• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

THAKLA ASASHIL NA / थकला असशील ना?

थकला असशील ना?
रंगीबेरंगी मुखवट्या मागे धावून
गवसलं का काही शाश्वत?
काही ह्रदयात जपून ठेवण्यासारखं

कंटाळला असशील ना?
त्याच त्या तक्रारी, आक्रमणं
पुन्हा तेच ते तह,मांडवली
थांबली का रे वणवण तरीही

बर ईतकी यातायात करून भांडतोस
मिळालं का कुणी आपलसं?
रडायला एखादा हक्काचा खांदा
किंवा डोकं ठेवून शांत व्हायला आईसारखी कुशी

केलायस हिशोब की राहीलाय अजून?
काय हरवलं काय बाकी
की अजूनही भावनांच्या, भ्रमाच्या वावटळीत सैरभैर आहेस
सापडतय का काही जीवलग, हक्काचं

नाही सापडणार तुला..
मी मला वजा केल्यावर ,तू सुध्दा ऊरणार नाहीस तूझ्यापाशी
ऊरेल ईतकच,तीच पोकळ आशा, आनंदाचा मुखवटा,आत माणूस नसलेला तुझा सुखी माणसाचा सदरा

मी पूर्ण आहे तुझ्या नसण्यातही,
जाणवतो ना भवताली माझ्या,
तुझा खोळंबलेला श्वास, अस्वस्थ ओढ,तुझी निशब्द आर्जवं,तुझी अगतिकता, तुझा तोच विघातक अहं,पून्हा तुझं वाट पहाणं

मला समजते तुझी तडफड,तुझ्या आत्म्याचा हुंकार,
ऐकूही येतं तुझं निशब्द रूदन
आतपर्यंत तूटत जातं काळीज
तुझा अहं नसता मधे तर तुलाही ऊमजलं असतं सारं

तूला नाही कळलं माझं स्वप्नं
तूला पूर्ण करायचं होतं,भूतकाळाची बेडी तोडून स्वतंत्र करायचं होतं,तूझा सन्मान, तूझा निखळं आनंद पहायचा होता,तूला संपूर्ण करायच होतं

संपूर्ण, जिथं सगळं फरफटलेपण संपेल,जिथं एका वादळाला कायमचं घरटं मिळेल,जिथं अश्वत्थाम्याची जखम पुर्ण भरून येईल, मायेच्या शुष्रुशेने.
जेव्हा तू पूर्ण होऊन माणसाचा देव होशील,ते ते करायच होतं

पण……
तूला समजली नाहीत माझी स्वप्नं
नाही पोहोचली तूझ्या पर्यंत ती आर्त स्पंदनं
काश,थोडी साथ दिली असतीस…….
तू अपूर्ण राहीलास आणि
अश्वत्थाम्याच्या जखमेची लागण मला झाली
आता युगांतापर्यंत भळभळते दुःख

सौ. नीता फडतरे

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !