अवनी अथर्वच्या डॉक्टरांकडे पोहचते. त्यांच्या क्लिनिक मध्ये बरीच गर्दी असते.ती गर्दी बघून ती तिथल्या रिसेप्शनिस्टला डॉक्टरांना अर्जंट भेटायचं आहे असे सांगते आणि तिथल्याच एका कागदावर
‘नमस्कार डॉक्टर! तुमचा पेशंट अथर्व आज सकाळीच हे जग सोडून गेला. मला त्याबद्दल तुमच्याशी अर्जंट बोलायचं आहे.
– अथर्वची फॅमिली फ्रेंड अवनी- ‘
असं लिहून ती चिठ्ठी आत डॉक्टरांना नेऊन द्यायला सांगते. रिसेप्शनिस्ट ती चिठ्ठी घेऊन आत जातो. त्या संधीचा उपयोग करून अवनी त्याची पाठ फिरता क्षणीच तिथलं पेशंटच्या अॅपोइंटमेंटचं रजिस्टर चाळते. जणू असं करायचं ती ठरवूनच आली असेल. पान पलटताच तिला कालच्या शेवटच्या पेशंटचं म्हणजेच अथर्वचं नाव तिथे दिसतं.आणि त्यासमोरच त्याची आणि विझिटर म्हणून अंबरीशची सही दिसते. त्यामुळे जरा तिच्या जीवात जीव येतो. ती उगाच त्या पानाचा फोटो काढून ठेवते आणि लगेच पटापट आणखीन मागचे पानं पलटते आणि आठ दिवसांपूर्वीचा ही रेकॉर्ड चेक करते तर त्यातही तिला अथर्वचं नाव दिसतं आणि त्या दोघांच्या साह्याही दिसतात.
ती त्या पानाचाही फोटो काढते आणि पुन्हा ते रजिस्टर होतं तसं ठेवून देते. अवनीचं हे सगळं करूनही वरचे 5 मिनट होतात तरी आत गेलेला रिसेप्शनिस्ट बाहेर येत नाही.ती त्याची वाट बघत तिथे थांबते. आणखीन दोन मिनिटांनी रिसेप्शनिस्ट बाहेर येऊन तिला सांगतो की, डॉक्टरांचा नुकताच आत्ता एक इंटरनॅशनल कॉल चालू झाला आहे, त्यामुळे त्यांना जरा वेळ लागेल. पण डॉक्टरांनी ही चिठ्ठी दिली आहे असं सांगत तो तिच्या हातात एक चिठ्ठी देतो. त्यात लिहिलेलं असतं,
‘ हे खूप धक्कादायक आहे. कालच रात्री आम्ही भेटलो होतो. तुम्ही प्लिज जरा वेळ बसा . माझा कॉल संपला की बोलुयात.’
ते वाचून अवनीचा जरा हिरमोड होतो.पण काल अथर्व आणि अंबरीश इथे येऊन गेल्याचा तिला पुरावा मिळाला होता. ते ही दोनदा. एकदा त्या रजिस्टर मधून आणि दुसऱ्या त्या चिठ्ठी मधून त्यामुळे तिची एक शंका तरी दूर झालेली असते.
आता फक्त अथर्व डॉक्टरांशी मिनू बद्दल काही बोलला होता का? आणि त्यातून तिला काही क्लू मिळतोय का हे तिला विचारायचं होतं. अवनी तिथे जवळ जवळ अर्धा पाऊण तास थांबते पण तरीही डॉक्टरांचा कॉल संपत नाही आणि अजूनही किती वेळ लागेल ह्याची शाश्वती नसते त्यामुळे अवनी तिथून निघायचं ठरवते. कारण तिला ह्या सगळ्या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावायचा असतो. ती रिसेप्शनिस्ट कडून डॉक्टरांचा नंबर घेते आणि ती निघत असल्याचा निरोप डॉक्टरांना देऊन तिथून निघते.
अथर्वच्या डॉक्टरांकडे येऊन अवनीची थोडी खात्री होते की अंबरीश तिला जे काही सांगतोय ते निदान काहीतरी खरं आहे. तिच्या डोक्यात जी शंका येत होती की अंबरीश तिला सगळं खोटं सांगत असेल का, तर त्या शंकेचं थोडं निरसन तिचं झालं होतं; हो! पण पूर्ण नाही .अजूनही खूप प्रश्न अनुत्तरित होते. आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी अवनी तिचा मोर्चा आता त्या रेड लाईट एरिया कडे वळवते. तिकडे पोचेपर्यंत अवनी गाडीत मिनुच्या रूममध्ये तिने ठेवलेल्या टेप रेकॉर्डर वरचं तिच्या मोबाईल मध्ये डायरेक्ट सेव्ह झालेलं आत्तापर्यंतचं रेकॉर्डिंग ऐकते. त्यात तिला काही वेगळं जाणवत नाही.
मिनुचा आणि तिच्या वडिलांचं बोलणं, तिच्या रूम मधले सगळे आवाज, मिनूच्या वडिलांचा सतत वाजणारा फोन आणि सर्वात शेवटी ‘ नाही नको ‘ असं म्हटलेलं मीनुचा आवाज असंच सगळं त्यात तिला ऐकायला मिळतं .त्यामुळे अजूनही म्हणावं तसं आवनीच्या हातात काही लागलेलं नव्हतं. त्यामुळे अजूनही सगळ्या गोष्टींचा संबंध लावायचा प्रयत्न अवनी करत होती आणि त्यातच ती त्या रेड लाईट एरियात येऊन पोचते. क्षणभर तिच्या पोटात गोळा येतो पण ‘ह्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये’ असं स्वतःला समजावत अवनी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करते.
ती गाडीच्या खिडकीची काच खाली करून एकदा आजूबाजूला नजर टाकते. प्रथमदर्शनी तिला काहीच वेगळं वाटत नाही .पण पुन्हा जेव्हा ती रस्त्याच्या पलीकडच्या एका इमारतीवर नजर टाकते तेव्हा तिला तिथल्या प्रत्येक बल्कनीत माणसं नाहीतर बायका उभे असलेले दिसतात. त्यांना बघून ती एकदम तिची काच वर करते, कारण सगळे जण तिच्याच कडे बघत असल्याचं तिला जाणवतं. तिला त्याचक्षणी तिथून निघून जायची इच्छा होते पण ती मनाचा निग्रह करून तिथेच थांबते. एवढ्या मोठ्या एरियात त्या फोटोतल्या बायकांना कसं शोधायचं असा विचार अवनी करत असतानाच तिच्या गाडीजवळ एक भडक पिवळ्या रंगाचा झालर असलेला सो कॉल्ड वन पिस घातलेली एक काळी कुळकुळीत मुलगी तिच्या खिडकी पाशी येते आणि
‘क्या चाहीये मॅडम?’ असं विचारते. अवनी थोडीशी गोंधळून आणि घाबरून तिच्याकडे बघते. ती मुलगी अवनी कडे बघून एक छानशी स्माईल देते. ते बघताच देव जाणे का, पण अवनी थोडी रिल्यॅक्स होते आणि तिला विचारते,
‘माझी मदत करशील?’ तसं त्यावर ती म्हणते,
‘क्यू?, तेरे लिये कोई होना मंगता हैं क्या?’ त्यावर अवनी लगेच ‘नाही नाही! मला तसं काही नकोय. मी ह्या २ मुलींना शोधतिये त्या कुठे सापडतील ते सांगशील का मला प्लिज?’ असं म्हणत अवनी अंबरीशचा आणि त्या मुलीचा तिच्या मोबाईल मध्ये असलेला फोटो तिला दाखवते. तो बघताच ती मुलगी तिच्याकडे साशंक होऊन बघते आणि विचारते, ‘क्यू इससे क्यू मिलना हैं तूमको?’ त्यावर अवनी तिचं पत्रकार असल्याचं आय कार्ड दाखवते आणि म्हणते की,
‘इंटरव्ह्यू लेना हैं उसका’.
‘क्यू मेरा नही चलेगा क्या?, मैं भी तू प्रोस्टीट्युट ही हू’.
ह्या प्रश्नावर काय रिअॅक्ट करायचं हे अवनीला काहीच कळत नाही.अवनी अशा कोणत्याच प्रश्नासाठी तयार नव्हती. त्यामुळे ती गोंधळून काहीच बोलत नाही. आवनीचा गोंधळलेला चेहरा बघून ती हसायला लागते आणि म्हणते,
‘क्या मॅडम, मजाक कर रही थी मै! वैसे भी ये शीला उसको एडस् होने के बाद बाहुत फेमुस हो गयी हैं. तुम्हारे जैसे कई लोग आके उसका इंटयरव्ह्यू लेते हैं और कहा कह छापते हैं. चलो, दिखाती हू उसका घर’. असं म्हणत ती चालायला लागते. तशी अवनिही पटकन गाडीतून उतरून तिच्या मागे, पण थोडीशी सोबत चालायला लागते आणि तिला विचारते,
‘तुम्हारा नाम क्या है?’
‘रज्जो!’ ती उत्तर देते आणि विचारते,
‘आप क्यामेरामेन साथ मैं नहीं लायी?’
‘आ ? नही! मतलब मुझे सिर्फ बात करनी हैं.’ असं म्हणताच रज्जो जरा वेगळ्या नजरेने तिच्याकडे बघते. तसं अवनी दचकून तिला विचारते, ‘क्यू क्या हुसा?’
‘कुछ नहीं. हमारे एरिये मैं पहिली बार कोई शरीफ लडकी को बिना कोई लडके के साथ देख रही हु इसीलिये थोडा अजीब लग रहा हैं’.
अवनी जराशी ऑक्वर्ड होते. तशी रज्जो तिच्याकडे वळून तिच्या नजरेला नजर देऊन म्हणते,
‘मॅडम यहा हमारे पास सवाल लेकर तुम्हारे जैसे बहोत रिपोर्टर आते हैं. हम उनके सावलोंका जवाब भी देते हैं, पर हमारे सावालोंके जवाब लेकर कोई वापस नहीं आता. पर आप वापस जरूर आना हां. आप सबसे अलग लग रहे हो’.
असं म्हणत ती रस्त्याच्याच कडेला असलेल्या एका खोलीकडे बोट दाखवत म्हणते, ‘ये रही शीला की खोली’. अवनी नुसती मान हलवत आणि स्माइल देत तिला थैंक यू म्हणते. रज्जो जाता जाता जोरात ‘ ए शीला देख तेरे पास कौन आया हैं’ असं मोठ्याने ओरडत तिथून निघून जाते. रज्जोचा आवाज ऐकत शीला बाहेर येते आणि अवनिला बघताच काहीश्या आनंदातच तिला विचारते, ‘तुम अवनी हो ना?’ हे ऐकुन अवनी एकदम चमकते आणि नकळत हो अशी मान हलवते. तशी ती आणखीनच खूश होत तिचा हात पकडत तिच्या आजूबाजूला बघत तिला विचारते, ‘अंबरीश भैया कहा रह गए?’
‘अंबरीश भैय्या???’ अवनी आश्चर्यच्या धक्क्यानेच विचारते.
‘हां अंबरीश भैय्या! वो बोले थे की परसो तेरे अवनी भाभी को साथ मे लेकर् आऊंगा कर के’
‘काय?? मला घेऊन इथे येणार असं म्हणाला अंबरीश तुला?’
‘हा! पर वो रात को आउंगा ऐसा बोले थे. मतलब मेरे रानी को भी आपसे मिलवाना था ना. अभी रानी कालेज को गयी हैं ना. पर कोई बात नहीं, आप अंदर तो आओ’.
अवनीसाठी आजच्या दिवसातला हा आणखीन एक धक्का होता. आणि अर्थातच तिचं डोकं पुन्हा बंद झालं होतं. अवनी शिलाच्या हातातून स्वतःचा हात सोडवत तिला म्हणते,
‘नही! मैं इधरही ठीक हुं.’
अवनीला बघून शीला एवढी खूश दिसत होती की तिला बघून अवनी तिला काय विचारायला आली होती हे काही काळ साफ विसरते. कारण तिला बघितल्यापासून शिलाच न थांबता सतत बोलत असते. ती म्हणते,
‘अरे भाभी, आप बहुत नासिब्वान हो की आपको अंबरीश भैय्या जैसा मरद मिलने वाला हैं’.
अवनील काहीच कळत नाही नेमकं हे सगळं काय चालय आणि त्याच गोंधळात ती शीलाला विचारते,
‘आपको कैसे पता मैं अवनी हुं करके?’
अरे, अंबरीश भैयाने आपकी फोटू दिखाई थी ना रानी को और मेरे को. और हमारे साथ भी उन्होने फोटू निकाले थे’.
‘त्याने स्वतः तुमच्या सोबत फोटो काढले?’
‘हा ! आप ही को तो दिखाना था उनको मेरी रानी का फोटू. इसिलिये तो उन्होंने फोटू निकाले हमारे साथ’.
शीला बोलत असतानाच तिथे एक माणूस येतो. त्याला पाहताच इतक्या वेळ आनंदी असलेल्या शीलाचा चेहरा पडतो आणि ती खूप घाबरते, आणि तेवढ्याच भीतीने ती अवानिला म्हणते
भाभी आप भागो! जलदी से यहा से जाओ.. वरना ये आदमी आपको भी नहीं छोडेगा’.
अवनी प्रचंड घाबरते.तिला काय करावं ते काहीच सुचत नाही. शीला अक्षरशः अवनीला तिकडून जा म्हणून ढकलते.अवनी तशीच घाबरून तिच्या कारकडे पळते आणि धापा टाकत गाडीत बसते आणि त्याच घाईत गाडी काढून तिथून निघते.
क्रमशः भाग ८ वाचा : https://wachankatta.com/marathi-story-respect-4/
-प्रांजली कुलकर्णी