कोणतीही भाषा तिच्या बोलीभाषामुळे समृद्ध असते. महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर त्या -त्या परिसरात विविध बोलीभाषा. त्यांच्या उपभाषा असा संपन्न शब्दसंसार आहे. या विविध बोलीविषयी आणि बोलींमधून सवांद साधणार हे नवं सदर. राज्यातील, देशातील सर्व भाषिकांचा संचार मुंबईत असल्यानं एक वेगळीच मराठी भाषा अलीकडे जन्माला आली आहे. सुरुवात त्याच भापेपासून —-
माझा नणंद ——
माझी दीर !
आपला एक अभिनेता मित्र भाषा मधला ष इतका पोटफोडून बोलू पाहत असे की एकदा ष उच्चरताना त्याची जीभ टाळूला चिकटून बसली होती. नंतर काही तास तो मृत माशासारखा आ वासून फिरत होता. खोत वाटत असेल तर ष बोलून बघा. एकदा नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकर आमच्या एका अभिनय कार्यशाळेत म्हणाले होते की, ‘ज्यांना स, श, ष, आणि क्ष वेगवेगळ्या प्रकारे बोलता येत नाहीत, त्यांच्या मुखाला केवळ दात आहेत म्ह्णून मुख म्हणावं अन्यथा गुद्दार म्हणावं . आता प्रमाण भाषा, शुद्ध – अशुद्ध हा वाद कालातीत आहे. आपल्याला त्यात पडायचं नाही. ‘फुलराणी’ मधलंच नव्हतं जर शुद्ध तर व्हतं अशुद्ध कस? हे वाक्यच खूप काही सांगून जातं. बोलीभाषांची मजा काही औरच आहे. आक्षी मराठी नऊवारी आणि फेट्यावानी, पण, शुद्ध बोलायला जाऊन अशुद्ध बोलतात ते पायात स्पोर्ट्स शूज घालून गाऊनवर ओढणी टाकून वाकला जाण्याऱ्या बायकांसारखं वाटत की नाही? किंवा इस्त्रीचे रेघ मध्ये असलेली जीन्स घालून कपाळावर टिकली लावल्यासारखं? किंवा उडप्याच्या मालवणी हॉटेलमध्ये चायनीज खाल्ल्यासारखं? किंवा— असो! पुढे काही सुचलं नाही की’असो’ चा आधार मिळतो. तर मुद्दा एवढाच आहे की बोलीभाषा ठासून बोलल्या गेल्या पाहिजेत. मी तर म्हणतो प्रत्येक चॅनेलने एक बातमीपत्र बोलीभाषांमधे द्यायला हवं. गाडी चालवताना मार्ग सांगणारी ती गुगल बाईसुद्धा ज्या प्रदेशात जाईल त्या प्रदेशातल्या भाषेत बोलू लागली तर किती मज्जा येईल? मला सतत एक भाबडा प्रश्न पडतो की सगळ्या जगाची एकच भाषा असती तर किती संघर्ष टळले असते. असते? छ्या! तस असत तर खास मराठी खानदान का फुटली असती? माझ्या माहितीत पोळी म्हणायचं की चपाती यावरून घटस्फोट झालेलं जोडपं आहे. वाईच जरा गम्मत हो!
तर मुंबईची भाषा–भाषा हि नदीसारखी असते. तिचा उगम होऊन अनेक गावचं पाणी पीत पीत ती समुद्राला मिळते. मुंबई तर एक समुद्राचं आहे. अनेक प्रांत, राज्य, देश इथल्या माणसांच्या भाषा सरितांनी बनलेला सागर. इथली मराठीसुद्धा विभागानुसार बदलते. गिरगावातला मराठी माणूस आणि गोरेगावातला मराठी माणूस यांची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर शिवाजी पार्कमधली वेगळी. अंधेरी – बान्द्रासारख्या कॉस्मो भागातली मराठी डिफरंट आहे. तिथे तीन वेगळे गाव आहेत. एक बांद्रा, दुसरा ब्यानद्रा आणि थोडासा उरलेलं वांद्रे. मालाड भागातल्या किरिस्तांव वस्तीत वेगळं मराठी बोललं जात. तर वसई – विरारला तर अजून वेगळं. त्यांची तर बोलीच आहे सामवेदी. ठाण्या कर गेलो की आगरी कोळीचा प्रभाव दिसतो. पण, सांप्रत काळात इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे वस्तीस गेल्यामुळे sagalich भेसळ झाली आहे. व्यवसायाप्रमाणेसुद्धा बोलायची पद्धत बदलते. गुजराथी लोक वरच्या पट्टीत बोलतात. त्यांच्या आवाजाचा एक वेगळा पोत असतो. मी त्याला विक्रेता आवाज म्हणतो. ‘लाडे सेले’ चा आवाज बघा तसाच असतो तो. सतत काहीतरी विकत असल्यासारखं बोलतात ते. तसाच आपले कोळी आगरी बांधव पण उच्च आणि एका विशिष्ट बारीक आवाजात बोलतात. दुरून एकमेकांना साद
दिल्यासारखे. त्याच कारण बहुतेक समुद्राच्या गाजेतून आपलं बोलणं ऐकू जावं म्ह्णून असेल. पेशींमध्ये भाषासुद्धा उतरत असेल का? पेशी तो नकार पुरखो का, लेकिन पेशियो का क्या करू? त्यात नाटक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं मराठी अजून वेगळं तर मालिका आणि hindimadhe काम करणाऱ्या मराठी माणसांचं उससे अलग. माझे एक मित्र आहेत, अस्सल पाचकळशी मुंबैकर मराठी. ते एडिटर आहेत. हिंदीशी जास्त ताल्लुक तर एकदा माझ्याशी बोलताना ते म्हणाले की ‘अरे माझा नणंद तुझ्या जवळच राहतो’—माझा नणंद? मी दुकानावर मराठी पाट्याच हव्यात म्हटल्यावर मराठी म्हणजे लिपी की भाषा एवढा गोंधळलो. त्याचा नणंद कसा असेल? एवढे काय ते पुढारलेले नाहीत ‘तसे mag मी म्हणालो की ‘तुम्हाला मेव्हणा म्हणायचं आहे का? तर ते मास्कमधून दिसणाऱ्या चेहऱ्याइतका भाबडा चेहरा ठेवून म्हणले ‘हा तोच तो’ आणि माझी एक दीर थोडं फुडें राहते’ माझा पुन्हा कलानगर की कृष्ण कुंज असा भांबावलेला मराठी माणूस झाला. तरी मी धीर करून वदलो ‘ मेव्हणी का?’ पुन्हा तोच निर्विकार उद्गगार ‘तीच ती!’ आता हे असत्य वाटत असेल तर हसून सोडून द्या. मुंबईतली प्रत्येक घटना सीबीआयकडे सोपवायची गरज नाही.
राजेश देशपांडे rjsh.deshpande@gmail.com