• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

MAYANAGARITLI MAYALU LOKA | मायानगरीतली मायाळू लोकं

Bywachankatta

May 16, 2021
MUMBAI GATEWAY OF INDIA

अठरापगड जातीचे आणि प्रवृत्तीचे लोक ज्या नगरीत राहतात ती आमची महानगरी मायानगरी, भारताची आर्थिक राजधानी आणि आपली माय, गुज्जुंची बा आणि इंग्रजांची मॉम अर्थात मुंबई…..!!

मुंबईमध्ये जणू एक चुंबक आहे जे कष्टकरी आणि प्रामाणिक लोकांना खेचून घेतं. त्या बळावर आमच्यासारखे कित्येक लोक आपापली बोचकी घेऊन विक्टोरिया टर्मिनस किंवा मुंबई सेन्ट्रलला येऊन धडकतात. हातात काहीही नसतं, (माझ्या बाबतीत परिस्थिती अतिशय वेगळी, काकांचा भक्कम आधार, आई बाबांनी कायम भरून ठेवलेलं माझं पाकीट आणि चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला मी…) तर, हातात काही नसतं, असते ती काहीतरी भन्नाट करून दाखवण्याची जिद्द. त्या जिद्दीच्या जोरावर सगळं निभावून न्यायचं असतं आणि ते यशस्वी होतं.

फेब्रुवारी महिन्यात मी काही कामानिमित्त मुंबईला आलो. त्यावेळी बांद्र्याला जायला लागणार होतं. चुनाभट्टीहून स्लो हार्बर पकडून वडाळ्याला उतरलो आणि पुन्हा स्लो अंधेरी मिळाली. तिने बांद्र्याला उतरणं अवघड नव्हतं.

वांद्रे पश्चिमला गेल्यावर बाहेरच शेकडो रिक्षा असतात. पुढे बेस्टचं स्थानक आहे. २११ नंबरची बस सरळ फादर आग्नेल आश्रमापाशी सोडते जिथे जमीन संपते आणि समुद्र सुरु होतो. ‘बँड स्टेंड’ नावाचा तो एक स्वर्गीय परिसर चुकून भूलोकी आला आहे. समोरच ‘ताज’ आहे. अजून काय हवं ?

पण बांद्र्याला उतरलो तसा खूप अपसेट झालो होतो. उतरल्यावर लगेच तिथे खूप तंदुरी हॉटेल्स आहेत. आणखी पुढे गेलं तर एका दुकानावर ‘अंडरटेकर’ अशी पाटी दिसली. ख्रिस्चन लोकांच्या अंत्यसंस्काराला लागणाऱ्या सगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत अशा आशयाचे फलक होते. बाजूलाच काही शवपेटिका मांडून ठेवण्यात आल्या होत्या. (मृत्यू, अंत्यसंस्कार किंवा तत्सम गोष्टींनी मला फार त्रास होतो, किंबहुना जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत सतत भीती वाटत राहते.) ते सगळं वातावरण नाही म्हणलं तरी मला झेपलं नाही आणि उगाचच जरा जास्त ताण आल्यासारखं वाटलं. समोरच खाकीमध्ये असलेल्या एका कंडक्टरला विचारलं आणि शहाण्या मुलासारखा २११ च्या लाईनमध्ये जाऊन थांबलो.; दुपारी साधारण साडे बाराचा मुहूर्त होता आणि बांद्रयाचं ऊन मी म्हणत होतं. बस आली आणि क्षणात पूर्ण भरली. शेवटच्या सीटवर सहा माणसांच्या जागी आम्ही सात जण दाटीवाटीने बसलो होतो.

माझ्या डावीकडे काही लोक होते आणि उजवीकडे एक पांढरा झब्बा, डोक्यावर इस्लामची टोपी असा एक माणूस बसला होता. शेजाऱ्याच्या हातात स्मार्टफोन असला कि त्या मोठ्या स्क्रीनकडे आपलं उगीच लक्ष जातं. सोशल मेसेंजरवर तो सद्गृहस्थ ग्रुप मध्ये मेसेज पाठवत होता. ग्रुपचं नाव, ‘हम हिंदुस्थानी’ आणि नावाच्या दोन्ही बाजूला तिरंगे होते. ग्रुपच्या सदस्यांची नावं सगळीच मुस्लिम होती. हे बघून मला त्याही अवस्थेत जरा बरं वाटलं. (माझं नेहमीचंच मत आहे कि कुठलाच धर्म देशद्रोही किंवा वाईट नसतो, प्रत्येक ठिकाणी जर काही वाईट असेल तर ती त्या एका माणसाची वृत्ती.)

बसने एव्हाना मार्गक्रमण सुरु केलं होतंच, पण मी तिथे मात्र दुसऱ्यांदा जात असल्यामुळे बस नक्की कुठल्या रस्त्याने चाललीये हे कळत नव्हतं.

असो. सगळे मेसेजेस पाठवून झाले त्या भल्या माणसाचे, फोन पूर्ववत झब्ब्याच्या खिशात गेला होता. बस आता बांद्र्याच्या उच्चभ्रू भागातून जात असल्यामुळे साहजिक बाहेर लक्ष गेलं होतं.
“भाई साहब, आप ठीक तो है ना ? तबियत ठीक है आपकी ? इतना पसीना छूट राहा है आपको, इसलिये पूछा|”
उजवीकडून आवाज आला. तो सद्गृहस्थ मलाच विचारत होता.
“हां जी, तबियत बिलकुल ठीक है| मुंबई में काफी दिनो के बाद आया हुं इसलिये पसीना बहुत आ राहा है| और थोडासा टेन्शन भी है, इसलिये चेहरे पर चिंता दिख रही है| आप मुझे बता सकेंगे कि फादर आग्नेल आश्रम के पास ताज हॉटेल कहां है?”

“क्यू चिंता करते है ? बेफिक्र रहिये, जो भी काम आपने सोचा है वह बिलकुल अच्छी तरीके से हो जायेगा|”

“घर से दूर आया हुं| मा बाप से दूर रहना मतलब मुझे बहुत दुख होता है| इसलिये जरासा नाराज हुं|”

“आप तो बहुत हि भले इन्सान मालूम पडते है| आजकल कि दुनिया में कहां ऐसे कोई मा बाप से दूर होने का दुख करता है ? हमारे कुराण में वही लिखा है और आपकी गीता भी यही कहेगी कि मा बाप के चरणो में और उनकी सेवा में हि जन्नत है| आपकी सोच बिलकुल सही है, और मै आपकी तकलीफ समझ सकता हुं| हम घर छोडकर बाहर आते है क्युंकी हमे अपने मा बाप के चेहरे पे हमारे सफलता कि खुशी देखनी है| थोडे टाईम के बाद आप घर जाने ही वाले है| उसके पहले आप अपने कामो में सफल हो जाईये और फिर आपके मा बाप आप पर गर्व करेंगे|
अभी मै इधर से चला जाउंगा, आप जहां सब लोग उतर जायेंगे वही उतरीये, सामने ही आपका ताज हॉटेल है|”

पंधरा वीस मिनिटात ‘तो’ माझ्याशी जे काही बोलला, त्याने इतकं शांत वाटलं कि चेहऱ्यावरचं टेन्शन जाऊन चक्क तिथे शांतपणा आला होता. समुद्र दिसल्यावर स्मितरेषा उमटली आणि जसा खारा वारा लागला तसं एकदम प्रसन्न वाटलं. शेजारीच फादर आग्नेल आश्रम दिसला, एक चर्च होतं. तिथून काही सिस्टर्स चालल्या होत्या. ते बघून एकदम शाळेचे सुंदर दिवस आठवले. (आम्ही कॉनव्हेंट शिक्षित ना!) कंडक्टर महाशयांनी जोरदार आरोळी ठोकली, आणि सगळे प्रवासी उतरले. मीही उतरून चालता झालो.

मुंबई मध्ये हे असे सुखद अनुभव मला भरपूर येत असतात. आणि सुरुवातीलाच म्हणलं तसे अठरापगड जाती आणि प्रवृत्तीचे लोक मला आपला आपला चांगुलपणा दाखवून पुन्हा एकदा मुंबईच्या गर्दीत मिसळून जातात.

(कुठल्याही धर्माप्रती अनादर व्यक्त करायचा कुठलाही हेतू नव्हता. सदर लेखाने आपल्या भावना जर दुखावल्या असतील तर मला मोठ्या मनाने क्षमा करावी अशी विनंती आपल्या चरणी करीत आहे. क्षमस्व !!) || श्री गजानन || जय गजानन ||

  • लेखक © परीक्षित भिडे

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !