पाऊस बहराचा…
पाऊस अवकाळाचा…
पाऊस धडकांचा…
पाऊस शिरशिरीचा…
पाऊस प्रेमाचा…
पाऊस रागाचा…
पाऊस सुखाचा…
पाऊस दुःखाचा…
पाऊस जवळीकीचा…
पाऊस दुराव्याचा…
कोसळत असतात
कितीतरी पाऊस
कितीतरी ठिकाणी
अगदी एकाच वेळी…
जोर असेल कदाचित कमी-अधिक
पण कोसळणं तेच… तसंच…
आक्रंदत अंगावर येणाऱ्या सुखासारखं…
दुःख जसं येतं आक्रंदत अंगावर
तसंच येतं कधी कधी सुखसुद्धा…
असंच…
या धुवांधार कोसळणाऱ्या पावसासारखं…
आणि कधीतरी
कुठेतरी
असाच आक्रंदत
काळा पाऊसही कोसळतो
धुवांधार
आपल्याच तळामुळांत
खोलवर
आत
आत
अगदी आत…
- श्रीनिवास नार्वेकर©