• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

YALAI | एक तरल ऋणानुबंध,यलाई

BOOK REVIEW

“यलाई” नजरेच्या आवाक्यात येताक्षणी डोळे प्रथम वेध घेतात ते त्या सुबक,जांभळ्या मुखपृष्ठाचा. तिचं अंतरंग जणु तिथे उलगडलं आहे.एखादा खडा भिरकावला की तो डुबकन् पाण्यात शिरतो, भोवती असंख्य वलयं निर्माण करीत.असा हा ठेवा पाहताच वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात करतो.तिचे भोवरे मनाबरोबर हृदयही आत खेचू पाहतात. अतिशय बोलकं मुखपृष्ठ असणारं हे पुस्तक वाचकासोबत आपुलकीचं हितगुज करु पाहतं.त्याच्या काळजाचा ठाव घेतं.एकेका पानावर आपलं हृदय उलगडून ठेवणाऱ्या सुविद्य, संवेदनशील लेखक मा. पुष्पराजजी गावंडे व वाचकाशी जुळणाऱ्या ऋणानुबंधांना हळुवार सुरुवात होते.अन मग त्या शब्दजाळ्यात माणुस कसं ओढलं जातं हे त्याचं त्यालाही कळत नाही.लेखकाच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग,त्यातला पदर न् पदर खुलवत लेखकांनी चितारला आहे.यलाई स्त्रीमनाचं प्रतिक आहे.तिच्यासारखेच कित्येक डोह,भोवरे अंतस्थ घेऊन स्त्री जगत असते.भोगत असते.अनेक भावभावनांचा आविष्कार यलाईत फुलून आला आहे.तो प्राशत असता वाचक ते अंतर्चक्षुत ते साठवत जातो अन् यलाईच्या डोहात आपसूकच गुंतत जातो….गुंतत जातो.

BOOK REVIEW
सौ.रंजना कराळे, येवदा, अमरावती


एक भावनाशील युवक दत्तात्रय राऊत, त्याच्या जीवनपटावरची अनेक पात्रं,जाणीवेच्या परिघातल्या व परिघाबाहेरच्या विविध घटना,आनंदाचे अन् कधी निराशेचे उसळणारे क्षण,मनाची घालमेल,उद्विग्नता… सारं सारं यलाईच्या निखळ धारेशी समर्पित आहे.तिच्याशिवाय जीवन परिपुर्ण नाही.तिच्याच साक्षीनं दत्ताच्या आयुष्यातल्या घडणाऱ्या घडामोडी शी वाचकही समरस होतो. दत्तात्रय एक हळव्या मनाचा, संवेदनशील युवक शहरात शिक्षणासाठी जातो.भाड्याच्या घरात राहताना तो घरमालक व मालकिणीला आपलंसं करुन घेतो.जिव्हाळ्यानं त्यांचं मन जिंकून घेतो.आपल्या निरागस आचरणानं तो एक प्रेमाचं,स्नेहाचं गोड वलय निर्माण करतो.गायत्री,एक अनामिक हुरहुर लावणारी सखी त्याला भेटते.मग तिचं त्याच्याशी जवळीक साधणं,घरात कामात मदत करणं,सायकलवर हळूच फुलं ठेवणं…यातून ती आपल्या प्रेमाची उत्कटता प्रकट करत असते.तिच्या आईलाही दत्तात आपला जावंई दिसतो. ध्रुव हा दत्तचा परममित्र होतो.त्याच्या सहवासात असतांनाच त्याची बहिण सैरंध्रीचा दत्तावर जीव जडतो.ध्रुवची आई,मम्मालाही दत्ता आणि त्याची मैत्रिण अपुर्वाच्या चोरट्या गाठीभेटी रुचत नाहीत.
दत्ताच्या मनाची घालमेल कुठंतरी त्याला स्थिर व्हायला भाग पाडते.


अपुर्वा व सैरंध्री ह्या दोन विरोधी डोहात फसलेल्या दत्ताची मानसिक ओढाताण होते.दोघींबरोबरही कधीकधी इच्छेविरुद्ध तो खोटे बोलत असतो.दत्ताच्या अंतर्मनातील द्वंद्व रेखाटताना लेखकही अंतर्मुख होऊन पुन्हा पुन्हा यलाईच्या काठावर जाऊन तिला स्मरत तिचं ऋण घेऊन जगण्यात धन्यता मानत असतात. सुरुवातीला हिडीसफिडीस करणारी घरमालकीण दत्ताला जीव लावते.देवयानीताईंची मायेची शिंपण…ह्यामधून दत्ताच्या निर्व्याज मनाची प्रचिती येते.अपुर्वाचा लग्नाचा हट्ट,सैरंध्री व गायत्रीचं प्रेम या त्रिशंकुत गच्च फसलेला दत्ता एक प्रतिक भासतो ह्या समाजमनाचं.अनेक अनाकलनीय बाबी अशाच जीवनात माणसाला घट्ट जखडून टाकतात.निर्णयक्षमताच गोठुन जाते.त्यातच मग माणुस अगतिक,हतबल होतो. दत्ताची आईवडिलांविषयीची स्नेहभावना , अपराधीपणाची जाणीव त्याचं अंतर्मन ढवळुन काढते.

जिच्या काठी बसून मन निवांत होत होतं,डोळ्यातल्या वळवाच्या धारा जिच्या पात्राशी एकरूप झाल्या,तिचं ऋण आजन्म शिरावर ठेवूनही काहीतरी मागे उरतंच,अशा यलाईची पापणी असलेली शेती बॅंकेच्या नोकरीसाठी विकण्याची जेंव्हा वेळ येते,सारे ऋणानुबंध मागे सोडतांना दत्ताची भावावस्था वाचकांचं ह्रदय पिळवटून टाकते.गावाशी,यलाईशी,त्या मातीशी,असलेलं काळजातली नातं तुटून असं विखुरलेलं .. कुणाच्या मनाला पाझर फोडणार नाही…

यलाई आभाळाची अथांग निळाई…तिच्या काळ्याशार डोहासारखं अतर्क्य मानवी मन..संघर्षाचे भोवरे.. सारं सारं..एका भावविभोर मनातलं गुज आहे. वाचकाच्या काळजाला भेदणारं शब्दलालित्य आहे.ग्रामीण भागाचा हळवा,निखळ,कोपरा..यलाई तुन लेखकांनी हळुवारपणे साकारला आहे.यलाई फक्तच खळाळणारं पाणी नाहीतर तिथल्या माणसांच्या अंतर्मनात सदैव वास करणारा ,एक मधुर,निरागस राग आहे.रोमारोमातला विश्वास आहे.

…एकंदरीत यलाई म्हणजे लेखणीचा हुंकार आहे.जाणीवानेणिवेच्या पलिकडचा साक्षात्कार आहे. आतुन जिवंत करणारी..अशी अक्षरपालवी आहे. पुन्हापुन्हा वाचावी अशी ही तरल संपदा आहे.हृदयात विरघळणारी अन् डोळ्यातुन घळणारी…. यलाई.. कधीच संपू नये असे वाटणारा एक अविरत प्रवास आहे.वाचक तिच्या ओल्याकंच प्रेमळ खळाळात भिजून जाणार हे निश्चीत.

यलाई -कादंबरी
मुक्ता प्रकाशन,अकोल

सौ.रंजना कराळे
येवदा, अमरावती

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !