लागली बघ, झड पुन्हा
आठवांची लड पुन्हा
चिंब स्वप्ने पाहते
पापण्यांची कड पुन्हा
ती पुन्हा आल्यावरी
पावसा रे, पड पुन्हा
का जुना रस्ता करी
पावलांना जड पुन्हा
अंतराने दूर जा
अंतराशी जड पुन्हा
राजपुत्राची व्यथा
वेढणारी गड पुन्हा
हो असा उद्ध्वस्त की,
घे उभारी,… घड पुन्हा
शेतही देते दगा ….
… बारमाही नड पुन्हा
सोसवेना हा ऋतू
हे फळांचे घड पुन्हा
एकदा वर्षाव दे
अन् ढगांशी दड पुन्हा
गाय हंबरते किती !
दाटले का सड पुन्हा ..!
हासणारे दुःख घे
अन् सुखाने रड पुन्हा
- ©प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर
- email : drsantoshkulkarni32@gmail.com