भारतीय संस्कृती असे मानते की, ज्याला गुरु नाही त्याला गती नाही. गुरूचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही मोठे आहे म्हणूनच पहिला नमस्कार हा गुरूला असतो. जीवनाला आकार देणाऱ्या गुरूचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशीच नव्हे तर नित्य करावे.
आपल्याला ज्ञान देतो, सन्मार्ग दाखवतो तो गुरू. आपले कुठे चुकले कुठे अडले तर त्यावेळी योग्य मार्ग दाखवतो तो गुरू. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत ‘गुरू’ या शब्दाचे फार मोल आहे. ज्याला गुरू नाही त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचाही आधार नाही अशी आपली संस्कृती मानते म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूचे स्मरण आणि पूजन याला खूप महत्त्व आहे.
गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाते. आपल्या ठायी असलेल्या अज्ञानाचा नाश करून तिथे ज्ञानाच्या दीपाला प्रकाशित करण्याचे काम गुरू करतात,म्हणूनच अशा गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्या ऋणांतून अंशत: तरी मुक्त व्हावे यासाठी गुरुपौर्णिमा पुरातन काळापासून साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते. कारण व्यासांना आद्य व सर्वश्रेष्ठ गुरू समजले जाते. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. असे म्हटले जाते, की शब्दसाहित्याचे अमाप भांडार व्यासांनी रचले. त्यांनी एकूण १८ महापुराणे, १८ उपपुराणे आणि महाभारत हे महाकाव्य रचून ज्ञानाचे भांडार खुले करून दिले. व्यासांनी हाताळला नाही असा एकही विषय नाही. त्यामुळे व्यासांना ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ असे म्हटले आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासांच्या प्रतिमेची पूजा करतात.
असेही म्हटले जाते की, आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यासमुनी शंकराच्या रूपात अवतीर्ण झाले म्हणून या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा पडली. पुराणकाळापासून गुरूच्या पूजेचे मोठे महत्त्व आहे. असे म्हणतात की, भगवान दत्तात्रेयांनीही २४ गुरू केले. त्यांनी अविश्रांत न कंटाळता परिश्रम करण्याची मुंगीची प्रवृत्ती पाहून तिलाही गुरू मानले. म्हणूनच ‘जो-जो ज्याचा घेतला गुण तो तो म्या गुरू केला जाणा’ ही शिकवण पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. आपल्या भारतात गुरु-शिष्यांच्या काही प्रसिद्ध जोड्या होऊन गेल्या. कृष्ण-अर्जुन, धौम्य ऋषी-आरुणी, द्रोणाचार्य-एकलव्य यांपासून रामकृष्ण परमहंस – विवेकानंद अशा काही गुरुशिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यातल्या प्रत्येक शिष्याने आपल्या गुरूवरची जाज्वल्य निष्ठा, भक्ती कोणत्या ना कोणत्या रूपाने व्यक्त केली. या संदर्भातील कथाही प्रसिद्ध आहेत.
सानेगुरुजींनी त्यांच्या आईला गुरू मानले होते. त्यांना एकदा त्यांच्या मित्रांनी विचारलं, “तुमच्यात ही सेवावृत्ती कशामुळे निर्माण झाली?” तेव्हा सानेगुरुजींनी उत्तर दिले, “ही सगळी माझ्या आईची देणगी आहे, आई हाच माझा गुरू, माझ्या आईने मला गाई-गुरांवर, पाखरांवर, झाडाझुडपांवर प्रेम करायला शिकवले. तसेच कोंड्याचा मांडा करून खावा; पण गरिबीतही स्वत्त्व आणि सत्व न सोडता कसे राहावे, हे तिनेच मला सांगितले.” आईची ही शिकवण सानेगुरुजींना जन्मभर उपयोगी ठरली आणि ते आपल्या वागण्यातून आईला कसे समाधान मिळेल, हे पाहत राहिले, तसे वागले. आणि त्यातून त्यांची गुरूबद्दलची म्हणजे आईविषयीची श्रद्धा व भक्तिभाव व्यक्त झाला.गुरुवरची आपली निष्ठा किंवा भक्ती व्यक्त करण्यासाठी सत्कार, फुलं किंवा नारळ म्हणजेच श्रीफळ आणि गुरुदक्षिणा यांचाच आधार घ्यावा लागतो असे नाही. तर आपल्या प्रामाणिकपणातून, यशातून, चिकाटीतून आणि कर्तव्यातून आपण गुरूवरची आपली निष्ठा व्यक्त करू शकतो.
आपल्याकडे पारंपरिकरीत्या गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा खूप ठिकाणी प्रघात आहे. या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून पाटावर धूतवस्र अंथरतात. त्यावर पूर्वेकडून पश्चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे गंधाने बारा रेघा काढतात. त्याला व्यासपीठ असे म्हणतात. त्यानंतर ब्रह्मा, पराशर ऋषी, व्यास, शुक्र, गोविंदस्वामी, शंकराचार्य यांना त्या व्यासपीठावर आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. पण या व्यतिरिक्तही गुरूविषयी कृतज्ञता दाखवण्याचे अनेक मार्ग आहेत. गुरु-शिष्याचं नाते आजच्या काळात आणि आजच्या काळासाठीही तेवढेच महत्त्वाचे आहे. वैदिक युगात विद्या ग्रहण करायला शिष्य गुरूंकडे आश्रमात जात. त्या गुरूंकडे शिष्य ठराविक कालावधीत शिकत आणि विद्या ग्रहण केल्यानंतर त्यांना गुरुदक्षिणाही देत. आता काळ बदलला आहे. आश्रम किंवा पूर्वीसारख्या पाठशालाही नाहीत, तरीही रुपौर्णिमेचे महत्त्व कमी झालेले नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आध्यात्मिक गुरूंचीही काहीजण पूजा करतात.
शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षकांविषयी विद्यार्थी आदर व्यक्त करतात. त्यांना फूल देऊन, नमस्कार करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. आई-वडील तर आपल्याला लहानपणापासूनच घडवत असतात. आपल्याला वेळोवेळी सदाचाराची शिकवण देत असतात. घरात आपले एकप्रकारे अनौपचारिक शिक्षण होत असते. त्यामुळे आई-वडिलांना गुरुस्थानी मानून त्यांची पूजा करण्याचीही पद्धत आहे. त्याचबरोबर आपल्याला सतत ज्ञान देणाऱ्या पुस्तकांचीही पूजा या दिवशी केली जाते. कलाकार त्यांना शिकवणाऱ्या गुरुविषयी याच दिवशी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात.
अलीकडे आध्यात्मिक गुरूंचे महत्त्व आपल्याकडं वाढले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या आध्यात्मिक गुरुंच्या प्रवचनाचे कार्यक्रम होतात, त्यांचे आश्रम भाविकांसाठी खुले होतात. आजकाल एकाने गुरूमंत्र घेतला म्हणून अनुकरण करत दुसरेही गुरू करतात, गुरूमंत्र घेतात. मात्र असे अनुकरण करण्याऐवजी आधी योग्य शिष्य बनण्याचा प्रयत्न करावा, मग गुरू-शिष्याचा शोध घेत येतात. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो. तो मोठा होत असताना शिक्षक, आई-वडील या सर्वांचे चांगले संस्कार त्याच्यावर झाले तर तो जीवनात यशस्वी होतो. म्हणूनच मातीच्या गोळ्यांना घडवणाऱ्या या व्यक्ती गुरुस्थानी असतात. संकटात, सुखात-दु:खात त्या सतत आपल्याबरोबर असतात. संकटांचा सामना कसा करायचा, याची शिकवण त्या देत असतात, आयुष्यात उभे राहायला शिकवतात. हे एका कवितेतून सांगितलं आहे. गुरुविण कोण दाखवील वाट ? आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट।।
गुरुपौर्णिमा भारतभर साजरी केली जाते. या दिवशी देशातल्या शंकराचार्यांच्या सर्व पीठांमध्ये मोठा सोहळा असतो. श्रृंगेरी, द्वारका, जगन्नाथपुरी, ज्योतिष्पीठ त्याचप्रमाणे सर्व धर्मसंस्थातून व्यासपूजेचा मोठा उत्सव असतो. दक्षिण भारतात व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेला करतात.
गुरुपौर्णिमा या सणाला सार्वत्रिकतेचं महत्त्व आहे. भारतभरात गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व आहे. हेच आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर आपल्या गुरूंचे अवश्य स्मरण करावे; पण त्याची शिकवण आचरणात आणली तर ती फार मोठी गुरुदक्षिणा ठरेल.
-शीतल नलावडे