२०१७ साली लिहिलेला लेख, खूप लोकांना आवडला होता.
अंबेजोगाई म्हणजे आमची कुलस्वामिनी….!
असा एक अलिखित नियम आहे कि आपल्या कुलस्वामींचं आणि कुलस्वामिनीचं दर्शन वर्षातून एकदा तरी घ्यावं म्हणजे आपल्या आयुष्यात विघ्न येत नाहीत. मी माझ्या आयुष्याच्या २४ वर्षात तीन किंवा चार वेळा अंबेजोगाईला आणि कमी अधिक तेवढ्याच वेळा गुहागरला व्याडेश्वराच्या दर्शनाला गेलो असेन जे अध्यात्मिकरीत्या चुकीचं आहे. आस्तिक म्हणून हे सगळं मला मान्य आहे आणि त्यामुळे फारच त्रास व्हायला लागली कि अंबेजोगाई आणि गुहागरच्या उचक्या लागतात.
अंबेजोगाईला या आधी गेलो होतो ते डिग्रीला असताना दुसऱ्या वर्षाला म्हणजे २०११ साली. म्हणजे आता सहा वर्षं पूर्ण होत आली. तेव्हा श्रावण असावा, पारशी नववर्षाचा शुभारंभ अर्थात पतेती त्यानिमित्त सुट्टी होती दोन तीन दिवस जोडून, म्हणून देवदर्शनाला गेलो. आताही वेळ कमी होता पण जायचा निश्चय पक्का झाला त्यामुळे गाडी काढून लगेच निघालो.
सव्वा तीनशे किलोमीटर्सचा एकेरी प्रवास. ड्रायव्हिंग मी आणि बाबा असल्यामुळे सोपं होतं. दुपारी पावणे दोनला निघून बार्शी मध्ये एक स्नेही आहेत त्यांच्याकडे रात्रीचं जेवण उरकून अंबेजोगाईला रात्री बारा वाजता पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी ताजेतवाने होऊन अभिषेक आणि पूजेसाठी मंदिरात पोहोचलो. बुधवार, शाळा सुरु, महिना अखेर अशा अनेक कारणांमुळे गर्दी नव्हतीच. सहज दर्शन, अभिषेक आणि पूजा झाली आणि कोकणस्थांच्या देवीला कोकणस्थांसारखा बरोब्बर पावणे बाराला नैवेद्य अर्पण केला. आम्हीही भरल्या पोटी थोडी विश्रांती घेतली आणि पावणे दोनलाच परतीचा प्रवास सुरु करून रात्री साडे दहाला सातारा गाठला.
माझी एक श्रद्धा म्हणून मी असं ठरवलं होतं कि आपण कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायला निघालो आहोत तर बाकी मंदिरांमध्ये जायचं नाही. पण मला कुठेतरी असं वाटत होतं कि शेगांव अंबेजोगाईपासून फार लांब नसावं, पुढच्या वेळी देवी आणि महाराजांचंही दर्शन घ्यावं. जी. पी. एस वर बघितलं तर मजबूत २८८ किलोमीटर्सचं अंतर होतं. शेगांव आणि महाराजांचं माझ्या मनात फार वेगळं स्थान आहे. त्यांची आठवण आली नाही असं होणार नाही.
निघालो तेव्हा गाडी चालवता चालवता हे विचार चालू होते. अंबेजोगाई मागे राहिली, कळंब आलं. आणि कळंब गाव ओलांडून बार्शीचा रस्ता धरला तेव्हा अतिशय सुंदर अनुभूती आली. दिवस आषाढाचे आहेत. उभ्या महाराष्ट्राला पावसाबरोबर पंढरीचेही वेध लागले आहेत. गाडी चालवता चालवता अनेक दिंड्या मागे राहत होत्या, तुळशी वृंदावन घेऊन मराठवाड्याच्या कडक उन्हात माऊली पंढरीकडे निघाल्या होत्या. टाळ मृदूंगाच्या जयघोषात वारकरी विठुरायाचे गुणगान गात गात आनंदात तल्लीन होऊन वाट चालत होते.
(देवीचं दर्शन झाल्यावर आजीने आबांच्या स्मरणाप्रीत्यर्थ देवीला देणगी दिली तेव्हा आबांचं पूर्ण नाव लिहिताना डोळे पाणावले होते आणि गळा भरून आला होता. मूड पण जरा नाराज होता. हे नमूद केलं कारण सहल संपताना परतीचा प्रवास सुरु झाला कि आधीच वाईट वाटत असतं आणि आबांच्या आठवणी आणखीन बेचैन करत होत्या. ड्राईव्ह करत होतो तेव्हाही मूड चांगला नव्हता. कळंब आलं आणि मागे राहिलं.)
अनेक दिंड्या गेल्या आणि शेवटी असं एक दृश्य दिसलं कि शिस्तबद्ध पद्धतीने एक दिंडी चालली होती. मागे एक रुग्णवाहिका होती. आणि दोन ट्राफिक पोलीस त्या दिंडीच्या शेजारून वाहनांना वाट करून देत होते. निळ्या वेशातले गार्ड सारखे गणवेश परिधान केलेले त्या दिंडीचे स्वयंसेवकही वाहतूक सुरळीत करत होते. एका गार्डने माझ्या गाडीला वाट करून दिली तेव्हा मला अचानक काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी मुख्य पालखीकडे गाडीतून वाकून बघितलं आणि परमेश्वर आहे याची मला एका क्षणात प्रचिती आली…!पालखी मध्ये माझी गुरुमाऊली, अर्थात ब्रह्माण्डनायक श्री गजानन महाराज होते! चांदीचा मुखवटा आणि त्याची केलेली नयनरम्य पूजा मला ‘याची देही याची डोळा’ बघायला मिळाली…….!!!!
माझ्यासाठी तो अक्षरशः स्वर्गीय अनुभव होता कारण मला शेगांवला जाणं शक्य नव्हतं तर महाराजांनी मला स्वतःच येऊन दर्शन दिलं…!!!
‘श्री गजानन विजय’ ग्रंथात दासगणू महाराजांनी एक प्रसंग सांगितला आहे. वारीला गेलेल्या ‘बापुना काळे’ या भक्ताचं विठ्ठल दर्शन काही कारणांनी चुकतं. मनापासून दर्शन घेण्याची बापुनाची इच्छा असते पण दर्शन चुकतं. वाड्यात परत येऊन महाराजांना आणि इतर भक्तांना सांगितल्यानंतर इतर भक्त त्याची चेष्टा करतात, पण त्याच्या अंतरीची खरी इच्छा ओळखून गजानन महाराज बापुनाला स्वतः दोन्ही कर कटीवर ठेऊन आणि पावलं जुळवून साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडवून आणतात…..! बापुनाला सुद्धा श्री विठ्ठल महाराजांमध्ये दिसतात आणि त्याला त्याचं आयुष्य कृतार्थ झाल्याचा आनंद मिळतो…!पोथीत सांगितलेला हा प्रसंग वाचून डोळे पाणावतात शिवाय बापूनाच्या खऱ्या भक्तीबद्दल आणि महाराजांच्या भक्तांवर असलेल्या कृपादृष्टीबद्दल वाचून फार सुरेख वाटतं! प्रत्येक पारायण करताना आपोआप पोथीसमोर हे वाचून भक्त नतमस्तक होतोच!
मी ‘बापुना काळे’ यांच्या इतका पुण्यवंत नक्कीच नाही पण मला महाराजांच्या भक्तांविषयीच्या प्रेमाचं खरंच खूप अप्रूप वाटत राहतं! आणि त्याची प्रचिती येते हे माहिती आहे तरीही दर वेळी स्वर्गीय अनुभूती असल्यासारखं वाटतं.
पालखीमध्ये एक पूर्ण मिनिटापेक्षा कमी वेळ दर्शन झालं पण ती अनुभूती दिव्य होती. शिस्तबद्ध मार्गक्रमण, एकसमान वेशभूषा, प्रत्येकाच्या हातातले भगवे झेंडे एका तालात वाऱ्यावर फडकत आहेत, मागे आणि पुढे एक एक रुग्णवाहिका, प्रचंड स्वच्छता आणि सगळं एकसंध..! दोन्ही रुग्णवाहिकांवर ‘श्री संत गजानन संस्थान शेगांव, ऍलोपॅथिक दवाखाना’ असं लिहिलेलं होतं. आधी विमनस्क असलेली मनःस्थिती महाराजांचं दर्शन झाल्यावर चक्क पूर्ण प्रसन्न झाली. कपाळावरच्या आठ्या जाऊन एक स्मितहास्य आलं आणि आपल्या जिवाभावाचं माणूस खूप वर्षांनी भेटल्यावर डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात तसे माझ्याही डोळ्यातून आनंदाश्रू येते झाले. आनंदाश्रू कसले, गंगा यमुनाच! गॉगल ओला झाला आणि शेजारी बाबा बसले होते, त्यांनी माझ्याकडे एकदा बघितलं आणि काय समजायचं ते समजून घेतलं..!
पुढेही ड्राईव्ह करत असताना एम. एच. २८ चे अनेकानेक ट्रक्स आणि बसेस (अतिशय स्वच्छ) दिसत होते. पुढच्या एका गावात अरुंद रस्त्यावरून शेगांव संस्थानचा एक ट्रक चालला होता त्याला ओव्हरटेक करायची इच्छा नाही झाली, ट्रककडे बघत समाधानाने मी त्याच्या मागून शांतपणे गाडी चालवत होतो, आतल्या वारकऱ्यांना तसाच हळूच नमस्कार केला, आणि तो ट्रक वळल्यावर त्या ट्रकवर लिहिलेलं वाचलं, ‘श्री संत गजानन अभियांत्रिकी महाविद्यालय’………
शेगांव संस्थान हे केवळ अध्यात्मिक संस्थान नसून लोककल्याणकारी संस्थान आहे हे त्यांच्या व्यवस्थापनाकडे बघून कळतं. एकदा छोट्या पोथीमध्ये दिलेलं संस्थानचं कार्य अवश्य वाचावं हि विनंती.
आणि काहीही म्हणा, देवत्व आहे आणि श्रद्धा असली तर प्रचिती आल्याशिवाय राहायची नाही हे नक्की….!
|| सर्वे भवन्तु सुखिनः ||
|| श्री गजानन संस्थान शेगांव ||
|| श्री गजानन || जय गजानन || देवी योगेश्वरी प्रसन्न ||
फोटो श्रेय: श्री संत गजानन बहुउद्देशीय सेवाश्रम पुणे यांचे फेसबुक पेज
फोटो: पालखीचे कळंब गावी आगमन झाले तो क्षण…
लेखक : परीक्षित भिडे