• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

SAFAR CINEMACHI / स स “सिनेमा”चा सफर सिनेमाची ! / DO BIGA JAMEEN

स स “सिनेमा”चा सफर सिनेमाची !

शंभू महातो या माणसाला तुम्ही ओळखता ना ? ओळखत असाल तर छानय पण ओळखत नसाल तर मग या माणसाची ओळख करून घ्यावीच लागेल. तुमच्या जवळ आरसा असेल तर त्यामध्ये स्वतःचा चेहरा पहा , तुम्हाला ” शंभू महातो ” भेटण्याची शक्यता अधिक आहे. किंवा तुमच्या आसपासच्या कोणत्याही गरीब मनुष्याला आठवून पहा तोच शंभू महातो असे समजा. शंभू महातो … हे भारतीय व्यवस्थेत गरीबीने छळलेल्या आणि भांडवलदारी व्यवस्थेच्या हव्यासाने पोळलेले एक फिल्मी परंतु वास्तवाच्या खूपच जवळचे असे पात्र आहे. हा शंभू महातो तुम्हाला भेटेल तो १९५३ सालच्या एका महान सिनेमात . सिनेमाचे नाव आहे ” दो बिघा जमीन “.

दो बिघा जमीन….हा अत्यंत वास्तवदर्शी असा सिनेमा होता. शंभू महातो या अल्पभूधारक शेतकऱ्याचा त्याच्या जमिनीकरता करावा लागणारा संघर्ष इथे चित्रीत केलाय. शंभू महातो याची जमीन गावातील जमीनदार हरमन सिंह याला आपली फॕक्टरी उभी करण्यासाठी हवी आहे. शंभू महातोला दिलेल्या काही रुपयांच्या मोबदल्यात , व्याजावर व्याज चढवत रक्कम फुगवून शंभो महातो करता सापळा रचलाय जमीनदाराने. कायदा देखील शंभू महातोच्या विरोधात जातो आणि जमीनदाराची रक्कम चुकवण्याकरता तो कोलकत्ता महानगरात काम शोधायला आपल्या लहान मुलासमवेत येतौ. इथे तो हातरिक्षा ओढून पैसे कमवू पाहतो , मुलगा बुट पॉलीश करतो. तिकडं गावाकडे त्याचा बाप चक्क वेडा होतो आणि बायको त्याला शोधत शहरात येते. संपूर्ण कुटूंबाची ही ससेहोलपट थांबत नाही …थांबते तेव्हाच जेव्हा शंभू महातोच्या जमिनीवर जमीनदार कायदेशीर कब्जा करतो आणि फॅक्टरी उभी राहू लागते. शंभू आपल्या बायको व मुलासहीत त्या जागेवर पोचतो आणि ” मूठभर माती ” उचलतो. पण सुरक्षारक्षक ती देखील माती घेऊ देत नाही . शंभू आपल्या परिवारासहीत चालू लागतो.अशी ही थोडक्यात कथा. दो बिघा जमीन हा एकाचवेळी वास्तव पातळीवर जगतो आणि कलात्मक परिणाम साधतो.

बलराज सहानी नावाच्या जबरदस्त अभिनेत्याने शंभू महातो अक्षरशः जिवंत केलाय. भुमिकेच्या खोलात शिरताना बलराजजीनी कोलकत्ताच्या हातरिक्षा वाल्यांकडून रिक्षा ओढण्याची कौशल्य शिकून घेतली. याचाच परिणाम संपूर्ण सिनेमाभर राहतो आणि दमदार अभिनयाला कसदार सरावाची जोड मिळत एक दर्जेदार पात्र जिवंत उभे राहते. यात भर पडते ती बिमल रॉय नावाच्या प्रतिभावंत दिग्दर्शकाची. आपल्या अजोड दृष्टीने बिमलदांनी ” दो बिघा जमीन ” चे अक्षरशः सोने करून दाखवले. १९५४ साली राष्ट्रीय पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली आणि फिल्मफेअर अवॉर्ड देखील सुरू झाले. या दोन्ही महत्त्वाच्या पुरस्कारावर छाप होती ती एकमेवाव्दितीय ” दो बिघा जमीन ” ची. सर्वोत्तम सिनेमा म्हणून हाच चित्रपट गौरवला गेला.आणि शंभू महातो भारतीय माणसाच्या हृदयात कायमचा विराजमान झाला.

उमेश सूर्यवंशी umeshsuryavanshi111@gmail.com

IMAGE SOURCE, GOOGLE, COPYRIGHTS OF POSTER @ BIMAL ROY

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !