असे वाटते दूर जावे कुठेही
मनासारखे पण जगावे कुठेही
कशाला हवी दादही मैफलीची
मनाचे मुके गीत गावे कुठेही
जरा प्रेम देताच लाडात येते
मनालाच फेकून द्यावे कुठेही
कुठे माहिती जीवनाची नदी का,
नको त्या ठिकाणीच धावे कुठेही ?
घराच्याच दारे नि खिडक्या, छतांना
किती कान, तोंडे नि कावे कुठेही !
जगड्व्याळ आहे तुझी सूक्ष्मताही
तुझे विश्व माझ्यात मावे कुठेही
तुला मंदिरी वा मशीदीत भेटे
मला देव मौनात पावे कुठेही
फिरू लागली श्वापदेही घराशी
बघा माणसांनो विसावे कुठेही
निराधार आरोप होते, खरे पण –
मिळाले न कोणा पुरावे कुठेही
- ©प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर
- email : drsantoshkulkarni32@gmail.com
काळजाला काळजीने पोखरावे रोज थोडे
हा तिचाही हक्क आहे, हे स्मरावे रोज थोडे
(मी तसा आहे सहिष्णू, देत आलो वाव म्हणुनी…
मानभावी जीवनाने का मरावे रोज थोडे…?)
चंद्र आणिक चांदणेही आपल्या नशिबात नाही
आपले आभाळ आहे… पांघरावे रोज थोडे
ह्या धरेचे अंथरुणही खास नाही एकट्याचे…
आपल्या वाट्यातले ते अंथरावे रोज थोडे
मैतरीचा कोणता हा कायदा आहे कळेना…!
वैर मित्रा कायद्याने का करावे रोज थोडे…?
जीवनाचा घाट हा अवघड तरीही फार नाही…
चालताना लागते पण सावरावे रोज थोडे
रोज घाई, धावपळही चालणारी ठीक आहे…
शांतवेळी काळजाशी वावरावे रोज थोडे
आसवांच्या ह्या अनावर सागराचा हा किनारा
राखण्यासाठीच कोणी आवरावे रोज थोडे
ऐकतो मी रोज माझ्या मुक्ततेचा फक्त नारा
लागते पण रीत म्हणुनी बावरावे रोज थोडे
- ©प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर
- email : drsantoshkulkarni32@gmail.com