• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

SAKHI / सखी

सखी,
एकुणात ना, गुंता हा प्रकारच मुळी जीवघेणा आहे. आपल्याला माहिती असतं, आपण त्यात फसणार आहोत, पण तरीही आपण गुंतत जातो.. स्वत:लाच अडकत चाललेलं पाहत राहतो आणि गंमत म्हणजे, अशा वेळी असं फक्त पाहत राहण्याशिवाय आपल्या हातात काहीही नसतं… फक्त आणि फक्त गुंतत जाणं, एवढं आणि एवढंच आपल्याला हातात असतं कितीतरी वेळा…
जे वेळीच या अशा गुंत्यातनं सुटू शकले, ते खरंच थोर… तेवढे थोर आम्ही नाही… गुंतूनी गुंत्यात सारा, पाय माझा मोकळा, हे ज्यांना जमतं त्यांनाच जमतं… आम्हाला नाही… म्हणूनच एकसारखे गुंतत जातो आम्ही… कळत-नकळत… कळेपर्यंत पार जंजाळ झालेलं असतं… मग आपल्या हातात दोनच पर्याय उरतात… झालंच शक्य, तर… त्या गुंत्यात तसंच गुंतत जाणं… आणि दुसरा… जीवाच्या आकांतानं धडपडत त्या गुंत्यातून बाहेर पडणं… आणि त्या गुंत्याच्या शक्य तेवढ्या दूर पळणं… आमच्या बाबतीत पहिला पर्यायच अधिक जवळचा राहीलाय आजपर्यंत… मुद्दामहून असं नाही, पण स्वभावाला काही करु शकत नाही, असं म्हणतात. आम्ही त्याचा पुरावाच देतो.
गंमत काय होते ना, सखी, गुंता दिसत असतो, त्यात गुंतायचं नाही, हेसुध्दा मनाला बजावत असतो… पण पायांना त्याची गंधवार्ताही नसते… पाय कधीचेच आपोआप त्या गुंतवळीकडे चालू लागलेले असतात आणि आपल्या लक्षात येईपर्यंत आपले पाय त्या गुंतवळीत अडकलेलेही असतात. मग मात्र, मन पिसाट माझे झुलते रे…. अशी अवस्था होते आणि आपल्या हातात खरंच काही राहत नाही. पण हा गुंता मोहरवून टाकतो, एवढं मात्र नक्की… त्या मोहरण्यानं सगळं काही दुस-या क्षणाला विसरुन जातो आपण… पण भीति वाटते कधी कधी… हे मोहरणं असंच राहील कायम ?
रहायला हवं, सखी.. टिकवायला हवं ते… गुंतवळीत जगताना हे मोहरणंच तर आपल्याला तारु शकतं… बाकी कशाचाही विचार करु न देता… होणारा त्रास अजिबात जाणवू न देता… असं जगता यायला हवं, सखी… मी तसंच तर जगतोय… किंबहुना जगण्याचा प्रयत्न करतोय… तू ?


Repeat, I think… Pls check n confirm

प्रिय सखी,

अगदीच खरं सांगायचं तर, पानगळ संपतो, वसंत सुरु होतो, तसं झालंय काहीसं… तुझ्या भेटीनं… तुझ्या ओढीनं.. तुझ्या सहवासानं… राजसा.. अबोल तू… बोल ना… आहहहह…. रात्रीच्या गडद शांततेत मध्येच कुठूनतरी ते स्वर्गीय भासणारे सूर ऐकू येतात आणि अंगावरुन भलं मोठं मोरपीस कुणीतरी सरसरुन फिरवावं, तसं मोहरुन जायला होतं अगदी… खरं तर हे असं मोहरणं म्हटलं तर क्षणिक… म्हटलं तर आयुष्यभरासाठी… हे मोहरणं कोण कसं जपतंय, हे महत्त्वाचं… त्या साऊच्या मोरासारखं… तो मोर जसा जपायला हवा अयुष्यभर, तसंच हे मोहरणंही… खूप हलकं हलकं वाटतंय खरं… आज हे तुला लिहीताना… प्रत्त्येक वेळी लिहायला घेतल्यानंतर, काय लिहू, असा प्रश्न पडतो आणि ज्या वेळी असा प्रश्न पडतो, तेव्हा खरंच काहीही.. काहीही म्हणजे काहीही लिहू नये माणसानं… काय बोलावं, असा प्रश्न पडतो, तेव्हाही काहीच बोलू नये माणसानं… शांत बसावं… शांतपणे रात्रीची गडद शांतता अंगावर घेत बसून राहावं… एकटं असताना नाहीतरी आपण आणखी करु तरी काय शकतो.. अर्थात, हेसुध्दा तसं सापेक्षच… म्हटलं तर खूप काही करु शकतो, म्हटलं तर काहीच नाही.. नात्यांच्या, भावनांच्या बाबतीत आम्ही या दुसर्या वर्गातले… वर्ग बदलायला हवा खरा… पण कुठलंही नेमकं काम करायला घेतलं, कुठलाही नेमका विचार अंमलात आणायचा ठरवला की आमचं माकडाचं घर होतं…. बरेच पावसाळे गेलेत खरं, पण घर अजून बांधलेलंच नाही.

तुझी भेट झाली आणि खरं सांगतो, तेव्हा प्रकर्षानं जाणवलं… अरे, आपण घर बांधलेलंच नाहीय अजून.. बांधलं पाहीजे.. खरंच, सखी, बांधलं पाहीजे… ज्या घरात असू फक्त आपण दोघं… तू तुझ्या सुरांमध्ये मला न्हाऊ घालशील… मी माझ्या हातांनी तुला गोंजारेन… जसं आपण बोलायचो तसं… छातीवर डोकं रेलून… शांत अशाच एका संध्याकाळी बॅण्डस्टॅण्डच्या किनार्यावर तू माझ्या छातीवर डोकं रेलून बसलेली असशील… मी दगडाला टेकून… तुझ्या केसांतून अगदी हलकेपणानं हात फिरवत.. आणि मागे कुठेतरी ‘सहेला रे’ लागलेलं असेल… असं किनार्यावर खरंच कुणी ‘सहेला रे’ लावलेलं असेल ?

तू म्हणशील मला, ‘वेडा आहेस का रे तू ? समुद्रावर कोण कशाला ‘सहेला रे’ लावेल ?’

कदाचित… सखी… काल रात्रीचं ‘सहेला रे’ माझ्या मनात अजून गुंजत असेल… कालसुध्दा असंच… चांदण्यांच्या अंधारछायेत बसलेलो आपण… आणि मागे ‘सहेला रे…’ आहहहहह…. तेच सूर… कदाचित तेच सूर ऐकू येत असावेत अजूनही…. सूरांची ताकद असावी तर अशी… जसं ‘सहेला रे..’ तसंच तुझं ‘राजसा…’ माझ्यासाठी… माझ्यापुरतं… ‘राजसा’ ऐकताना अख्खी दुनिया गोठून गेलेली असती माझ्यापुरती… काहीही नसतं माझ्या आजूबाजूला… अगदी माझा मीसुध्दा नसतो बहुधा… काही कल्पना नाही… कुणीच बोलत नसतं… ती गडद शांतता अंगावर घेत मी फक्त तुझे सूर उतरवून घेऊन असतो माझ्या श्वासाश्वासातनं… आणि त्या सूरांबरोबरला तुझा श्वास… धुंद… मनावरची सगळी झापडं एका फटक्यात उडवून टाकणारा तुझा श्वास… वाटतं, याच श्वासात गुदमरुन जावं आणि त्याच आठवणीत अखेरच्या प्रवासाला निघावं… मोरपीसांच्या बिछान्यावरुन… नीजेच्या कुशीत अलवार शिरुन…. बस्स्… असं काही झालंच कधी, तर खरंच सांगतो, सखी, आयुष्यात नाही मागणं उरणारच नाही बहुधा… वाट पाहतोय, सखी, तुझ्या श्वासांची… तुझे श्वास प्राशून घ्यायचेत मला… तना-मनात साठवून घ्यायचेत मला… इथे तिथे वर खाली…. केवळ तुझे आणि तुझेच श्वास… हे जग जणू तुझ्याच श्वासांनी भरलंय… थांब, सखी, जाऊ नकोस एवढ्यात… अजून शुक्राचा तारा फुलायचाय आकाशात… आपली भेट तशी क्षणिकच… त्या एका क्षणाची आठवण पुढल्या भेटीच्या क्षणांपर्यंत… म्हणून ते क्षण जपून ठेवायचे असतात मला… मी प्रयत्न करीन, सखी.. आयुष्यभर हे क्षण जपून ठेवण्याचा प्रयत्न करीन… पण केवळ क्षण नाही… तुझ्यासोबत… ते क्षण माझ्यासोबत राहतील तू असतानाच… राहशील ? माझ्यासोबत ? अखेरपर्यंत ?

श्रीनिवास नार्वेकर

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !