जगण्याची कला शिकवणारा कथारूपी डोस: कथा वास्तवातल्या
अनुभव हाच जीवनाचा खरा शिक्षक आहे या सुविचाराप्रमाणे दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आपल्याला जीवनाच्या रहाटगाडग्यात कसे जगावे? याचे उत्तर शिकवत असतात. याच आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या घटनांतून कथाबीज शोधून जीवन जगण्याची कला शिकवण्याचा डोस प्रा.विजय काकडे लिखित ‘कथा वास्तवातल्या’ या कथा संग्रहातून वाचकाला मिळतो.
मुळात व्यवसायाने प्राध्यापक असलेले स्वतः ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतांना अनेक विद्यार्थी घडवतांना आलेले अनुभव प्रा. काकडे यांनी अगदी सुटसुटीत नि साचेबंद स्वरूपात बावीस कथांच्या माध्यमातून हा कथासंग्रह वाचकांच्या भेटीस आणला आहे. रंगतदार प्रकाशनची आकर्षक छपाई आणि मा. विजय जोगमार्गे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले समर्पक मुखपृष्ठ यातून कथासंग्रहाला कमालीची शोभा आली आहे.
एका प्राध्यापकाला आलेले अनुभव कथा स्वरूपात मांडत असतांना लिखाणातून व्यक्त झालेली स्पष्टता कमालीची वाटते.घराचा सातबारा मिळवण्याकरिता वारंवार सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली गेलेली हेळसांड आणि पैसे खिशात घालताच काही मिनिटाच्या आत सातबारा देण्याची पद्धत यांवर ‘सातबारा’ या कथेतून अशा स्वरूपाच्या भ्रष्टाचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर अगदी सडेतोड टीकास्त्र लेखकांनी सोडले आहे.
आयुष्यातील जवळपास चोवीस वर्षाच्या अध्यापनाच्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या मानसिकता ओळखून त्या सहज टिपण्याची विशेष कला लेखकांना चांगल्याप्रकारे अवगत आहे एकीकडे ‘ज्ञान मंदिरातील सौदा’ या कथेत पेपर काढण्यासाठी शिक्षकांना प्रलोभने देणाऱ्या विद्यार्थ्याची मानसिकता तर दुसरीकडे एक विषय गेल्याने आपल्या वागण्यात बदल करून शेवटी तणावात आत्महत्या करणारी ज्ञानेश्वरीची मानसिकता लेखकांनी तितक्याच ताकदीने रेखाटली आहे.
हा कथासंग्रह वाचतांना आणखी एक मुद्दा वाचकाला लेखकाच्या लिखाणाच्या प्रेमात पाडतो तो म्हणजे अगदी तंतोतंत रेखाटलेल्या मानवी स्वभावाचे विविध पैलू. एकीकडे ‘आपली माणसे’ या कथेत ऐन अडचणीच्या वेळी साथ न देणाऱ्या माणसांची प्रवृत्ती दिसते तर ‘सावित्री’ या कथेत आपल्या पत्नीला कोरोना झाल्याने अगदी नाव बदलून तिला धिक्कारणारा संपत दिसतो तर ‘खटारा गाडी’ या कथेत ज्या गाडीच्या भरवशावर आपल्या आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या तिला शेवटपर्यंत आपल्या जवळ ठेवत तिच्या विषयीची कृतज्ञता बाळगणारा रमेश दिसतो. तर ‘यंदा इलेक्शन होणार’ या कथेत गावात बिनविरोध होणारी निवडणूक उधळून देऊन दोन्ही पक्षात भांडणे लावून पैसे लुबाडणाऱ्या सदू नि गणप्या सारखे मानवी स्वभाव दिसून येतात. ‘लेखकाची किंमत’ या कथेतील प्रा. चोरगे यांचा स्वभाव तर आजच्या साहित्यक्षेत्रातल्या बाजार दाखवतो. ‘कोविड’ ही विज्ञान कथा आजचे भीषण वास्तव रेखाटते.
मानवी जीवन जगत असताना शिकण्याला कधीच वय नसते हा सुंदर संदेश ‘आयुष्याची शाळा’ कथेतून लेखक देतात. ‘नाणीचा निर्णय’ या कथेतली नाणी अडाणी असूनसुद्धा आपल्या मुलाला वीलगीकरणात पाठविण्याचा निर्णय घेतात आणि खरंतर आजच्या प्रत्येक घरात अशा नाणींची गरज आहे हा संदेश या कथेतून लेखक देतात.
यासोबत ‘नोकरीतील स्पर्धा’, ‘स्त्री पुरुष समानतेचा प्रयोग’,’बिजली’, इमानदारी या कथेतली पात्र वाचकाच्या मनात कायम स्वरूपी घर करून जातात आणि वाचकाला हे असे तर आपल्यासोबत देखील घडले आहे. या कथेचा नायक जणू मीच आहे की काय? असे वाटायला लागते. हेच प्रा. विजय काकडे यांच्या सारख्या दमदार वास्तव रेखाटन करणाऱ्या लेखकाचे वैशिष्ट्य आहे.
एकंदरीत एकूण कथासंग्रह कथा लिखाणाच्या कसोटीला शतप्रतिशत खरा उतरला आहे. सर्व वाचकांनी तो आवर्जून वाचावा व जीवनमूल्य शिकवणारा हा डोस नक्की घ्यावा असे विनम्र आवाहन करतो.असेच कसदार साहित्य प्रसवत सरांची लेखनी अशीच बहरत राहो.
अशा आदरणीय विजय काकडे सरांना साहित्यिक प्रवासासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद
कथा वास्तवातल्या
लेखक प्रा. विजय काकडे
रंगतदार प्रकाशन,ठाणे
स्वगत मूल्य १५०/- रू
– प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला