अवनी मिनुच्या रूम मधून धाव घेत अंबरीशकडे जायला निघते खरी पण अचानक ती थांबते. तिच्या डोक्यात आता वेगवेगळ्या शंका आणि शक्यता यायला लागतात. आत्महत्या, खून, बळजबरी अशा गोष्टी टीव्हीत पाहणं आणि बातम्यांमध्ये वाचणं खूप वेगळ्या असतात पण त्या जेव्हा आपल्या सोबत, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत घडतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यातली गंभीरता आपल्याला कळते आणि त्याच
गंभीरतेची जाणिव अवनीला होऊन ती थांबते आणि तिथेच जवळ असलेल्या वॉटर कुलर मधलं पाणी पिते. विचार करतच ती तिथे असलेल्या एका खुर्चीत बसते. तिच्या डोक्यात आता एक विचारचक्र चालू होतं आणि ती मनातल्या मनात स्वतःशीच बोलायला लागते,
‘मिनुने आत्ता मला जे काही सांगितलंय ते जर खरं असेल तर मग काल मिनू पुन्हा अथर्वच्या घरी का गेली? कोणी आपल्याला मारायचा प्रयत्न केलाय म्हटल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी कोण त्याच व्यक्तीकडे पुन्हा जाईल? आणि तिने मला आत्ता एकदाही विचारलं नाही की अथर्व कुठे आहे ते. नाही !नाही! ती अजून काही बोलायच्या आतच मी तिथून निघून आले. आणि तिने तिच्या वडिलांना विचारलंच असेल आणि यार कितीही काहीही झालं तरी नवरा होता तो तिचा. त्यामुळे ती म्हणते तसं प्रेमापोटी पुन्हा त्याला एक चांस द्यायला म्हणून गेली असेल ती एवढं होऊनही त्याच्या घरी. पण मग काल रात्री अथर्व का नाही गेला त्याच्या घरी? मिनू म्हणते तसं जर तो क्रूर आणि पाशवी असेल तर त्याला कसली भीती होती त्याच्या घरी जायची?
नाही नाही! तो काल घरी गेला नाही कारण, काल पुन्हा तो कदाचित त्या रेड लाईट एरियात गेला असेल. त्या फोटोत तो ज्या मुलीसोबत होता कदाचित तिच्यासाठीच तो पुन्हा तिथे गेला असेल आणि मग तिथून घरी न जाता अंबरीशच्या फ्लॅटवर गेला असेल, आणि खरंच नंतर हार्ट अटॅकने गेला असेल. पण परवा अंबरीश आणि अथर्व दोघेही रेड लाईट एरियात गेले होते. मग कालही पुन्हा दोघे तिकडे गेले नसतील हे कशावरून? का काल अथर्व घरी गेला पण मिनुने पुन्हा त्याला घरात घेतलं नसेल? आणि अवनी ह्या सगळ्यात तू हे विसरतियेस की अंबरीश हा अथर्वचा एकमेव फ्रेंड आणि फॅमिली आहे सो कशावरून अंबरीश पण खोटं बोलत नसेल?आणि असंही जेवढं मला माहितीये अथर्व एकूण एक गोष्ट अंबरीशला सांगायचा. मग मिनू आणि त्याच्यात एवढ्या दिवसांपासूनची चालू असणारी गोष्ट त्याने सांगितली कशी नाही? का सांगितली असेल पण अंबरीश आपल्यापासून काहीतरी लपवतोय? अंबरीशपण अथर्वसारखा पाशवी आणि क्रूर असेल तर नक्कीच त्याला पाठीशी घालायला आणि मझ्यापासून हे सगळं लपवायला अंबरीश ही खोटं बोलू शकतोच ना.आणि मी त्याला कधीच जास्त जवळ येऊ दिलं नाही आणि म्हणून हा नेहमीच तर तिकडे जात नसेल ना? आजचे ते फोटोज् आणि…..
ओह गॉड! प्लिज असं काही नसू देत प्लिज.’
अवनीला नेमकं कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नव्हतं. तिच्या डोक्यात नुसता गोंधळ चालू होता. तिला कशाचीच टोटल लागत नव्हती त्यात आज सकाळीच अंबरीश आणि अथर्वचे त्या रेड लाईट एरियातल्या बायकांसोबतचे गळ्यात गळे घातलेले फोटो पाहून तिचा अंबरीशवरचा विश्वास हलला होता. मन कितीही सांगत असलं की तिचा अंबरीश असं वागू शकत नाही तरीही परिस्थिती अवनीला आता कोणावरच विश्वास ठेवू देत नव्हती. त्यात अथर्वही आता जिवंत नव्हता, आणि मिनू जे संगतिये त्यावर अवनिला विश्वास ठेवायची हिम्मत होत नव्हती. कारण तिने सांगतलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे अंबरीशवर अविश्वास दाखवणं आणि तो ही ह्या सगळ्यात कुठे तरी सामील आहे हे मान्य करणं. पण तिची ते सगळं मान्य करायची आजिबात तयारी नव्हती. तिला क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं वाटतं. ती तिचा मोबाईल काढते आणि अंबरीशला मेसेज करते,
‘मला इथे अजुन अर्धा तास तरी लागेल’.
लगेच अंबरीशचा रिप्लाय येतो,
‘ओके!, मी इथेच आहे .ये कधी पण. मिनू बरी आहे ना?’
‘हो! ALL ओके!’ असा त्याला मेसेज पाठवून अवनी हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये जाते आणि चहाचा ग्लास घेऊन एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसते. दोन घोट चहाचे घेऊन ती एक दीर्घ श्वास घेते आणि पुन्हा एकदा सगळया गोष्टींचा विचार करायला लागते. आता मात्र ती अथर्वच्या बाजूने म्हणजेच अथर्वने जे काही अंबरीशला सांगितलेलं असतं त्यावर विश्वास ठेवून त्या बाजूने विचार करायला लागते.
अंबरीशने तिला परवा घडलेल्या प्रसंगाबद्दल जे काही सांगितलं होतं त्यानुसार, अथर्व त्याची ऑफिसची एक फाईल घ्यायला म्हणून त्याच्या घरी गेला होता, तर त्याच्या दारातच त्याला अगदी नवी कोरी ऑडी दिसते. मिनू श्रीमंत बापाची मुलगी असल्याने तिला ह्या कशाचंच आकर्षण नव्हतं. पण अथर्वचं मात्र स्वतःच्या पैशातून ऑडी घ्यायचं स्वप्न होतं. त्यामुळे दाराबाहेर अॉडी बघताच त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटलं मिनुचं प्रमोशन झालंय तर तिनेच त्याच्यासाठी सरप्राईज म्हणून ही गाडी अणलिये आणि उद्या त्याच्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टीची तयारी करायला म्हणून ती आत्ता घरी अलिये. ह्या सगळ्या विचारांनी तो खूप आनंदित होत त्याच्या घरात जातो.
मिनू तेव्हा नुकतीच बाथ घेऊन आलेली पाहून तो तिला तसाच उत्साहाने बिलगतो आणि आनंदाच्या भरात तिला किस करायला लागतो. त्याला असं अनपेक्षितपणे तिथे आल्याचं पाहून मिनू भूत पाहिल्यासारखं घाबरते आणि अचानक, ‘तू मला हात लावायची हिम्मत केलीसच कशी? तुझी लायकी तरी आहे का माझ्याजवळ यायची? माझ्या वडिलांना त्यांचा बिझनेस सांभाळायला तुझ्यासारखा प्रामाणिक नोकर पाहिजे होता आणि तुझ्यासारख्या अनाथ मुलापेक्षा चांगला दुसरा कोण मिळाला असता म्हणून त्यांनी मझं लग्न तुझ्याशी लावून दिलं. नाहीतर तुला माझ्या नखाचीही सर नाही’ असं वाट्टेल ते मिनू त्याला बोलते आणि ‘इथून ताबडतोब निघाला नाहीस तर पोलिसांना बोलवेन’ असं म्हणत ती त्याला घराबाहेर काढते. आणि ह्या सगळ्या प्रसंगामुळे अहंकार दुखावलेला आणि आतून पार जखमी झालेला अथर्व बारमध्ये जाऊन खूप दारू पितो आणि मिनुला तिची जागा दाखवून देऊ असं काहीतरी डोक्यात घेऊन तो त्या रेड लाईट एरियात जातो आणि तिथून अंबरीशला फोन करून त्यालाही तिथे बोलवतो.
पण त्यानंतर काय होतं हे मात्र अंबरीशने तिला सांगितलेलं नसतं. कारण ते सांगायच्या आतच ते हॉस्पिटलला येऊन पोहचलेले असतात.
अवनिने अंबरीशच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तरी तिचे काही प्रश्न अनुत्तरितच राहत होते.जसं की काल अथर्व त्याच्या घरी का नाही गेला? अंबरीशही म्हणतोय की काल तो माझ्या फ्लॅटवर तयारी करायला आला होता.पण त्याने कसलीच तयारी केलेली दिसत नव्हती. कशावरून तो आणि अथर्व कालही त्या रेड लाईट एरियात गेले नसतील? कदाचित ते फोटोज पर्वाचे नसून कालचेच असतील. हे दोघं खरंच काल डॉक्टरकडे गेले होते का?
ह्या सगळ्याचा छडा लावण्यासाठी आता तिच्याकडे त्यातल्या त्यात दोनच गोष्टी उरल्या होत्या. एक तर स्वतः त्या रेड लाईट एरियात जाऊन फोटोतल्या त्या मुलींना शोधून त्यांच्या कडून माहिती काढून घेणे आणि दुसरी म्हणजे अथर्वच्या डॉक्टरांकडे जाऊन काल हे दोघे तिथे आले होते की नाही ते विचारणे व अथर्वने त्यांना मिनू आणि त्याच्या नात्याबद्दल काही सांगितलंय का ते विचारणे.
पण हे सगळं करताना तिला अंबरीशला सोबत घेऊन जाणं परवडणारं नव्हतं. चुकून तो जर ह्या सगळ्यात सामील असला तर त्याला सगळ्या गोष्टींचा सुगावा लागेल म्हणून अवनी अंबरीशला फोन लावते आणि म्हणते,
‘अंबरीश, ऐक ना! तू आत हॉस्पिटल मध्ये ये आणि मिनुच्या बाबांना अथर्व गेल्याचं सांग’.
‘मी? ते पुन्हा माझ्यावर संतापले तर..?’
‘ नाही!, तसं नाही होणार. मी सांगते त्यांना. पण मला आत्ता ऑफिसला जावं लागणार आहे अर्जंट. मॅडमचा फोन आला होता आत्ता.त्यामुळे मी जाऊन येते. तोपर्यंत तू काकांना सांग सगळं आणि त्यांच्याजवळ इथेच थांब. मी माझं काम झालं की येते लगेच .ओके?’
तो हो म्हणत हॉस्पिटलमध्ये येतो. मिनव्हऻईल अवनी मिनुच्या बाबांना कॉल करते आणि सांगते की, ‘अथर्व सापडलाय. अंबरीश सांगेल तुम्हाला सगळं त्याच्याबद्दल. तुम्ही फक्त शंततेत ऐकुन घ्या सगळं.मी येतेच काही वेळात.’
अवनी अंबरीशकडून कारची चावी घेते आणि अथर्वच्या डॉक्टरकडे जायला निघते.
क्रमशः भाग ७ वाचा https://wachankatta.com/marathi-story-respect-3/
-प्रांजली कुलकर्णी