कर्मवीरांना अण्णा म्हणत.ते मराठी समाजसुधारक,साक्षरतेचे पुरस्कर्ते आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. आणि मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करून काम सुरू केले.
स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते. पण ते जनतेमध्ये इतके मिसळून गेले की संपूर्ण बहुजन समाजाला ते आपले वाटले. त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता, समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतीगृहामध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत आणि स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करत एकत्र जेवण करत. भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव सामाजिक समता यांचा संदेश दिला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई.त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यातील, कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते पुढे ते ऐतवडे जिल्हा सांगली येथे स्थिर झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले गावाजवळ बाहुबलीचा डोंगर आहे त्या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेसे गाव आहे. तिथे २२ सप्टेंबर १८८७ रोजी कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज गावीच गेले. लहानपणापासून ते अस्पृश्य मुलांच्यात खेळत असत. अण्णा म्हणत ‘कमवा व शिका, विद्यार्थ्यांनी नुसते डोक्यावरचे केसच वाढवायचे नसतात तर त्याने डोक्यातले विचारही वाढवले पाहिजेत.
विद्यार्थी स्वाभिमानी पाहिजे.तो न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड बाळगणारा हवा. इस्त्रीची घडीमोड न होता कसले काम होणार ! घामाने डबडबलेले शरीर हाच माणसाचा खरा अलंकार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजजागृती केली पाहिजे. लोकांना शिक्षण देण्याचं ते विधायक स्वरूपाचे साधन झालं पाहिजे. काम करीत असताना हा गरीब-श्रीमंत असा भेदभाव घामांच्या धारांबरोबर गळून पडतो. शिक्षण हे साध्य नाही साधन आहे. नवचैतन्य, नवसंस्कृती, नवमानव, नवसमाज शिक्षणातुन निर्माण करायचा असतो. मला ओसाड जमीन द्या आणि मी त्याचे नंदनवन बनवीन.
आपल्या भावी पिढीची जबाबदारी आपल्या स्त्री वर्गावर असल्यामुळे स्त्रियांना प्रथम सज्ञान करणे फार महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटे. ते म्हणत सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यशदेखील कायमचे झोपेल. गुरूपेक्षा शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे. आपल्या वस्तीगृहातील मुलांना दोन वेळचे जेवण व्यवस्थित मिळावे म्हणून देणगीसाठी ते गावोगाव फिरत असत. इतकेच नव्हे तर आपल्या पत्नीचे सर्व दागिने सुद्धा त्यांनी त्यांच्या सोयीसाठी वापरलेले होते. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देखील खूप सोशिक आणि सद्गुणी अशा गृहिणी होत्या. वसतिगृहातल्या मुलांच्यावर त्यांचे मायबापाप्रमाणे खूप प्रेम होते.
प्रसंग पडल्यावर त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्रही काढून देण्यास मागे पुढे पाहिले नाही. भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. इथूनच त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन’ अशा शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणारे असे ते थोर आधुनिक भगिरथ. त्यांची प्राणज्योत ९ मे १९५९ रोजी मालवली पण आजही त्यांच्या ज्ञानगंगेची कावड गावांगावांतून पोहचत आहे.
-सौ.भारती सावंत मुंबई