काय झाले तुला सांग आतातरी
शांतता ही अशी रोज नाही बरी
चोरते तू नजर का तरी मग पुन्हा
भेटते सारखी त्याच वाटेवरी
टाळता टाळता गुंतला जीव अन्
भाळलो शेवटी एकमेकांवरी
दुःख अल्पायुषी वाटते प्रथम पण
पाहता-पाहता गाठते शंभरी
विसर सारे जुने सोडवूया तिढा
भेट तू एकदा शक्य नसले जरी
नोंद घेऊ नको फक्त महिलादिनी
चौकशी कर तिची एरव्हीही घरी
वेदना एक पण दोन प्रतिमा तुझ्या
कोण सीता म्हणे कोण मंदोदरी
-सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर