‘प्रिय निरांजनी….’’
तू दूर दूर तेथे….
प्रिय निरांजनी, सांज दाटून आलीय मनात… तांबडे-निळे-पिवळे कापसांचे पुंजके विखुरल्यागत वाटताहेत मनाच्या प्रत्त्येक सांदी-कोपर्यात… खरं तर मनाचा कोपरा हा किती एक भावनांची खाणच ! एक शोधता दुसरी भावना तिथं ठाण मांडून बसलेली… खरंच, थांग न लागणार्या मनातल्या कितीतरी गोष्टी या सांदी-कोपर्यात दडून बसत असतील ? त्यामुळेच कदाचित ‘मन मनास उमगत नाही’ अशी अवस्था होत असावी काहीशी… खरं तर कोलंबसाचे गर्वगीत गात क्षितिजापर्यंत पोहोचायची आस आहे मला… मी पोहोचणारही आहे.. वाटेत आड येणार्या उधाणलेल्या प्रत्त्येक लाटेवर आरुढ होऊन, तिचा लगाम माझ्या हातात ठेवून त्या क्षितिजापर्यंत पोहोचणारच आहे मी… तू फक्त सोबत रहा, निरांजनी.. बाकी काही नाही.. काहूरल्या मनाच्या सांदी-कोपर्यात आणखी काय काय दडून राह्यलंय, कोणास ठाऊक ? पण तू मात्र, निरांजनी, त्या कोपर्यात नको दडून बसू कधी… चुकून तसं झालंच कधी, तर मात्र तुला शोधता शोधता पार संपूनच जायचो मी कदाचित…. खरं सांगू, निरांजनी, कधी कधी असं वाटतं की ‘हे’ नेमकं काय आहे ? तुझं ‘माझं असणं’ म्हणजे नेमकं काय ? किंवा कदाचित माझं ‘तुझं असणं’ म्हणजे तरी नेमकं काय ? माणसं एकमेकांची असतात -किंवा असू पाहतात, म्हणजे नेमकं काय ? या ‘एकमेकांचं होण्या’चा नेमका अर्थ कळलाय कधी कोणाला ? एखाद्याला किंवा एखादीला आहे तसा किंवा आहे तशी स्विकारणं आणि दोघांनीही एकमेकांना निभावणं हे ‘एकमेकांचं होणं’? की हे निभावणं कठीण होत चालल्याची भावना होत कुणीतरी कुणासाठीतरी बदलणं किंवा बदलू पाहणं म्हणजे ‘एकमेकांचं होणं’ ? काहीसं संदिग्ध आहे खरं… आणि ही संदिग्धताच काहूरलीय मनाच्या गाभार्यात… खरं तर बदलू पाहण्याची तशी गरजच नसते मुळी… बदल अपरिहार्य असेल, तर आपसूकच होत जातो तो… मुद्दामहून काही बदलण्याची तशी गरज नसतेच…. पण…. या काहूरजाणीवेनंच मनाचा गाभारा पार निनादून गेलाय.. या निनादाशिवाय आणखी काहीच ऐकू येत नाहीय. अवघा आसमंत बधिरलाय असं वाटू लागलंय. संदिग्धतेची ही काहूरजाणीव मनाला पिळवटून टाकण्यापूर्वीच, ये निरांजनी…. ‘एकमेकांच्या होण्या’ला एक नवा अर्थ देऊ आपण… निदान प्रयत्न तरी करु देण्याचा…
निरांजनी, आज अचानक, कसा कुणास ठाऊक, पण काळाचा पट उलट्या दिशेनं उलगडत चाललाय. कुठलाही पट उलट्या दिशेनं उलगडण्याचा स्वभाव नाही माझा.. पण हे काय होतंय, काय चाललंय, काहीच कळेनासं झालंय.. पुन्हा संदिग्धतेची काहूरजाणीव.. नाही अडकायचंय त्यात मला.. पण वाटतंय की कुठलेतरी अदृश्य बंध अडकवलेत माझ्या पायात कुणीतरी आणि ओढला जातोय मी, माझं ओढलं जाणं जणू अपरिहार्य असल्यागत…. नाही… निरांजनी, हे थांबायला हवं… थांबवायला हवं मला.. ही संदिग्धतेची काहूरजाणीव कुठेतरी दूरात नेऊन सोडायला हवी. मला ठाऊक आहे, ते मलाच करायचंय… पण ओढलाच जातोय असा की, सावरण्याच्या संधीचा क्षणच मिळत नाहीय. मध्येच कधीतरी, अचानक, जणू स्वप्नात दिसत असल्यासारखा तुझा हात समोर येतो मदतीसाठी… (खरंच येतो..? की आल्यासारखा वाटतो ?) पण पकडायचा प्रयत्न करु लागताच त्या हाताचं मृगजळ होतं आणि एकदा एखाद्या गोष्टीचं मृगजळ झालं, की ते पकडणं आपल्या हातात थोडंच असतं !
पण मी हरणार नाही.. त्या मृगजळापर्यंत पोहोचणार आहे मी… नि:संदिग्ध पोहोचणार आहे. क्षितिज ताब्यात घेऊ पाहणार्या कोलंबसाची ईर्षा आहे माझ्या मनात… कितीही विराट वादळं हेलकावू लागली, तरी ईर्षा डळमळणार नाही… फक्त… सावरण्याच्या संधीचा एक क्षण हवाय… बस्स्..! त्या क्षणाची वाट पाहतोय मी, निरांजनी…. अगदी मनापासून, खरं खरं सांगायचं, निरांजनी, तर आजवर मृगजळंच आली आयुष्यात… हाताला न लागणारी मृगजळं… किंवा हाताला लागतेय असं वाटता वाटता अवचित दूर जाणारी… सातत्याने भासजाणिवेत वावरत ठेवणारी आणि अस्वस्थ काहूर मनात निर्माण करणारी मृगजळं… अर्थात मृगजळाची प्रकृतीच ती… कोण काय करणार ? पण कदाचित… हादेखील एक संकेत असावा. अन्यथा सगळीच मृगजळं अशी आमच्याच आयुष्यात का आली असती ? किंवा कदाचित…. मृगजळ हेच माझं क्षितिज असावं. खरोखरंच असं असेल, तर मग…? संपलंच सगळं… कधीही हाती न येणार्या क्षितिजासाठी धावत राह्यचं ? का…? कशासाठी…? खरं तर, निरांजनी, हे का, कशासाठी ? असले प्रश्न फार फार तर क्षणिक असतात माझ्या मनात.. कारण प्रश्नात अडकण्याचा माझा स्वभाव नाही. अडकण्यापेक्षा गुरफटून जाण्याचा म्हणू हवं तर… हां, हे अधिक योग्य आहे. कारण अशा उत्तरं न मिळणार्या प्रश्नात गुरफटून गेलो, तर हाती कधीच काही लागत नाही, हे वास्तव आणि हे असं हाती काहीच न लागणंसुध्दा माझ्या स्वभावाला परवडणारं नाही. त्यामुळे, लागेल…. आज-उद्या-परवा-कधीतरी…. ते क्षितिज हाती लागेल माझ्या, निरांजनी…. आणि त्या क्षणी, कदाचित, दुनियेतला सर्वात आनंदी प्राणी मी असेन… निरांजनी, लहानपणी गोष्ट ऐकायचो एक… बाबा सांगायचे … खरी-खोटी ठाऊक नाही. पण बाबा खूप छान सांगायचे. गोष्ट होती इंद्राच्या ऐरावताची… तुला ठाऊक आहे ती गोष्ट ? ऐन मध्यरात्री म्हणे जमिनीखालून इंद्राचा ऐरावत येतो, आपल्याभोवती घोटाळतो काही काळ आणि मग निघून जातो. बरेच दिवस, मध्यरात्री, अगदी पहिल्या प्रहरापर्यंत टक्क जागा असायचो मी… मग कधीतरी पुन्हा बाबा म्हणाले, असं जागं राहून तो ऐरावत आल्याचं कळणार नाही काही आपल्याला… तो झोपेतून उठवून वर्दी देतो आपण आल्याची… पहिल्यांदा ऐरावताचा आवाज येऊ लागतो जमिनीखालून… मग हळुहळू तो आवाज वाढू लागतो आणि मग अचानक येतो कधीतरी तो ऐरावत आपल्यासमोर… मग मात्र मी झोपायला सुरुवात केली. पण आजतागायत, सांगतो निरांजनी, या ऐरावताचा आवाज काही मला ऐकू आला नाही आणि तो कधी दिसलाही नाही मला… दिसेल कधी भविष्यात ? आज अशीच अवस्था झालीय काहीशी माझी…. आजही कधीतरी जमिनीवर पडल्यानंतरही टक्क जागा असतो मी… ऐरावताच्या आवाजाची वाट पाहात… ऐन मध्यरात्री इंद्राच्या ऐरावताचा आवाज ऐकण्यासाठी जागं राहताराहता पापण्या कधी कलंडतात काही कळतच नाही. हा ऐरावत म्हणजेही मृगजळच जणू ! लहानपणापासून ही अशी मृगजळं कवेत घेण्याचा सोस लागलेला… म्हणूनच… हरणार नाही, निरांजनी… हे मृगजळही कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही मी… क्षितिजस्पर्श झाल्याशिवाय पाऊल हटणार नाही मागे…. चालत राह्यचंय… चालतच राह्यचंय…. न थकता चालत राह्यचंय…. मला ठाऊक आहे, ते क्षितिज नक्की गवसेल मला…. त्या क्षणाची वाट पाहतोय मी, निरांजनी… आणि मला वाटतं, तुलादेखील उत्सुकता असेल, तो क्षण कधी येतोय याची… नक्कीच वाट पाहत असशील तू… माझ्यासारखीच… होय ना ? …………… …………………. …………………. ……………….
–श्रीनिवास नार्वेकर