अंबरीशच्या पायाला खूप लागलेलं असतं. त्यामुळे त्याला धड उभंही राहता येत नव्हतं.अवनी त्याचा हात तिच्या गळ्याभोवती टाकत त्याला आधार देत चालायला लागते. तो तेव्हाही पुन्हा तिला विचारतो, ‘अवू, तू प्लिज मला असं अर्धवट नको ना सांगुस. सांग ना मला नीट सगळं. कुठे चाललोय आपण? कोण आहे खुनी अथर्वचा? आणि तुझ्याकडे काय पुरावे आहेत की अथर्वचा खूनच झालाय म्हणून?’
‘अंबरीश, सगळं सांगते रे तुला. तुला नाहीतर कोणाला सांगणार आहे मी हे सगळं. फक्त आत्ता आधी लवकर चल. आपल्याला वेळेत पोहचायला हवंय, नाहीतर आपल्या हाती काहीच लागणार नाही रे.’
असं म्हणत अवनी आणि अंबरीश मिनुच्या वडिलांच्याच एका कार मध्ये त्यांच्या ड्रायव्हरसह बसतात आणि अवनी त्या ड्रायव्हरला रेल्वे स्टेशनला गाडी न्यायला सांगते. ते ऐकताच अंबरीश अवनिकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो आणि तो काही विचारणार त्याच्या आतच अवनी त्याचा चेहरा बघून म्हणते,
‘सांगते सांगते! आपण रेल्वे स्टेशनला चालोय कारण मी तेजसला कॉल रेकॉर्डस सोबत त्या तिघांचे लाईव्ह लोकेशन्सही ट्रेस करायला लावले होते’.
‘कोण तिघं पण?, मिनू, तिचे बाबा आणि ?’
‘आणि. ..’ असं म्हणून अवनी सांगणार तितक्यात तिला मिनुच्या वडिलांचा फोन येतो,
‘अवनी, मी ओळखतो ह्याला; पण ह्याचा इथे काय संबंध?’
‘ काका, मिनूचा कोण लागतो हा ? काय संबंध आहे ह्या दोघांचा?’
‘ तू आधी मला ह्याचा इथे काय संबंध आहे ते सांग मगच मी तुला सांगतो त्यांचा काय संबंध आहे ते ‘
‘ काका, खरंच तुम्हाला सांगायची गरज आहे? की त्याचा इथे काय संबंध आहे ते?’
मिनुचे बाबा अवनीच्या ह्या प्रश्नाने जरासे ओशाळल्यासारखे होतात. ते तिच्याशी बोलणार तोच आवनिला तेजसचा फोन येत असल्याने ती मिनुच्या बाबांना म्हणते, ‘काका, तुम्ही लवकरात लवकर रेल्वे स्टेशनला या. मी आणि अंबरीशही तिकडे पोहोचतोय.’
अवनी मिनुच्या बाबांचा फोन कट करून तेजसचा फोन उचलते,
‘हा तेजस बोल, अजून काही कळालं?’
‘ व्हॉट?, शीट म्यान ! ब्लडी *******’
अवनीच्य बोलण्यावरूनच तिचा होत असलेला संताप दिसत होता. ती ड्रायव्हरला भर रस्त्यात गाडी थांबवायला लावते आणि गाडीतून घाई घाईत उतरतच अंबरीशला म्हणते, ‘ ऐक, मिनू स्टेशनला येईल, तिचा ट्रेन नंबर मी पाठवते तुला. प्लिज तिच्यावर लक्ष ठेव. मिनुचे बाबाही पोहचतीलच. तू मात्र ड्रायव्हरला घेऊन जा सोबत एकट्याला चालता येणार नाही तुला.’
‘अगं पण तू कुठे चाललीयेस?’ खिडकीतून मान बाहेर काढत अंबरीश तिला विचारतो. ती ही एका टॅक्सीला हात करत त्याच्या कडे न बघताच म्हणते, ‘एअपोर्टला’! आणि टॅक्सीत बसून एअर पोर्टला जायला निघते.
आत्ता तेजसच्या फोनमुळे अथर्वचा खुनी दोन तासानंतर असलेल्या फ्लाईटने इथून पळ काढणार आहे हे तिला कळतं आणि त्यालाच पकडायला म्हणून अवनी आता एअर पोर्टवर जायला निघालेली असते. एकटिच्या हातून तो निसटून जायला नको म्हणून ती पोलिसांची मदत घ्यायची ठरवते. तिच्या पत्रकारितेमुळे तिचे काही पोलिस मित्रही असतात. ती त्यांच्या मदतीने एअर पोर्टवरच्या सगळ्या गोष्टी गाडीत बसल्या बसल्या म्यानेज करते आणि तो तिथून निसटून जाणार नाही अशी पूर्ण फिल्डींग लावते.
मीनव्हाईल अंबरीश आणि मिनुचे बाबा दोघेही स्टेशनला पोहचतात. अवनिने दोघांनाही मीनुच्या रेल्वेचा नंबर , सीट नंबर आणि बाकी सगळे डिटेल्स पाठवलेले असतात त्यामुळे दोघेही मिनुची रेल्वे ज्या प्लॅटफॉर्मला येणार तिथे एकमेकांना भेटतात. अंबरीशला एकट्याला पाहून ते त्याला विचारतात,
‘अवनी कुठाय?’
‘ ती एअर पोर्टला गेलिये अथर्वाच्या खुन्याला पकडायला?’
‘ काय? सुहासला पकडायला अवनी एकटी गेलीये?’
‘ काका, आता हा सुहास कोण आहे?’
‘ मीनुचा एक्स बॉयफ्रेंड!’
‘व्हॉट ? एक मिनिट, एक मिनिट! यू मीन ” डॉ. सुहास?
‘ हो!’
‘ अथर्वचा सायकयाट्रिक डॉक्टर सुहास?’
‘ व्हॉट? अथर्व सुहासकडे ट्रीटमेंटला जात होता?’
दोघांनाही जे आत्ता कळत होतं ते त्यांच्यासाठी शाॅकिंग होतं. दोघांनाही काहीच सुचेनासं होतं. तितक्यात मिनुच्या वडिलांना मिनू तिथे आलेली दिसते. तिच्या लक्षात येऊ नये म्हणून दोघेही एका खांबा मागे लपतात. मिनुच्या वडिलांना मिनू आता डोळ्यासमोर दिसत होती त्यामुळे आता त्यांना तिची चिंता नव्हती पण आता मात्र त्यांना अवानीची काळजी वाटत होती. कारण सुहास काय चीज आहे हे त्यांना चांगलं ठाऊक होतं म्हणून ते अवनिला फोन लावतात आणि अवनीने फोन उचलताच,
‘ बेटा कुठे आहेस तू? ठीक आहेस ना ? तू प्लीज त्या माणसाच्या नादी लागू नकोस तो खूप डेंजर माणूस आहे. मला तुझा जीव धोक्यात जायला नको आहे.’
‘ काका, असं काहीच होणार नाहीये. माझ्या सोबत पोलीस आहेत त्यांनी पूर्ण बंदोबस्त लावलाय. मला काहीच करावं लागणार नाहीये. सगळं पोलीसच करणारेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं बाय!, मी पोहचलीये एअर पोर्टवर. सुहास अमाच्या ताब्यात आला की तुम्हाला कॉल करते.’
असं म्हणत अवनी फोन ठेवते आणि इकडे अंबरीश मिनुच्या वडिलांना विचारतो,
‘काका, मिनू आणि सुहासची काय भानगड आहे? तो तिचा बॉयफ्रेंड होता तर मग तिने अथर्वशी का लग्न केलं?’
समोर उभ्या असलेल्या मिनू कडे बघत ते सांगायला लागतात,
‘ मिनुने जेव्हा मला सुहासला भेटवलं होतं, तेव्हा सुहासने माझ्या मनावर खरंच खूप चांगली छाप पाडली होती. सगळं अगदी चांगलं चाललं होतं. जवळ जवळ तीन एक वर्ष हे दोघे रिलेशनमध्ये होते. पण एक दिवस अचानक मला भेटायला एक बाई आली. ती सुहासची आई होती. मी आधी विश्वास ठेवला नाही. कारण सुहासने तो अनाथ असल्याचं मला सांगितलं होतं आणि ती बाईही जराशी वेडगळ आणि व्यवस्थित वाटत नव्हती. आणि ती काहीही बरळत होती, की ‘तो माझा लेक आहे पण खूप हलकट आहे. त्याने माझ्या नवऱ्याला मला सांगून मारलं. त्यांना हार्ट अटॅक आला नव्हता. डॉक्टरच्या नावाला तो कलंक आहे. त्याने बापाला खाल्ला, मला येडं करून सोडलं. आता तो तुमच्या मुलीचंही वाटोळं करेल.
तिला दूर ठेवा ह्याच्यापासून. तुमचा सगळा पैसा खाईल हा’. असं ती बाई खूप काही बरळली. पण म्हटलं ना, माझा सुहासवर खूप विश्वास होता, त्यामुळे मला ते अजिबात खरं वाटलं नाही पण शेवटी मुलीचा बाप मी; म्हणून मी माझे कॉन्टॅक्टस वापरून त्याची सगळी कुंडली काढली तर, मी ही हादरलो.ती बाई जे काही म्हणत होती ते सगळं खरं होतं. सुहासचं रेकॉर्ड अजिबात चांगलं नव्हतं. त्याने त्याच्या बापाचा खून केला अशी त्याच्या आईनेच पोलिसात तक्रार केलेली होती पण पोलिसांना तसे काहीच पुरावे सापडले नव्हते. आणि अजून शाॅकींग गोष्ट म्हणजे सुहासवर अजूनही दोन लोकांचे खून केल्याचे आरोप होते पण नेहमी पुरावे नसल्याने तो सुटला होता. त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हा कसलंस औषध देतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक येऊन माणूस मरतो. पण ते सिध्द मात्र कोणालाच करता येत नाही.
हे सगळं ऐकल्यावर अशा माणसाच्या हातात थोडी ना मी माझ्या मुलीचा हात देणार होतो. आणि हे सगळं मी मिनुला सांगितलं असतं तर एकतर तिचा विश्वास नसता बसला आणि उलट तिने शहानिशा करायला म्हणून सुहासला हे सगळं सांगितलं असतं आणि तिचा स्वतःचा जीव धोक्यात घातला असता. म्हणून मी टीप देऊन सुहासचं ह्या शहरातलं अस्तित्व नाहीसं केलं आणि त्याला दुसऱ्या शहरात नेऊन टाकलं. आणि तो कधीही इकडे वापस येऊ शकणार नाही ह्याचा बंदोबस्त लावला. मिनुसाठी मात्र तो धोका देऊन अचानक गायब झाला असंच चित्र मी ठेवलं होतं’.
हे सगळं ऐकून अंबरीशच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी होते आणि त्याला आता थोडा थोडा सगळ्या गोष्टींचा संबंध लागायला लागतो. पण आता त्याला अवनीचि काळजी वाटायला लागते म्हणून तो तिला फोन करायच्या विचारात असतानाच अवनी पोलिसांच्या ताफ्यात सुहासला रेल्वे स्टेशनवर घेऊन येते. अंबरीश आणि मिनुचे वडील तिला बघताच तिच्या जवळ जातात. ती त्यांना बघून विचारते, ‘मिनू कुठंय?’. ते दोघंही तिथेच थोडं लांब उभी असलेल्या मिनुकडे बोट दाखवतात. अवनी मिनुजवळ जाते आणि मागूनच तिच्या पाठीवर हात ठेवत आवाज देते, ‘मिनू!’, ते ऐकून दचकूनच मिनू एक कटाक्ष अवनीकडे टाकते आणि लगेच तिथून पळायला लागते. तसं लगेच अवनी मोठ्या आवाजात ओरडते,
‘मिनू, सुहास आमच्या ताब्यात आहे. तो तुला एकटीला इथे सोडून एअरपोर्ट वरून पळून जात होता.’
मिनू पळता पळता हे ऐकुन क्षणभर थांबते आणि मागे वळून बघते तर अवनी पोलिसांच्या ताफ्यात उभ्या असलेल्या सुहासकडे बोट दाखवून तिकडे बघण्यासाठी मिनुला इशारा करते. सुहासला पोलिसांच्या ताब्यात पाहून मिनू गपकन खाली बसते. तिला आभाळ कोसळल्या सारखं वाटतं. अवनी पळत तिच्या जवळ जाऊन तिला पकडून पोलिसांजवळ घेऊन येते. तिला बघताच सुहास बोलायला लागतो, ‘मिनू ह्यांच्यावर विश्वास ठेवू नको. मी एअरपोर्ट वर नव्हतो. हे सगळे तुला काहीही खोटं सांगताय. मी इथेच स्टेशनवर…’
‘ए गप ए!’ अवनी खूप जोरात सुहासवर ओरडते आणि त्याच रागात ती मिनुला म्हणते.
‘तू ज्याच्यासाठी तुझ्या सख्खा नवऱ्याला सोडलंस, तो हा हा तुझा सुहास तुला एकटीला इथे सोडून चालला होता. दुसऱ्या देशात एकटाच. आणि एवढंच नाही तर आज त्याने मला आणि अंबरीशलाही जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. हे हे बघ अंबरीशची हालत’. असं म्हणून ती अंबरीशच्या पायाकडे बोट दाखवते. अवनीच्याच बोलण्याला पुढे नेत मिनुचे वडील तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडत तिला म्हणतात, ‘हो मिनू,अवनी म्हणते ते अगदी खरं आहे. ह्या माणसाने स्वतःच्या बापाचाही खून केलाय आणि म्हणून मिच ह्याला दोन वर्षांपूर्वी गायब केलं होतं’ असं म्हणत मिनुचे वडील आत्ताच अंबरीशला सांगितलेलं सुहास विषयीचं सत्य मिनुला सांगतात. ते ऐकून अवनीही अवाक् होते. आणि जेव्हा ते हार्ट अटॅक विषयी सांगतात तेव्हा अवनी लगेच म्हणते, ‘अंबरीश, मी म्हटलं नव्हतं तुला, की हार्ट अटॅक ने अथर्व जाणं कसं शक्य आहे म्हणून? आणि ह्याचाच अर्थ ह्याने अथर्वलाही ते औषध दिलं असणार आणि पोस्ट मारटम चे रिपोर्ट बदलले असणार. हे सगळं ऐकून इतक्या वेळ शांत बसलेली मिनू ओरडते,
‘बास. बस करा हे सगळं आता’.
मिनू ज्याच्यावर विश्वास ठेवून स्वतः च्या नवऱ्याला मारायला तयार झाली होती आणि स्वतःच्या वडिलांनाही एकट्याला सोडून जायला निघाली होती अश्या माणसाबद्दल तिला मागच्या काही मिनिटांत जे काही कळालं होतं त्याने तिचं पूर्ण जग उध्वस्त झालं होतं. तिला सुहासचा आणि तिचा प्रचंड राग येत होता. त्याच रागात ती सुहासच्या तिच्या सगळ्या शक्तिनिशी एक धोबडीत मारते आणि तशीच धुस्फुसत तिच्या बॅगमधून एक छोटी बाटली काढते आणि ती पोलिसांच्या हातात देत म्हणते, ‘ घ्या तुम्हाला कधीच ह्या माणसाबद्दल पुरावा मिळाला नाही ना. हे घ्या पुरावा. ही डायोक्सिनची बाटली आहे. ह्याचे काही थेंब कशात मिसळून कोणाला दिले की काही वेळातच हार्ट अटॅक येतो. आणि पोस्ट मारटम मध्ये हे विष डीटेक्टही होत नाही, हो ना सुहास? असं म्हणत ती सुहास कडे बघते आणि पोलिसांना म्हणते, ‘इन्स्पेक्टर , ह्याची गर्लफ्रेंड म्हणून एवढी एकच काय ती खरी गोष्ट ह्या माणसाने मला सांगितली आहे. अथर्वच्या घरच्या सीसी टीव्हीमध्ये तुम्हाला ह्याचा पुरावा सापडेल.’ हे बोलून झाल्यावर ती तिच्या वडीलांजवळ येऊन त्यांच्या समोर हात जोडत शरमेने मान खाली घालून म्हणते, ‘बाबा, मला माफ करा. माझं चुकलं. माझी जगायची काहीच लायकी नाहीये.’
असं म्हणून मिनू तिथून पळत पळत रेल्वे समोर उडी मारायला जाते. ती प्लॅटफॉर्म वरून उडी मारायच्या आत अवनी तिचा हात ओढून तिला वाचवते आणि तिच्या जोरात कानाखाली वाजवते. आणि खूप चिडून, संतापून अगदी हाय पीच मध्ये तिचे दोन्ही खांदे धरत तिला म्हणते, ‘अगं ए, डोकं फिरलंय का तुझं? तुला तुझ्या जीवाची पर्वा नसली तरी इथे असलेल्या प्रत्येकाला तुझ्या जीवाची काळजी आहे आणि म्हणूनच सकाळपासून मूर्खासारखे आम्ही स्वतःच्या जीवावर उदार होऊन तुला ह्या माणसाच्या तावडीतून वाचवायचा प्रयत्न करतोय. त्या अथर्वला तर संसराचं सुख नाही मिळू दिलंस तू, निदान आता तुझ्या वडिलांचा तरी विचार कर! तुझ्या शिवाय कोणीच नाहीये त्यांचं ह्या जगात.’ असं म्हणताच मिनू पूर्ण कोसळून अवनीच्या गळयात पडून खूप म्हणजे खूप रडते. १० मिनिटांनी तिला शांत करत अवनी म्हणते, ‘मिनू,अथर्व वाट पाहतोय ग तुझी. निदान त्याला शेवटचं बाय तरी नीट म्हण. त्याशिवाय तो नाही नीट जाऊ शकणार.’ अवनीच्या ह्या बोलण्याने तीच्यासाकट सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं.
पोलिस सुहासला घेऊन पोलीस स्टेशनला जातात आणि अवनी व अंबरीश मिनू आणि तिच्या बाबांसकट अथर्वचे अंतिम संस्कार करायला जातात. सगळ्या क्रिया आटपून ते सर्व मिनुच्या वडीलांच्या घरी येतात. सकाळपासूनच्या नाटकमय दिवसातून सुटका झाल्यासारखे अगदी थकून सगळे बसतात.पण अंबरीशच्या मनातले प्रश्न मात्र अजून संपलेले नसतात आणि म्हणून तो अवनीला एकदा शेवटचं विचारतो, ‘अवू, आता तरी संगणारेस का की तुला ह्या सगळ्या गोष्टी कशा कळाल्या ते? त्याला लगेच दुजोरा देत मिनुचे वडील म्हणतात,
‘हो! मला ही खूप नवल वाटतयं की ह्या सगळ्या गोष्टी तुला कशा कळल्या ते. तुला तर ह्यातलं काहीच माहिती नव्हतं.’ ह्यावर अवनी थोडीशी हसून अगदी सुरुवाीपासून सगळं सांगायला सुरू करते,
‘मीनुच्या वडिलांचा मला जेव्हा मिनुच्या आत्महत्येबद्दल आणि त्या फोटोंबद्दल सांगायला फोन आला तेव्हा जे सगळं दिसत होतं तेच मला वाटलं की अंबरीश आणि अथर्वने माती खाल्लिये आणि म्हणून मिनुने हे असं केलं. पण जेव्हा अथर्वचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं मला कळलं तेव्हा मात्र पहिल्यांदा शंका आली. अंबरीशच्या म्हणण्या नुसार अथर्व सुसायडल होत होता तर त्याच्या रिपोर्ट मध्ये त्याने सुसाइड केल्याचं काहीतरी यायला हवं होतं पण ते न येता हार्ट अटॅक आणि तो ही तू ज्या दिवशी आत्महत्या केली त्याच दिवशी? अवनी मिनू कडे बघत तिला उद्देशून तिचं बोलणं चालू ठेवते,
‘मला दुसरी शंका आली ती म्हणजे जेव्हा तू तुझ्यात आणि अथर्वमध्ये घडलेला प्रसंग सांगितलास तेव्हा.’
‘हो! ते सगळं तसं सांगायला मला सुहासनेच सांगितलं होतं.’ मिनू म्हणते.
‘हो ! काहीतरी चुकतंय हे माझ्या लक्षात येऊनच मी तुझ्या रूम मध्ये तेव्हा टेप रेकॉर्डर ठेवलं होतं.
पण तरीही नेमकं कोण खरं आणि कोण खोटं मला कळत नव्हतं. त्या फोटोज् मुळे मला अंबरीश आणि अथर्ववर, तर ते प्रसंग सांगताना आलेल्या वेगळेपणा मुळे मला तुझ्यावर संशय येत होता आणि म्हणून मी अथर्वच्या डॉक्टरांकडे जायचं ठरवलं.
मला पुन्हा शंका आली ती म्हणजे त्यांच्या क्लिनिकच्या खाली उभ्या असलेल्या ऑडीला बघून. म्हणजे तेव्हा मला काहीवेळापूर्वीच अंबरीशने तुमच्यात परवा घडलेला प्रसंग सांगितला होता त्यात नवी कोरी ऑडी बघून अथर्वला आनंद झाला होता आणि योगायोग म्हणजे तिथे क्लिनिकच्या खाली ही एक नवी कोरी नंबर पण न टाकलेली ऑडी होती.मला सुरुवातीला काही वेगळं वाटलं नाही पण जेव्हा मी रिसेप्शनिस्टचं रजिस्टर बघत होते तेव्हा तिथे आलेला एक पेशंट क्लिनिक मधली गर्दी पाहून सहज बोलून गेला की आधीच काल क्लिनिक बंद होतं आणि त्यात आज एवढी गर्दी. ते ऐकून मला नवल वाटलं. काल क्लिनिक बंद होतं तर मग फक्त अथर्वसाठी डॉक्टर क्लिनिकला आले होते? आणि हे खरं खोटं कळण्यासाठी म्हणून मी रजिस्टरच्या पानांचे फोटो काढले.
मला तेव्हाहीं सुहासबद्दल काही शंका आली नव्हती.पण जेव्हा त्याने मला भेटू शकत नसल्याची चिठ्ठी पाठवली तेव्हा मात्र माझी खात्री झाली की सुहासही ह्या सगळ्यात सामील आहे कारण सुहासने जे मला लिहून पाठवलं होतं ते अक्षर पूर्ण तिरकं तिरकं लिहिलेलं होतं. आणि काल अपॉइंटमेंट घेतलेल्या सगळ्या पेशंटचे नावही सेम त्याच अक्षरात आणि तशाच तिरक्या पद्धतीने लिहिले होते. त्यामुळे सुहास काहीतरी गडबड करतोय हे मला कळलं. कारण सुहसच्या रिसेप्शनिस्टचं अक्षर प्रत्यक्ष तो लिहिताना मी बघितलं होतं. आणि बाकी रजिस्टर मध्येही रिसेप्शनिस्टचच अक्षर होतं. त्यामुळे माझी खात्री पटली की इथेही काहीतरी पाणी मुर्तय. मी पुन्हा खाली आले तेव्हा ती ऑडी बघून मला अजुन एक गोष्ट लक्षात आली की, परवा जर मिनुनें नवी गाडी आणली नव्हती तर मग कोणी आणली होती? कारण मिनुला गाडी चालवता येत नाही हे मला माहिती होतं त्यामुळे 2 शक्यता होत्या एकतर परवा तिथे मिनू आणि अथर्व व्यतिरिक्त अजून एक व्यक्ती होती आणि तिचीच ती गाडी होती नाहीतर ती गाडी मिनुच्या वडिलांची च असावी आणि मिनू ती तिकडे घेऊन आली असावी. आणि म्हणूनच ती कार मिनुच्या वडिलांची आहे की नाही हे चेक करण्यासाठी म्हणून मी मिनुच्या वडिलांच्या घरी जाणार होते आणि लकीली अंबरीश ही तिकडेच होता.’
हे सगळं ऐकून अंबरीशला बरयच गोष्टींचा अर्थ लागत होता आणि ते उलगडत तो म्हणाला,
‘ गाॅट इट! म्हणजे तू त्या कार बद्दल माहिती काढून घ्यायला म्हणून इथे काकांच्या घरी आली पण इकडे यायच्या आधी तू रेड लाइट एरियात गेल्याने आणि तिथे अर्धवट कळलेल्या माहिती मुळे तुला कधी एकदा मला भेटेल आणि त्याबद्दल विचारेल असं झालं होतं म्हणून तू मला भेटलीस आणि गाडीत बसून सगळी हकीकत ऐकलीस पण ह्या नादात तुझं गडीबद्दलची चौकशी करायची राहिल्याने तू पुन्हा गाडीतून उतरून ते विचारायला चालली होतीस आणि तितक्यात आपल्यावर हल्ला झाला.’
‘ येस ! अगदी बरोबर. आणि त्या हल्ल्याने माझ्याकडे काही ठोस पुरावा नसतानाही माझा विश्वास बसला की तो डॉक्टरच खुनी आहे किंवा त्याचा मेजर ह्या सगळ्याशी संबंध आहे. आणि त्याच्या क्लिनिक मध्ये सीसी टीव्ही असल्याचं मी तिथून निघताना नोटीस केलं होतं त्यामुळे मला हे माहीत होतं की जर हा खुनी असेल तर त्याला आता हे नक्की कळलंय की मी काहीतरी शोधत इथे आले होते त्यात रजिस्टरचे फोटो काढताना आणि चिठ्ठी सांभाळून ठेवताना त्याने मला सिसी टीव्हीमध्ये बघितलं असणार सो हा माझ्यावर आता नक्की हल्ला करणार आणि झालंही तसंच.
मी म्हणून अपल्यावर हल्ला झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये जायला नाही म्हटले होते. कारण हा डॉक्टर असल्याने तो कोणत्याही हॉस्पिटल मध्ये काहीही करू शकला असता. आपल्या जिवाला पुन्हा धोका निर्माण झाला असता’.
अंबरीशला सगळं उलगडत होतं. म्हणून त्याला आनंद वाटत होता. तो त्याच आनंदात म्हणला,
‘ओह् आय सी!!! तू म्हणून मला अथर्व गाडीच्या रांगाबद्दल काही बोलला का ते विचारलं होतास! येस! येस !आता सगळ्या गोष्टी क्लिअर हितातेत मला. पण मला एक सांग, मी हे सांगितल्यानंतर तू ते टेप रेकॉर्डिंग ऐकलं. ते ऐकुन तुला काय कळालं होतं ग?’
‘अरे, मी ते रेकॉर्डिंग आधीही ऐकलं होतं पण त्यात मला काही विशेष वाटलं नव्हतं पण जेव्हा तू गाडीचा रंग कन्फर्म केला तेव्हा मला बॅक ट्रेस झालं की, मी क्लिनिकमध्ये होते त्याच वेळात मिनुच्या रूममध्ये मोबाईलच्या दोन रिंग वाजल्या होत्या. एक नक्कीच काकांच्या मोबाईलची होती कारण त्यांच बोलणं स्पष्ट रेकॉर्ड झालं होतं पण त्याच वेळेला मिनुचं ‘नाही नको’ म्हटलेलं ही रेकॉर्ड झालं होतं. त्यामुळे मला खात्री वाटत होती की सुहासनेच तेव्हा तिला फोन केलेला असणार…
‘हो सुहासनेच मला फोन केला होता. तू अलियेस हे सांगायला आणि तुला भेटू की नको हे विचारायला तेव्हा मी फक्त नाही नको एवढंच बोलले होते. मिनू म्हणली.
‘हो पण मला हे सगळं नक्की माहित नव्हतं आणि त्याला ठोस पाठबळ नव्हतं. सगळं माझ्या अंदाजावरच चाललं होतं. म्हणून मी 2 गोष्टी केल्या, एकतर तेजसला कॉल रेकॉर्डस काढायला सांगितले आणि काकांना सुहासचा फोटो गुगल करून पाठवला’.
‘पण सुहास आणि मिनुचा काही संबंध असू शकतो हे कसं काय तुझ्या डोक्यात आलं? अंबरीश खूप उत्सुकतेने तिला विचारतो.’
अवनी जराशी हसतच म्हणते, ‘अरे आम्ही नेहमी हसत म्हणतो की ये सब क्रिमिनल केसेस मे एक तो पैसे का लोच्या निकालता हैं नहि तो छोकरी का ‘ सो हे एक लॉजिक मी लावलं आणि बाकी सगळ्या घटनांचा विचार केला तर बाकी कोणत्याच शक्यता मला दिसत नव्हत्या. आणि मला जास्त डोकं लावायची गरज पडली नाही कारण तेजसने कॉल रेकॉर्डस काढले तेव्हा सुहासने मिनुला केलेला फोन ट्रेस झाला होता. आणि ह्या दोघांचा काहीतरी संबंध आहे हे ही स्पष्ट झालं होतं.’
सगळं शांत पाणे ऐकणारी मिनू आता अवनीला विचारते, ‘पण मी रेल्वे स्टेशन ला जाणार हे तुला कसं कळलं?’ आणि त्याला लागूनच मिनुचे बाबा विचारतात, ‘आणि हो सुहास एअरपोर्टला आहे हे ही कसं कळलं?’
‘सुहाससाठी मी खून्याचा घेत असलेला शोध पूर्ण बाउन्सर होता. कारण त्याला वाटलं होतं की नेहमी सारखं हार्ट अटॅक आणि विषय तिथेच संपेल पण माझ्या ह्या शोधामुळे त्याला कळून चुकलं होतं की काहीना काही गडबड होणार आहे. त्यामुळे त्याने शेवटच्या क्षणी मिनू सोबत न जायचा निर्णय घेतला आणि फ्लाईटचं बुकिंग केलं आणि हे सगळं खूप गडबडीत झाल्याने त्याने त्याच्या मोबाईलवरूनच तिकीट बुकिंगसाठी एजेंटला कॉल केला होता .त्यामुळे हे कळलं की तो एअर पोर्टला असणार आहे.पण त्याचं लोकेशन त्रेस होईल म्हणून त्याने त्याचा फोन मात्र कधीतरी मिनू जवळ दिला आणि तिचा फोन बंद करायला लावला. हो ना मिनू?’
‘हो!, मी हॉस्पिटलमधून पळाले तेव्हा सुहास मला घेऊन रेल्वे स्टेशन जवळच्या एका लॉज मध्ये गेला आणि मला फ्रेश होऊन ट्रेनच्या वेळात स्टेशनला यायला सांगितलं. आणि तो थेट त्याचे कामं आटपून स्टेशनला येईल असं सांगितलं. माझा फोन बंद करून तो स्वतः घेऊन गेला आणि त्याचा फोन मला दिला’.
हे सगळं ऐकून झाल्यावर अंबरीशचा अवनी विषयीचा रिस्पेक्ट प्रचंड वाढला होता. पण इतक्या वेळ सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या अवनीचा मात्र एक प्रश्न अजून अनुत्तरितच राहिला होता त्यामुळे ती गंभरतीने विचारते, ‘पण मला एक गोष्ट अजून कळाली नाहीये, की माझ्या डोक्यात सगळ्या शंकांची सुरुवात ज्या फोटोंनी केली ते फोटोज् काका तुम्हाला कसे मिळाले?’
त्यावर सकाळपासून अवनिला सतत फक्त प्रश्न विचारणाराा अंबरीश एकदम उत्साहाने म्हणतो, ‘ह्या एकाच प्रश्नाचं उत्तर मी कदाचित देऊ शकतो. असं म्हणत तो मीनुच्या बाबांकडे बघतो आणि म्हणतो, ‘काका खरं सांगा, आमाची माहिती काढायला तुम्हीच टीप दिली होती ना आमची?’
त्यावर मिनुचे बाबा हसत हसत म्हणतात, ‘ हो! मिच टीप दिली होती. मिनू अशी अचानक घरी आली होती आणि अथर्वही तुझ्या घरी गेला होता त्यामुळे काहीतरी गडबड आहे असं वाटलं होतं. म्हणून मी सहजच टीप दिली होती खरंतर..’
त्यांच्या सहज टीपची गोष्ट ऐकुन सगळे सकाळपासून पहिल्यांदाच इतके मनमोकळे पणाने हसतात.
मित्रांनो आयुष्यात प्रेम करणारे लोक एकवेळ तशे सहज भेटतील पण रिस्पेक्ट करणारे लोक मिळणं कठीण. मला माहितीये हा विचार कदाचित कोणाला पटणार नाही पण बघा ना आपलं आपल्या निर्जीव वस्तूंवर पण प्रेम असतं, पण त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट असतो का हो?
पण त्याउलट आपल्याला ज्यांच्या बद्दल रिस्पेक्ट असतो त्यांच्याबद्दल प्रेम आपसूकच निर्माण होतं. प्रेम सहवासाने किंवा अजून कशाने आपसूक निर्माण होऊ शकतं पण रिस्पेक्ट मात्र निर्माण करावा लागतो, तो जपावा लागतो आणि वाढवावा ही लागतो. आपल्याला वाटतं प्रेम संपलं म्हणून लोक वेगळे होतात पण खरंतर रिस्पेक्ट संपला म्हणून लोक वेगळे होत असतात. प्रेम संपत नसतं. रिस्पेक्ट मात्र संपतो. तेव्हा प्रेम टिकवण्यासाठी जसे कष्ट घेता तसे रिस्पेक्ट टिकवण्यासाठी सुध्दा घ्या.
-समाप्त
-प्रांजली कुलकर्णी