‘अंबरीश आता हॉस्पिटलमध्ये आपला तमाशा नको. आणि ना आपण आता नंतरच बोलुयात; असंही माझं आत्ता खूप डोकं फिरलय, आणि बिलिव मी; मीनुला जर काही झालं ना, तर खरंच मी तुला कधीच माफ करू शकणार नाही आणि त्या अर्थवला तर नाहीच नाही.’
असं म्हणत अवनी कार मधून उतरते. तसा अंबरीशही पटकन कार मधून उतरतो आणि दोघेही हॉस्पिटल प्रवेश करतात.आय. सी.यु. च्या बाहेरच मिनुचे वडील उभे असतात. एक मोठे नावाजलेले बिझनेसमेन असल्याने त्यांच्या सोबत सतत त्यांचा एक गार्ड आणि त्यांच्या ठेवणीतले 4-5 माणसं असतात. तसे आजही हे सगळे लोकं त्यांच्या आजूबाजूला उभे होते. अवनिला आणि अंबरीशला तिथे बघताच लांबूनच ते अवनीला उद्देशून म्हणतात, ‘तू अजूनही ह्या मुलासोबत आहेस?, तुझी मिनू सारखी गत होऊ नये म्हणून मी तुला फोन केला होता आणि ते फोटोज् पाठवले होते.पण तू त्याच माणसाला घेऊन इथे आली आहेस?’ मिनुच्या वडिलांचा संताप आणि अंबरीश तिथे आल्याची नाराजी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती. त्यांना शांत करत अवनी म्हणते, ‘काका, मला तुमचा राग समजतोय मलाही तितकाच राग आलाय ह्या दोघांचा आणि म्हणूनच मी त्याला इथे घेऊन आले आहे. जेणेकरून ह्या दोघांना तुमच्या समोर उभं करून काय तो सोक्षमोक्ष लावता येईल. पण त्याआधी मला सांगा मिनू कशी आहे? काय म्हणताय डॉक्टर?’
‘पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत, शुद्धीवर यायला हवी ती पुढच्या २४ तासात.’ मिनूच्या वडिलांनी नाराजितच उत्तर दिलं. ते बोलत अवनिशी होते पण त्यांनी त्यांची नजर मात्र पूर्ण अंबरीशवर रोखलेली होती. अंबरीशची नजर मात्र अर्थवला शोधत होती.त्याचं मीनुच्या बाबांकडे अजिबात लक्ष नव्हतं.
मिनूच्या वडिलांचा अजून पारा चढू नये आणि अंबरीशचं ही लक्ष ठिकाणावर यावं ह्यासाठी एकूण परिस्थितीचा अंदाज घेत अवनीच मिनुच्या वडिलांना विचारते, ‘काका अर्थव कुठंय?’ असं विचारताच त्यांचा पारा अजून चढतो आणि ते अंबरीशच्या अंगावर येतात आणि त्याची कॉलर पकडत म्हणतात, ‘ह्या ह्या तुझ्या मित्रालाच विचार ना, कुठंय अथर्व ते? काय रे ए अंबरीश, कुठंय अर्थव?,काल सोबतच होतात ना तुम्ही? मिनूने कॉल केले तर तुमचे मोबाईल स्विच ऑफ आणि नंतर मी १०० तरी कॉल केले असतील त्याला! पण एकही फोन उचलत नाहीये तो! अरे ए सांग ना, कुठंय तो?’ मिनुच्या वडिलांचा आता स्वतःवरचा ताबा सुटला होता. पण तिथेच उभ्या असलेल्या त्यांच्या गार्डने कसंबसं अंबरीशला त्यांच्या तावडीतून सोडवलं. अवनीही मध्ये पडत म्हणली ‘ काका प्लीज शांत व्हा, प्लीज काका! मी बघते, मी शोधून काढते अथर्व कुठे गेलाय ते.’ अवनीचं वाक्य संपायच्या आत मीनुचे बाबा पुन्हा अंबरीशच्या जवळ जात त्याला दम देत म्हणतात, ‘साल्यांनो माझ्या मुलीला जर काही झालं ना, मी सोडणार नाही तुम्हाला! आणि तुम्हाला अजुन माझी पोच किती आहे ना, ते माहित नाहीये; पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीच्या बाबतीत हे जे काही झालंय ना ती खरंच आत्महत्या आहे, की ते मर्डर आहे ह्याचा छडा लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये ..जा सांग तुझ्या त्या जिगरी दोस्त अथर्वला…’ त्यांच्या अशा बोलण्याने अंबरीश चे हात पाय कापायला लागतात. तो तिथेच बाजूला असलेल्या बेंचवर बसतो आणि आपलं तोंड आपल्या हातात लपवून स्वतःचेच केस ओढत ओरडतो. अंबरीशची ही अशी अवस्था अवनीला बघवत नाही. ती त्याच्या बाजूला बसत त्याच्या पाठीवर हात ठेवते.त्या जाणिवेने तो अगदी केविलवाणा होत तिचे दोन्ही हात हातात घट्ट दाबतो आणि तिला म्हणतो ‘यार अवु मला खरंच माहीत नाही अथर्व कुठे गेलाय ते. ‘अवनी त्याच्यावर विश्वास ठेवत तेवढ्याच पोटतिडकीने त्याला विचारते, ‘ अंबरीश खरंच तुला काहीच अंदाज नाहीये तो कुठे असेल ते? प्लिज आठवून बघ ना, काही वेगळं बोलला होता का अथर्व काल तुला? तुम्ही कुठे होतात काल? मला सांग सगळं; बघुयात आपल्याला काही सापडतंय का ते !’ अवनीच्य ह्या धिराने अंबरीश थोडा सावरतो आणि तो सांगायला लागतो… ‘ अवनी, काल आम्ही अथर्वच्या डॉक्टरांकडे गेलो होतो आणि …’ असं म्हणत काहीतरी क्लू लागल्या सारखा अंबरीश अतिशय पॅनिक होत आणि घाबरत म्हणतो, ‘शीट! शीट! शीट म्यान!!! अवनी, पटकन तुझ्या गाडीची चावी दे!’ अवनीला काही समजायच्या आत अंबरीश तिच्या हातातली चावी घेऊन पळत पळतच हॉस्पिटल मधून बाहेर पडतो आणि त्याला जमेल तेवढ्या स्पीड ने तो त्याचं घर गाठतो. त्याच्या घराचं दार उघडताच तो ‘ अथर्व असं ओरडत अर्धवट उघड्या दारातूनच त्याच्या घरात नजर टाकत पाहिलं पाऊल टाकतो तर त्याला त्याचा पाय कशावर तरी पडल्याची जाणीव होते. तो खाली बघतो तर त्याचा पाय अथर्वच्या हातावर पडलेला असतो. आणि त्याला ज्याची भीती वाटत होती तेच त्याला प्रत्यक्षात समोर दिसत असतं. हो! अथर्वची त्याच्या दारातच पडलेली बॉडी.
क्रमशः भाग ४ वाचा https://wachankatta.com/marathi-story-respect/
-प्रांजली कुलकर्णी