• Fri. Dec 20th, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

GHANTARAO / घंटारव

हा घंटारव शांत झाला
आणि काळजातली
शांतता थरथरली…

नियतीने असा काही डाव साधला की,
आयुष्याने शरणांगती पत्करली
हतबल होऊन.

जगराहटी मंदावली!
कालचक्र मात्र फिरतच राहिलं
आपल्या गतीनं
गांधीजींच्या माकडांचा खेळ बघत.

अंतयात्राही आता
खांदेकऱ्यावीनाच
पारोशा निघाल्या
अनंताच्या प्रवासाला.

अश्रूंचा महापूर तर
भिक मगतोय…
डोळ्यांच्या कडांना ओघळण्यासाठी.

किती अवघड होऊन बसतं जगणं
शेवटचं मुखदर्शनही घेता येत नाही तेव्हा.

कोणत्या मस्तीत मस्तावलो की,
‘त्याचे’ अस्तित्व नाकारून
वांझोट्या सुखालाच कवटाळत बसलो
वेड्या सारखा…
‘त्याच्या’ काठीचा आवाज होत नाही
पण… वेदनांचा आवाकाही
सावरता येत नाही मित्रा
आपल्या टीचभर बुध्दीला.

आपल्याच कोषात (घरात)
कोंडून घ्यावं स्वत:ला
अन् गुमान वाट बघत राहावी
पुन्हा घंटारव होण्याची.

प्रा.ज्ञानेश्वर कुलकर्णी (वतनी)

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !