• Sat. Dec 21st, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

RESPECT / रिस्पेक्ट भाग-५

Bywachankatta

May 2, 2021
marathi story, LOVE STORY

अथर्वच्या पोस्ट मार्टमच्या रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण मॅसिव हार्ट अटॅक असं लिहिलेलं असतं.२८ वर्षाचा अथर्व मॅसिव हार्ट अटॅकने जाऊ शकतो हे अवनीच्या मनाला आणि बुद्धीलाही पटत नव्हतं. म्हणून ती अंबरीशला म्हणते, ‘अंबरीश, हा नक्की त्याचाच रिपोर्ट आहे ना? नाव चेक केलंस का तू? मला झेपतच नाहीये यार हे सगळं!’. असं म्हणत अवनी त्याच्याकडे बघते तर तो मात्र दाराकडे एकटक पाहत त्याच्या विचारात गढलेला असतो. अवनी त्याला भानावर आणत  विचारते, ‘तुला पटतय का रे हे सगळं? अथर्वचं तर सगळं छान चालू होतं ना रे!. उलट लग्न झाल्यापासून किती खूश असायचा तो. त्याच्या डॉक्टरांनिही त्याचं कौतुक केलं होतं की हा लग्न झाल्यापासून अजून चांगल्या पद्धतीने त्याचं डिप्रेशन कॅरी करतोय म्हणून; हां फक्त आत्ता मी मझ्या टूरला जायच्या  दरम्यानच कधीतरी त्याला पॅनिक अटॅक आला होता. पण बाकी सगळं ओकेच होतं ना त्याचं?

‘नाही अवू, सगळं ओके नव्हतं. त्याने मिनुचं वागणं फार मनाला लावून घेतलं होतं’.

‘कोणतं वागणं?’

‘अवू, आठ दिवसांपूर्वी अथर्व माझ्याकडे राहायला आला तेव्हा तो मला बोलला की मागच्या पाच महिन्यांपासून मिनू आणि त्याच्यात नवरा-बायको सारखे काहीच संबंध नाहीयेत. मिनू त्याला थोडं सुद्धा त्याच्या जवळ येऊ देत नाहीये’.

‘व्हॉट? पण असं का? काही झालंय का त्यांच्यात? आणि मी जाईपर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं ना? आणि मी गेले तरी सगळ्यांशी बोलतच होते .मला एकदाही जाणवलं नाही त्यांच्यात काही झालंय म्हणून .हा फक्त मागचे आठ दिवस माझी वर्क प्लेस खेड्यातली आणि त्यात तिथे कोणतंच नेटवर्क नसल्यामुळे मी तुमच्या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट मध्ये नव्हते. पण ह्या ८ दिवसात किती काय काय झालंय असं वाटतंय आता मला.असो! ते सोड. पण तू विचारलस का अथर्वला की नेमकं काय कारण आहे तिचं तसं वागायचं? आणि तुझ्या पण कसं रे काही लक्षात नाही आलं?’

‘अगं अवु, मागच्या काही महिन्यांत तो जेव्हाही मला अस्वस्थ वाटला तेव्हा मी त्याला विचारायचा प्रयत्न केला की तो फक्त काही नाही रूटीन प्रेशर्स आहेत इतकंच म्हणायचा.त्यात सध्या वर्क लोडही जास्त आहे त्यामुळे घरी जायला उशीर मग मिनुची चीड चीड असं सांगायचा आणि मागच्या काही महिन्यात त्याचे डॉक्टरकडेचे सेशन्स पण वाढले होते त्यामुळे आम्हाला वेळही मिळत नव्हता भेटायला आणि बोलायला. पण आत्ता ८ दिवस आम्ही सोबत होतो तर त्याने हे सगळं सांगितलं मला’.

‘पण त्याने मिनुशी बोलायचा प्रयत्न केला का?; की ती का अशी वागतिये म्हणून?

‘हो खूपदा केला, पण मिनू त्याला काहीच ठाव लागू देत नव्हती. तिचं नुकतंच प्रमोशन झाल्यामुळे तिला ऑफिसमध्ये ही अशात जास्त वेळ थांबावं लागत होतं. त्यामुळेही कदाचित असं होत असावं असं अथर्वला आधी वाटत होतं. पण पर्वाच्या प्रसंगाने मात्र तो खूपच बिथरला होता आणि म्हणूनच वेड्या सारखा नको तितकी दारू पिऊन त्या रेड लाईट एरियात गेला होता’.

अंबरीशचं बोलणं संपायच्या आतच आवनीचा फोन वाजलेला असतो. मोबाईलवर मिनुच्या वडिलांचं नाव दिसल्याने तिला आत्ता कितीही अंबरीशचं बोलणं मध्ये तोडायची इच्छा नसली तरी तिला तसं करावं लागतं. ती त्याचं बोलणं मध्ये थांबवत मिनुच्या वडिलांचा फोन घेते.

‘अवनी, मिनू माझ्याशी काहीच बोलायला तयार नाहीये ती फक्त तुझ्याबद्दल विचारत आहे तेव्हा प्लीज ताबडतोब इकडे ये आणि तिला विचार हे सगळं का केलंस ते’.

‘मिनुच्य विडिलांचा असा तातडीचा फोन आल्याने ते दोघेही तिकडे जायला निघतात. हॉस्पिटलजवळ पोहचताच अवनी अंबरीशला म्हणते ‘तू गाडीतच थांब. मी एकटीच जाते मीनुला भेटायला.’

पुन्हा मिनुच्या वडिलांचा आपल्यामुळे पारा चढला तर आणखी तमाशा नको व्हायला असं म्हणून अंबरीशही अवनी म्हणते तसा गाडीतच थांबतो.

अवनी मिनुला भेटायला तिच्या रूम मध्ये जाते. तिला बघताच मिनू रडायला लागते. अवनी तिच्या बेडच्या बाजूला स्टूल घेत त्यावर बसत तिचा हात हातात पकडते आणि तिला म्हणते,’मिनू इतकं मोठं पाऊल उचलणं गरजेचं होतं का ग? माझ्याशी एकदा तरी बोलायचं होतंस ना यार!’

‘अवनी काय सांगणार होते ग मी तुला? की माझा नवरा पाशवी आहे? तो माझ्यावर बळजबरी करतो की तो बाहेर शेण खातो म्हणून? आणि असं अजून कितीतरी…’

असं म्हणत मीनू आणखीनच रडायला लागते. अवनीला आज प्रत्येकाचं बोलणं एक नवीन धक्का देत होतं. तिला त्या क्षणी क्षणभर वाटून गेलं की ही ह्या कोणालाच ओळखत नाही. ती काहीच न बोलता तशीच शांत पणे मिनुचं बोलणं ऐकत राहते…

‘अवनी, परवा तर कहर झाला.’

‘काय झालं परवा?’ अवनी जरा अधिरतेने आणि उत्सुकतेनेच मिनूला विचारते.

‘परवा मी माझी ऑफिसची एक फाईल घ्यायला म्हणून आमच्या म्हणजेच अथर्वच्या घरी गेले होते. मी मागच्या काही दिवसांपासून बाबांकडेच राहत होते त्यामुळे मला फाईल घ्यायला घरी जावं लागलं. मला तेव्हा बाथ घ्यायची जाम इच्छा झाली म्हणून मी नुकतीच बाथ घेऊन आले होते. तितक्यात अथर्वही तिकडे आला. तो अंबरीशकडे राहायला गेला होता त्यामुळे त्याला तिथे असं अचानक बघून मी ही थोडी गोंधळले. पण मला काही समजायच्या आतच तो मझ्याजवळ येऊन मला किस करायला लागला .मला हे सगळं नको होतं, मी तसं त्याला मागे ढकललं, तर तो चिडला आणि माझा गळा दाबायला लागला. मी पूर्ण शक्तिनिशी त्याला ढकललं आणि त्याला खूप आद्वा तद्वा बोलले. माझी गेल्या 5 6 महिन्यांची मी भडास काढली आणि त्याला धक्के मारून पोलिसांची भीती दाखवत घराबाहेर हाकलून दिलं’.

आज सकाळपासूनच घडणाऱ्या घटनांनी अवनी गोंधळली होती पण घाबरली नव्हती. पण मिनुचं हे बोलणं ऐकल्यानंतर मात्र आज सकाळपासून पहिल्यांदाच अवनी घाबरली होती; कारण आत्ता हॉस्पिटलमध्ये येताना अंबरीशने तिला परवा अथर्व आणि मिनू मध्ये काय घडलं हे सांगितलं होतं. आणि मिनू आत्ता जे काही सांगत होती ते त्यापेक्षा खूप वेगळं होतं. त्यामुळे तिला आता ह्याची पूर्ण कल्पना आली होती की ह्या सगळ्या घडणाऱ्या घटना नैसर्गिक नक्कीच नाहीयेत. कुठे तरी पाणी मुरतय.पण नेमकं कुठे? नेमकं कोण खोटं बोलतंय? अथर्व की मिनू?

अवनी सुन्न झाली होती. तिची शून्यात नजर लागली होती. तिची ही अवस्था बघून मिनू तिच्या डोळ्यासमोरून हात फिरवत म्हणते, ‘काय झालं? ऐकतेस ना तू?

‘हो हो बोल तू! हे सगळंच सुन्न करणारं आहे मिनू, त्यामुळे माझंही डोकं बंद झालंय .पण मी ऐकत आहे. बोल तू! अवनी असं बोलल्यावर मिनू पुढे सांगते,

‘अवनी, जरी आमचं अरेंज मॅरेज असलं आणि आमचा फार काही सहवास अजून झाला नसला तरी तुला माहितीये माझं किती प्रेम आहे अथर्व वर ते. त्यामुळे परवाचा त्याने मला मारण्याचा केलेला प्रसंग माझ्या खूप जिव्हारी लागला. मला असं वाटलं की ज्याच्यावर आपलं सर्वात जास्त प्रेम आहे तोच आपल्या जीवावर उठलाय, तोच आपल्याकडे अशा पाशवी वृत्तीने बघतोय तर काय अर्थ राहिलाय जगण्याला. आणि ही गोष्ट कोणाला सांगता येण्यासारखीही नव्हती. मला आई नाही! तू सोडलीस तर कोणी जवळची मैत्रीण नाही! मग मी कोणाला सांगणार होते हे सगळं? बाबांना कसं सांगणार होते हे सगळं की तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलीसाठी शोधलेला हा मुलगा असा आहे म्हणून? आणि म्हणून मी माझं आयुष्य संपवायचा निर्णय घेतला. शेवटी मी खरं प्रेम केलंय अथर्ववर; पण आता तो देत असलेला त्रास मी सहन पण करू शकत नव्हते आणि त्यब्बदल बोलूही शकत नव्हते आणि म्हणून मी हे असं…..’ आणि मिनू रडायला लागते. अवनी हे सगळं ऐकून शॉक लागल्या सारखी तिथून उठते आणि एक हात कमरेवर ठेवत आणि दुसऱ्या हाताने स्वतः च्या कपाळावर मारत म्हणते, ‘भयंकर ए यार हे सगळं मिनू..खूप भयंकर!’

अवनी स्वतःशीच काहीतरी विचार करते आणि तिच्या पर्स मधला तिचा मोबाईल काढत मिनू जवळ जात तिला म्हणते, ‘मिनू, आत्ता मला तू सुखरूप आहेस ह्यातच जास्त आनंद आहे. बाकी तू हे जे काही मला आत्ता सांगितलं आहेस ना ते सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. पण एवढं नक्की की, काहीही झालं तरी मी आहे तुझ्या सोबत. त्यामुळे तू काळजी घे. पण मला आत्ता मात्र ऑफिसला जावं लागणार आहे. मी आजच आले आहे आणि आणखीन ऑफिसला रिपोर्ट ही केलं नाहीये सो मी तेवढं करून येते. तू तोपर्यंत काळजी घे. असं म्हणत ती मिनुला मिठी मारते आणि मिठी मारतानाच मिनुच्या नकळत ती तिथे एक अगदी छोटा असा टेप रेकॉर्डर ठेवते आणि तिच्या रूमच्या बाहेर पडत तिच्या वडिलांचा निरोप घेत अंबरीशकडे धाव घेते.

क्रमशः भाग ६ वाचा https://wachankatta.com/respect-marathi-story-part-6/

-प्रांजली कुलकर्णी

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !