चार
प्रिय सखी,
प्रतिक्षा जीवघेणी असते, मान्य… आपण वाट पाहत असतो आणि ज्याची वाट पाहत असतो, ते समोर अगदी नजरेच्या टप्प्यातही दिसत नाही, त्यामुळे जवळ येण्याची बात दूरच… पण असतो… ज्याची आपण आतुरतेनं, मनापासून वाट पाहत असतो, तो येतोच येतो… मला मान्य आहे, हा प्रतिक्षाकाळ फारच भयंकर असतो. मनाची अवस्था सैरभैर होऊन जाते अगदी… पण काही वेळा सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. आपली मने कितीही लौकिकाच्या पार गेलेली असली, तरी काही भौतिक गोष्टी अशा असतात, ज्यामुळे इच्छा असूनही आपण आपल्याला हवं ते, हवं तसं, हवं तेव्हा करु शकत नाही.. या अशा मर्यादा घालून देणार्या भौतिक गोष्टींमुळे आपल्यासारख्या पारलौकिक मनांना त्रास होतो, हे खरं… अगदी शंभर टक्के खरं… पण तरीही… ते स्विकारण्यावाचून आणखी काहीच पर्याय नसतो. आपल्यासारख्या पारलौकिक मनांना लाभलेला हा शाप असावा का ? तो जर शाप असेल, तर मग त्यासाठी उ:शाप मिळेल का ? कधी ? आज ? उद्या ? परवा ? या जन्मात ? पुढल्या जन्मात ? साता जन्मांत कधीतरी ? किंवा चौर्याऐंशी लक्ष योनी पार केल्यानंतर मिळालेल्या जन्मात कधीतरी ?
बाऽऽप रेऽऽ… खूप त्रासदायक आहे, हे खरं… मला जसा त्रास होतोय, तसाच तुलाही होतोय, किंबहुना हा त्रास माझ्यापेक्षा तुला जास्त होतोय, हेसुध्दा जाणवतंय… पण काय करणार, सखी ? हा त्रास थोड्या-फार फरकाने आपण दोघांनीही सोसत राहणं, यापलीकडे या जन्मी आपण करु तरी काय शकतो ?
पण एक नक्की, सखी… या सगळ्या अडचणींतून, भौतिकातल्या, लौकिकाच्या परीघातल्या कितीतरी सापळ्यांतून मार्ग काढत आपण आपली एकमेकांची ओढ कायम ठेवलीय… मला हे जास्त महत्त्वाचं वाटतं, सखी… माणसं हरतात… विश्वास गमावून बसतात… अडचणींच्या सापळ्यांत फसून स्वत:लाच हरवून बसतात. आपण अजून तरी तसे फसलेलो नाहीय बहुधा… आणि फसून उपयोगही नाही, सखी… आपल्याला या सापळ्यांतही ठामपणे उभं राह्यचंय… सगळ्यांवर मात करुन… सगळ्या अडचणींना पायाखाली घेऊन ताठ मानेनं उभं राह्यचंय आपल्याला… जगाला कोणाला दाखवण्यासाठी वगैरे नाही… पण आपलं आपल्यालाच जोखण्यासाठी… आपण हरत नाही, ही भावनाच आपल्यासाठी किती थोर आहे ना… …..आणि खरंच सांगतो, सखी… हा केवळ शब्दांचा खेळ नाही… भावनांचाही नाही… ज्ञानोबामाऊली म्हणतात तसं, ये हृदयीचे ते हृदयीचे असं म्हणूया हवं तर… एकमेकांचं एकमेकांना समजलं, खूप झालं… त्यातच एकमेकांच्या एकमेकांबद्दलच्या ओढीची सार्थकता… नाही का ?
श्रीनिवास नार्वेकर.