणे , मुंबई “येथे करतो. सर्व कुटुंबासहीत पुरुषोत्तम तिथे हजर होतात. या एरीयात एक अत्यंत क्रूर व खतरनाक गुंड आहे बिल्ला जलानी.संपूर्ण पोलिस दल त्याला घाबरून आहे. इन्स्पेक्टर सैनी हा officer त्याच्या विरोधात लढू पाहतोय.एकदा बिल्लाच्या गुंडाना पुरुषोत्तम पकडतो आणि याचा राग येऊन बिल्ला जलानी भर रस्त्यावर पुरुषोत्तमवर हल्ला करतो.गर्दीत असणारा शिवा आपल्या बापाला होणारी मारहाण पाहू शकत नाही . तो थेट बिल्लाला अंगावर घेतो आणि झटापटीत शिवाकडून बिल्ला गंभीररित्या जखमी हौतौ.संपूर्ण वस्तीत आनंद होतो. तिथे राहणारी एक वेश्या देखील आनंदाने नाचते.तिच्या नवरा व मुलाला बिल्लाने जिवंत जाळलेले असते.बिल्लाला माराणारा शिवा तिथे हिरो बनतो.त्याच्या नावावर त्याचा भावोजी आणि काली नावाचा गूंड हप्तावसुली सुरू करतो. हे शिवाला ठाऊक नाही . घरी देखील बाप पुरुषोत्तम शिवाकडे ” अपराधी नजरेनं ” पाहतो. शिवाला वाईट वाटते . अशातच एका मागोमाग एक घटना घडत जातात आणि शिवा व बाप पुरुषोत्तम यांच्यात अंतर पडत जाते.बिल्ला ठीक होतो आणि सूडाने पेटून शिवाला शोधत राहतो. शिवाच्या वर्तनावर नाराज झालेले भावी सासरे शिवाशी नातै तोडतात. बिल्ला शिवाच्या घरी घूसून आईला , भावाला मारहाण करतो आणि बहिणीला उचलून नेतो. हवालदार बाप पुरुषोत्तम हतबल होतो. शेवटी शिवाला घेऊन बिल्लाकडे जातो आणि मुलगीला सोडवतो. इथे climax येतो. आणि तुफान हाणामारी नंतर बाप पुरुषोत्तम शिवाला आदेश देतो की , बिल्लाला मारुन टाक. शिवा बिल्लाला मारतो आणि आरोपी बनतो. बाप पुरुषोत्तमचे शिवाला इन्स्पेक्टर बनवण्याचे स्वप्न भंगते. पण शिवाने बिल्लासारख्या क्रुर मनुष्याचा केलेला वध बाप पुरुषोत्तमला सुखावतो. पुरुषोत्तम आपल्या साहसी मुलाला मनापासून salute ठोकतो. ” गर्दीश ” या अप्रतिम सिनेमाची ही कहाणी आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन याने अत्यंत खुबीने पटकथा बंदिस्त करून सिनेमा वेगवान बनवलाय. आर.डी.बर्मन यांचे संगीतात सजलेली काही गाणी ओठांवर वारंवार येत राहतात. फरिदा जलाल यांची आई , असराणी यांचा जावई आणि सुरेश ओबेरॉय इन्स्पेक्टर सैनी म्हणून शोभतात. अन्नू कपूर यांची जबरदस्त “भिकारी बॉस ” व्यक्तीरेखा कायमची स्मरणात राहते. वैश्येच्या भुमिकेत डिंपलने अप्रतिम अदाकारी पेश केलीय. तारीफ करावी लागते ती तिघांची. मुकेश ऋषी यांचा हा पहिला सिनेमा. बिल्ला जलानी तुम्ही कधीच विसरणार नाही इतका खतरनाक झालाय.अमरीशपूरी यांनी हवालदार बाप पुरुषोत्तम अक्षरशः अभिनयप्रतिभेने सजवलाय. त्यांच्या कारकीर्दमधील ही अत्यंत महत्त्वाची भुमिका आहे. जॅकी श्रॉफ या गुणवान नायकाने शिवा सहीसही उभारालाय. त्याचा आक्रोश तुम्हाला अंतर्बाह्य हेलावून टाकतो. एकूणच ” गर्दीश ” हा खूप छान अनुभव आहे.

हिंदी सिनेमातील फायटींग सीन तुम्हाला आवडत असतील तर ” गर्दीश ” चुकवू नका. अत्यंत वास्तववादी व जमिनीशी प्रामाणिक राहून हे सीन साकारालेत. ही फायटींग जणू काही खरोखरीच घडतेय अस फिलींग होत राहते. गाणी सुंदर आहेत. अभिनय दर्जेदार आहे. कथा आणि पटकथेत जबरदस्त बंदिस्तपणा असल्याने सिनेमा रंगलाय छान . सिनेमाचे चित्रण अत्यंत योग्य अशा ठिकाणी करून दिग्दर्शक प्रेक्षकांना थेट सिनेमात घेऊन जातो. कुठंही अवास्तवपणा आढळत नाही हे विशेष . आपल्या आजूबाजूला या सिनेमाचे चित्रिकरण झालय अस वाटत रहावे असा अनुभव गर्दीश देतो. बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याचे दर्शन गर्दिश घडवतो. स्वप्न हातातोंडाशी आलेले असताना दुनिया अर्थात परिस्थिती या बापलेकांना अशी मात देते की बस्स. पण सिनेमाचा कल्पक दिग्दर्शक आणि पटकथा लिहिणारा प्रियादर्शन इथे नकारात्मक भावना टाळतो आणि सिनेमा सकारात्मक पेश करतो. याचकरता इन्स्पेक्टर होण्याऐवजी आपल्या मुलाने केलेले कार्य लाखमोलाचे समजून हवालदार बाप जेव्हा मुलाला salute ठोकतो तेव्हा ” गर्दीश ” एका जबरदस्त उंचीवर पोचतो. स्वप्नाला किती वेगळे आयाम लाभू शकतात हे आपण पाहतो. ” गर्दीश ” याचकरता महत्त्वाचा आहे.

उमेश सूर्यवंशी umeshsuryavanshi111@gmail.com

IMAGE SOURCE GOOGLE, POSTER COPYRIGHTS @ R MOHAN, SHOGUN FILMS

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !