हिंदू सणाचे वैशिष्ट्य असे आहे की, प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे, अर्थ आहे. हिंदू संस्कृती विचारानुसार मनुष्य योनीत जन्माला येणे म्हणजे जन्म-मरणाच्या चक्रातून कायमची सुटका करून घेण्याची ती एक मोठी संधी असते. मनुष्य योनीत जन्माला आलेल्या जीवाने या संधीचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेतला तर जन्म-मरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते अन्यथा तो जीव पुन्हा त्याच त्या फेऱ्यात फिरत राहतो.
अक्षय्यतृतीया या दिवसाचे महत्त्व असे की या दिवशी भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र याप्रकारे दानधर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मानवाची सुटका होऊ शकते अशी समजूत आहे. मात्र अक्षय्यतृतीया चा अर्थ याहून व्यापक आहे. हा दिवस खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कृतज्ञता कोणाविषयी? तर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांच्या विषयी; कारण त्यांच्या सहाय्यानेच मनुष्य देहाला चैतन्य प्राप्त होते आणि कृतज्ञता आपल्या पितरा विषयी; कारण यांच्यामुळेच आपल्याला मनुष्य देहाचं दान मिळालेलं आहे.
म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी इतरांच्या स्मरणार्थ अन्नदान, जलदान, वस्त्रदान करण्यात येते. वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय्यतृतीया साजरी करण्यात येते. या काळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भुत असते. चैत्राचे बोट धरून आलेला वसंत ऋतु वैशाखात जणू तारुण्याने मुसमुसलेल्या असतो. वैशाखाच्या कडक उन्हाचा चटका जाणवणार नाही अशा तऱ्हेने निसर्गरंग, रस, गंधाने फुलून आलेला असतो. करड्या-तपकिरी फांद्या-खोडातून हिरव्या रंगाचे असंख्य फुलारे सृष्टीची नवलकथा सांगण्यासाठी- बघण्यासाठी माना वर करून डोकावताना दिसतात. रानफुले लगडलेल्या अमराईतील लगडलेल्या कैऱ्यांच्या सुवासाने वातावरण गंध भारित झालेले असते. अर्थात या निसर्गाचा हा खेळ आवर्जून बघितला तरच जाणवतो. तरच मग कोकिळ स्वरही कानावर पडतो. अवघी सृष्टी वैशाख उन्हात भाजून निघालेली असते घामेजलेल्या थकल्या-भागल्या जीवांना गार गार पाण्याचा थंडावा हवा असतो म्हणूनच वैशाखातले जलदान फार महत्त्वाचे मानतात.
वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेता युगाचा प्रारंभ झाला त्याच प्रमाणे चार युगान पैकी सत्य युगाची सुरुवात ही याच दिवशी झाली म्हणूनही हा अतिशय शुभ दिन मानला जातो. आपल्या संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे,
अक्षय याचाच अर्थ कधीही क्षय न होणारा नाश न पावणारा असा आहे म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभ कार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगती होत जाते. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी अगदी गुंजभर वा एक ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यात सातत्याने वाढ होते.
म्हणजे अधिक सोने खरेदी करण्याची ऐपत निर्माण होते अशी समजूत आहे म्हणूनच अक्षय्यतृतीयाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते. धार्मिक रीतिरिवाजानुसार अक्षय्यतृतीयेच्या दिवशी आपले दिवंगत आई-वडील आजी-आजोबा आप्तस्वकीय आणि पूर्वज यांच्या स्मरणार्थ ब्राह्मणांना जलकुंभ दान करतात. जलदानाच्या बाबतीत मारवाडी जैन आणि गुजराती वगैरे समाजाचे अनुकरण करण्यासारखे आहे या समाजातील बरेच दानशूर, श्रीमंत यालाच (प्रपा दान) म्हणतात प्रपा म्हणजे पाणपोई व्यक्ती गावा-शहरात ठीक ठिकाणी पाणपोया उभारतात.
खरे म्हणजे याच प्रमाणे शहरातील गृह संस्थांनी एकत्र येऊन शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी उन्हाळ्यात व कायमस्वरूपी पानपोई उभारणीसाठी अत्यल्प अर्थसहाय्य केले तरी त्यातून फार मोठे काम घडू शकेल आपल्याकडून कळत-नकळत जे पाणी वाया जाते आणि या वाया जाणाऱ्या पाण्यासाठी आपण जो खर्च करतो तोच या कार्याकडे वळवला तर अनेक तहानलेल्या जीवांची तहान भागू शकेल याच प्रमाणे गाई-म्हशी कुत्री मांजरी आणि पक्षी यांच्यासाठीही योग्य ठिकाणी पाणवठे उभारण्याची गरज असते जलदान अन्नदानाच्या निमित्ताने गावातील शहरातील अनाथालये वृद्धाश्रम शिक्षण संस्था रूग्णसेवा संस्था यांना थोडीफार आर्थिक मदत करणे हा सुद्धा अक्षय्यतृतीया सण साजरा करण्याचा एक मार्ग ठरू शकतो.
वैशाख महिन्यात जिकडेतिकडे ऊसाची गुर्हाळे जोरात चालू असतात संपूर्ण वर्षात सर्वाधिक प्रमाणात चैत्र वैशाख या दोन महिन्यात उसाचा रस पिण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली आढळते परंतु संपूर्ण वर्षात उसाचा रस कोणत्या एकाच दिवशी सर्वाधिक पिला जात असेल तर तो दिवस आहे अक्षय्यतृतीया कारण याच दिवशी जैन संप्रदायाचे आद्य तीर्थंकर ऋषभदेव यांनी हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याच्याकडे उसाचा रस प्राशन करून आपला उपास सोडला आणि त्या राजाची भोजन शाला अन्नधान्य तुडुंब भरून अक्षय झाली,अशी कथा आहे. त्यामुळे जैन संप्रदायाचे लहान-थोर या अक्षय्यतृतीया दिवशी गोरगरिबांना, इष्टमित्रांना उसाचा रस देऊन तृप्त करतात. म्हणून अक्षय्यतृतीया हा गुऱ्हाळासाठी सर्वाधिक खपाचा दिवस आहे.
अक्षय तृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. तरी विदर्भात या दिवसाला दिवाळी सारखे महत्त्व आहे. पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घराघरातून अन्नदान केले जाते. पुरणपोळी, चिंचेचे सार, कानवले, आंब्याची डाळ, कवठाची चटणी, पन्हे, डाळवडे, कढी, भात-वरण, भाजी-भजे असा साग्रसंगीत बेत असतो. गरीबातला गरीब माणूस ही आपल्यापरीने अक्षय्यतृतीया चा सण साजरा करतोच. या दिवशी शेतकरी नांगरणी ला सुरुवात करतात. नांगराची पूजा करून शेतीच्या कामांना सुरुवात करण्यात येते.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पेरलेले बी, केलेली पेरणी दाम दुप्पट उत्पन्न देते, कीड अगर रोगराईची त्या पिकाला बाधा होत नाही अशी भारतीय शेतकऱ्यांची श्रद्धा असते म्हणून कृषी क्षेत्राच्या दृष्टीने शेती करणारे अक्षय्यतृतीया हा अक्षय्य-उदंड पीक देणारा म्हणून पेरणी चा मुहूर्त मानला जातो. काळाच्या ओघात आता या दिवसांचे महत्त्व हळूहळू ओसरत चालले आहे. परंतु निसर्ग, पितर, पशु-पक्षी, शेती यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी जमेल तेवढा प्रयत्न करावा असेच आपल्या संस्कृतीचे सांगणे आहे. हेच अक्षय्यतृतीयेचे महत्त्व आहे
wachankatta.com