• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

RESPECT / रिस्पेक्ट भाग -२

MARATHI STORY,RESPECT FOR LOVE, MARATHI STORY

आणि सोफ्यावर जाऊन बसते. ती पुन्हा एकदा क्षणभर अंबरीश कडे अविश्वासाच्या नजरेचा कटाक्ष टाकते आणि तिच्या मोबाईलवर मागे पुढे स्क्रोल करत बसते.आता मात्र अंबरीशचा पेशंस संपतो आणि तो थोडा वैतागूनच तिच्या बाजूला बसत तिला म्हणतो ‘अवू कृपा करून तू आता काही बोलणारेस?, की हे असंच मोबाईलमध्ये…’ असं म्हणत जरा चिडूनच अंबरीश अवनिच्या हातातला फोन जवळजवळ हिसकावूनच घेतो.

‘अंबरीश, फोन दे!’

‘नाही!, तू सांग आधी मला काय झालंय ते?’

‘अंबरीश, फोनss दे!’

‘नाही!, तू सांग!’

‘अरे अंबरीश प्लीजsss!’

असं म्हणत अवनी त्याच्या हातातून तिचा फोन अक्षरशः ओढून घेते आणि त्याच आवेगात मोबाईल अनलॉक करुन त्याला मोबाईल मधला एक फोटो दाखवत म्हणते;

‘हे काय आहे अंबरीश?’

‘हे तुम्हीच दोघं आहात ना?’ की हा फोटो एडिटेड आहे असं संगणारेस मला?’

‘अगं अवू आता मी तुला हेच संगणार …’

‘अंबरीश जे काही सांगशील ना ते फक्त मला पटेल असं सांग म्हणजे झालं’.

‘अगं हो आज आत्ता मी तुला हेच सांगणार होतो आणि म्हणूनच मी तुला…’

‘म्हणूनच तू मला “नाही” म्हणालास ना? वाह छान! म्हणजे गर्लफ्रेंड साठी; होणाऱ्या बायकोसाठी तुला त्या परक्या मुलीला नाही म्हणता आलं नाही आणि तिच्यासाठी मात्र मला तू आज….असो!’

‘अगं अवू, तू ऐकून तर घे यार..! तू मला बोलूच देत नाहीयेस’.

‘काय बोलायचं राहिलंय आता अंबरीश? यारs, तू, तू माझं सोड, पण एकदा मिनुचा तरी विचार करायचास ना यार! वर्षही नाही झालंय रे त्यांच्या लग्नाला!’

‘ए! ए! एक मिनिट हां! मी तिचाच विचार करून गेलो होतो तिथे..’

‘Wow ! seriously??? अंबरीश खरंच??’

‘अगं हो!’

‘वाह! आणि म्हणूनच ती आज आय.सी.यू मध्ये जीवन मरणाशी झुंजतीये!

‘काय य य य??’

अवनीची प्रचंड चिडचिड होत होती.संतापही होत होता.पण त्याचवेळी ती स्वतःला शांत ठेवण्याचाही प्रयत्न करत होती. अवनी तशीच चिडचिड करत तिच्या गाडीची चावी आणि तिची पर्स घेऊन घराबाहेर पडायला निघते; आणि हे सगळं काय चाललय ह्याचा काहीच संबंध कळत नसलेला अंबरीश दारापाशी पायात चप्पल चढवत असलेल्या अवनीला तिचे दोन्ही खांदे धरून मोठ्या आवाजात तिला विचारतो ‘अवू मिनुला काय झालंय? ती का आय.सी.यू त आहे? आणि आमच्या फोटोंचा आणि तिच्या आय.सी.यू त असण्याचा काय संबंध आहे?’

‘काय संबंध आहे? ओह प्लीज अंबरीश! एकीकडे हे तुमचेच फोटो आहेत, तुम्हीच तिथे गेला होतात हे सगळं मान्य करतोएस आणि दुसरीकडे मला काय संबंध असं विचारतोस? अनाकलनीय आहे हे सगळं. सोड!, मला बोलायचंच नाहिये काही तुझ्याशी आत्ता’.

असं म्हणत अवनी तावातावाने दार उघडून पायऱ्या उतरायला लागते..तसा अंबरीशही तिच्यामागे दार लावून निघतो. अवनी कितीही चिडलेली असली, रागात असली तरी ती समोरच्याचं म्हणनं ऐकल्याशिवाय निष्कर्षावर येत नाही हे अंबरीशला ठाऊक होतं पण अवनीला एवढ्या लाऊडली चिडलेलं ह्या पाच वर्षांत तो पहिल्यांदाच पहात होता. अवनीलाही सगळया प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा होता, पण आधी हॉस्पिटलला जाणं जास्त गरजेचं होतं. तिने तिची कार काढली. अंबरीश तिच्यामागे पळत पळत येऊन धापा टाकत उभा होता. गाडी काढताना तिच्या गाडीकडे नुसता बघत होता.. तिच्याशी काहीही बोलण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. तिने पार्किंगमधून कार काढून त्याच्या समोर थांबवली, आणि तिच्या बाजूच्या सीटचं दार धाडकन उघडून त्याला म्हणली,

‘या बसा आता!; बॉयफ्रेंड धर्म तर तुम्हाला पाळता आला नाही. आता निदान प्रायः श‌्चित्त म्हणून का होईना मझ्यासोबत मित्र धर्म पाळायला चला’.

अंबरीश मुकाट्याने तिच्या बाजूच्या सीटवर बसतो… गाडी मेन रोडला लागेपर्यंत अंबरीश काहीच बोलला नाही पण नंतर त्याला राहवेना म्हणून तो म्हणाला

‘अवू प्लीज मीनुला काय झालंय ते सांगशील का? मला खरंच कळत नाहीये हे सगळं काय सुरू आहे ते! माझं डोकं बंद झालंय.

अवनीचा पारा चढलेलाच होता. त्याच चढलेल्या पाऱ्यात ती म्हणते ‘अरे मंद माणसा, आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय मिनुने. काल हे हे तुमचे रेड लाईट एरियातले फोटोज् तिला तिच्या वडिलांनी पाठवले आणि अर्थवला; आपल्या नवऱ्याला तसल्या फोटोत पाहून एका नुकतंच लग्न झालेल्या बायकोची दुसरी काय रिअँक्शन येणार होती अंबरीश?’

‘ओह शिट…..! पण अगं एवढं मोठं पाऊल उचालायच्या आधी एकदा बोलायचं ना तिने अर्थवशी किंवा माझ्याशी…!

‘हो! अगदी खरं! केला होता ना तिने कॉल तुम्हा दोघांनाही पण तुम्ही दोघंही फोन स्विच ऑफ करून कुठे गेला होतात शेण खायला तुम्हालाच माहित’.

‘अरे यार, शीट! शीट!…अवनी तू समजतियेस तसं काहीही नाहीये. प्लीज ट्रस्ट मी’.

तितक्यात हॉस्पिटल आल्यामुळे अवनी गाडीचे करकचून ब्रेक मारते.

क्रमशः भाग ३ वाचा https://wachankatta.com/respect-marathi-story/

-प्रांजली कुलकर्णी

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !