चाफयचुफय करता खेपी
पोरीची रिक्वेस्ट आली
गालात हासून गूदकन
म्या याक्शेप्ट केली
भर उनायात मायावर राज्या
तिनं मेसेजची केली बरसात
हाय पिल्लू ह्यालो टिल्लू
बोल्याले झाली सुरवात
म्या म्हतलं वयख ना पायख
आपुनच कसं काय सापळलो
दा मिनटात लव यु झालं
एवळा कसा काय आवळलो
धाकधुक होती मनात
पन कंट्रोल काई झालं नोतं
नाईतर काय राजेहो
इतकं निपक-चापक थुत्त्तर म्या
जिंदगीत कधी पायलं नोतं
म्या म्हतलं सायाचं पावूनच घिऊ
घरावर आले गोटे त लगन करून घिऊ
रातंदिवस चाले मंग दनक्यात चाटींग
चळली इश्काची नशा मी झालो चिंग
शेवटी पुळच्याच इतवारी
आमची डेट झाली फिक्स
म्या म्हतलं जमते आपला इश्क
त घिऊन टाकू ना रिस्क
नजरानजर झाली जशी
माया डायरेक्ट उळला ड्यू
तोंड इचकत बोललो मी
ही..ही..ही..व्हू आर यु?
बदबद लेप कीरीमचे तोंडावर
होटावर लिपस्टिकचा मारा होता
मायची शप्पथ,खरं सांगतो
फक्त डीपीतच फोटो गोरा होता
“आय वांट पीज्जा विथ स्प्रिंग रोल”
हिडगावत भौ केली तिनं डिमांड
मले वाटलं खाईन शिंगल कचोरी
अन वरून मांगीन सुपारीचं खांड
चाचय बाचय पान्यात डुबुन
मी एक एक घास घेत जावो
बावरल्यावानी पावो तिच्याइकळे
तर कधी लळकुंडी येत जावो
कधी मांगे थंडं,कधी मांगे गरम
पावून तिचे नखरे मी पळलो नरम
म्या म्हतलं मनात हे इंजिन नाई कामाचं
तेच पुरते बिनाखर्चाचं मामाच्यां गावाचं
शेवटी बिल पावून राजेहो
मले झांज आली
एक हप्त्याचा बजेट
अर्ध्या घंट्यात खर्चून गेली
हासो-मासो घाम पुसो
बेदम घामाझोकील झालो
अर्धे केले फेळफाळ
अन अर्धे उधार ठून आलो
कानखळी घिऊन पयले
पोट्टी अनफ्रेंड केली
तईपासून मायावाली
गाळी जाग्यावर आली
( काही वऱ्हाडी शब्दांचे अर्थ )
थूत्तर= तोंड
पोट्टी=मुलगी
घामाझोकील=घामाघूम
झांज येणे = चक्कर येणे
लळकुंडी=रडकुंडीला येणे
चाफयचूफय=शोधणे
निपक-चापक = नीटनेटकी
प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला