• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

WATPOURNIMECHI KATHA | वटपौर्णिमेची कथा

WATPOURNIMA, वटपौर्णिमा

वृक्षपूजा ही भारताच्या आदिम संस्कृतीची निदर्शक आहे. वृक्षांना दैवत मानण्याची परंपरा हजारो वर्षांपासून कायम आहे. कथा-परिकथा-दंतकथांच्या माध्यमातून वृक्षपूजेचे महत्त्व ठसविण्याचा प्रयत्न कथा पुराणांतून केला जातो. वटपौर्णिमेचा सण त्यापैकीच एक.

ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेलाच वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा असे म्हणतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. सावित्रीची कथा ऐकतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करून आपल्या पतीसाठी उदंड आयुष्य मागतात. दिवसभर किंवा तीन दिवस उपवास करून पतीला दीर्घायुष्य मिळावे, अशी कामना करतात. वडाच्या झाडाच्या वेगवेगळ्या भागांत ब्रह्मदेव-सावित्री, विष्णु आणि शिव यांचे वास्तव्य असते, अशी समजूत आहे. ब्रह्मदेवासह सत्यवान, सावित्री, नारद आणि यम या देवतांना या व्रतामध्ये पूजिले जाते. काही भागांत सावित्रीची सुवर्णप्रतिमा करून किंवा वडाच्या झाडाखाली सावित्री, सत्यवान, यम यांची चित्रे करून पूजा केली जाते. महाराष्ट्रात मात्र वटवृक्षाचीच पूजा केली जाते. सुवासिनी स्त्रिया वडाच्या मुळाशी पाणी घालतात. त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे फेरे गुंडाळतात.

देवतांच्या प्रतिमांची पूजा करतात. वटवृक्ष जवळपास नसल्यास त्याची फांदी आणून पूजा करतात. पूजा झाल्यानंतर सुवासिनी एकमेकींना वाण (वायनदान) देतात आणि सत्यवान-सावित्रीच्या कथेचे वाचन-श्रवण करतात. वटसावित्रीच्या व्रताची कथा खूपच प्रसिद्ध आहे.

प्राचीन मद्र देशाचा राजा अश्वपती याला मूल होत नव्हते. मूल व्हावे म्हणून त्याने ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री (तिला सूर्या असेही म्हणतात) हिची आराधना केली. सावित्रीच्या कृपेने त्याला कन्या झाली. त्यामुळे तिचे नाव त्याने सावित्री असेच ठेवले. यथावकाश ती उपवर झाली; परंतु ती विलक्षण तेजस्विनी होती. तिच्या या तेजस्वीपणामुळे कोणीही राजपुत्र तिला मागणी घालायला तयार होईना. त्यामुळे त्या काळातील प्रथेनुसार राजाने सावित्रीलाच वरसंशोधनासाठी पाठवले. दरम्यान तिने शाल्व देशाचा राजा ध्युमत्सेन याचा पुत्र सत्यवान ह्याची वर म्हणून निवड केली. स्वत: सावित्री जशी प्रज्ञावान आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची होती त्याचप्रमाणे सत्यवानही कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि सर्वशास्त्रपारंगत होता.

धर्मशास्त्र आणि राज्यशास्त्राचा त्याने विशेष अभ्यास केला होता.अश्वपरीक्षा आणि अश्वज्ञान यात त्याने विशेष प्राविण्य मिळवले होते. वरसंशोधनाला निघालेली सावित्री ध्युमत्सेन राजाच्या वनातील आश्रमात आली. आश्रमात काही काळ तिने मुक्काम केला. या काळात सावित्रीचा सत्यवानासोबत धर्म, राज्य, वैद्यक, वनस्पती अशा अनेक विषयांवर संवाद झाला. सावित्रीच्या प्रज्ञेने आश्रमवासी थक्क झाले. पण स्वत: सावित्रीही सत्यवानाच्या गंभीर, अभ्यासू आणि चिंतनशील व्यक्तिमत्वाने भारावली. तिला तिचा जीवनसाथी गवसला! सावित्रीने आपली निवड पित्याला सांगितली, सावित्री ही हकिकत पित्याला सांगत असताना देवर्षी नारद तिथे प्रकट झाले. त्यांना सत्यवानाचे भविष्य माहीत होते. सत्यवान हा अल्पायुषी असून बरोबर एक वर्षाने त्याचा मृत्युयोग असल्याचे नारदांनी राजाला सांगितले. त्यामुळे राजाने या विवाहास विरोध दर्शवला.

परंतु दृढनिश्चयी सावित्रीने सत्यवानाशीच विवाह करण्याचा आपला मनोदय पूर्णत्वास नेला. सावित्रीने सारे राजवैभव सोडून सत्यवानाबरोबर अरण्यात राहण्याचे ठरवले. थोड्याच काळात आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि सत्शील वागणुकीने तिने सर्वांना आपलेसे केले. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जसजसा जवळ येत होता, तसतशी ती काळजीने ग्रासून गेली. सत्यवानाच्या मृत्यूच्या तीन रात्री आधी तिने पूर्ण उपवास करून मनोभावे ईशचिंतन केले. सदैव पतीला साथ देण्याची शपथ तिने घेतली होती. अशा संकटकाळी पतीपासून ती एक क्षणही दूर राहू इच्छित नव्हती. पौर्णिमेच्या दिवशी लाकडे तोडण्यासाठी निघालेल्या सत्यवानाने वडाच्या झाडावर चढून लाकूड तोडण्यास सुरुवात केली. लाकूड तोडत असताना तो अचानक कोसळला व वटवृक्षाखाली बेशुद्ध होऊन पडला. सावित्री त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागली. त्याचवेळी प्रत्यक्ष यमराज आपल्या रेड्यासह प्राण हरण करण्यासाठी तिथे येऊन दाखल झाला. सत्यवानाचे प्राण घेऊन तो परत जाऊ लागला. सावित्रीने हे दृश्य पाहिले.

सावित्रीही त्याच्या मागे जाऊ लागली. दरम्यान यम तिची समजूत घालू लागला. दोघांचे संभाषण होऊ लागले. आपल्या वाक्चातुर्याने आणि युक्तिवादाने तिने प्रत्यक्ष यमालाही चकित केले. पतीच्या प्राणाच्या बदल्यात यमाने तिच्या सासऱ्याची दृष्टी व राजवैभव परत मिळवून दिले. सावित्रीने यावेळी पित्याला पुत्रप्राप्ती आणि स्वत:लाही पुत्रप्राप्ती व्हावी असे वर मागून घेतले. यमाने हे वर दिल्यानंतर तिने “वैधव्यदशेत मला पुत्रप्राप्ती कशी होणार?’ असा पेच निर्माण करणारा प्रश्न निर्माण केला. आपला शब्द खोटा ठरण्याची भीती यमाला वाटली, सावित्रीच्या पतिप्रेमाचे, वाक्चातुर्याचे आणि दृढनिश्चयाचे यमाने कौतुक केले आणि सत्यवानास पुन्हा जिवंत केले. भारतीय पुराणांत अशा अनेक पतिव्रता स्त्रियांची आख्याने असली तरी सावित्रीच सर्वोत्तम आदर्श ठरली आहे. आजही सुवासिनीला आशीर्वाद देताना ‘जन्मसावित्री हो’ असा आशीर्वाद दिला जातो. या पौराणिक कथांमध्ये चमत्कार असले तरी आधुनिक काळाशी त्यांचा संबंध निश्चितच आहे. ज्येष्ठ महिना खरेतर मृग नक्षत्राचा महिना. चैत्र आणि वैशाख महिन्यात कडक उन्हाने जमीन तापलेली असते. शेती नांगरून पडलेली असते. सर्व प्राणिमात्र, वृक्ष-वेली पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पाऊस पडण्याचा वृक्षांशी असलेला संबंध सर्वज्ञात आहे. भरपूर पाऊस पडावा, धरती सुजलाम्-सुफलाम् व्हावी म्हणून लोक वृक्षपूजा करतात.

वडाला वृक्षराज म्हणत असल्याने साहजिकच या काळात पूजेचा पहिला मान वडाला मिळालेला असावा.

वटसावित्रीचे व्रत अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. आजकाल अनेक सुशिक्षित स्त्रियांना वटसावित्रीचे व्रत करणे रूचत नाही; कारण हे व्रत म्हणजे पतिसेवा या दृष्टिकोनातून याकडे त्या बघतात. पण वटसावित्री सणाचा अर्थ अधिक व्यापक आणि खोल आहे. विवाह बंधनात आणि संसारासाठी पैशाची गरज नसते तर मानसिक ऐक्याची आवश्यकता असते. एकमेकांच्या आचार-विचारांना आत्मसात करण्याइतपत जिव्हाळा, प्रेम, बांधिलकी निर्माण झाल्याशिवाय संसार सुखी होऊ शकत नाही, हे सत्यवान-सावित्रीच्या कथेतून स्पष्ट होते. खेड्यापाड्यांतील सवाष्ण बायका प्रत्यक्ष वटवृक्षापाशी जाऊन त्याची पूजा करतात. ज्या ठिकाणी वडाचे झाड आसपास नसतं त्या ठिकाणी स्त्रिया वडाच्या झाडाची फांदी घरी आणून पूजा करतात.

नवविवाहित स्त्रिया छोटी सुपली, त्यात फणी, करंडा, बांगड्या, काळेमणी, जांभूळ, आंबा व त्याबरोबर ब्राह्मणाला दक्षिणा देतात. महिला वडाला दोरा गुंडाळतात. हळदी-कुंकू देऊन आंबा देतात, जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करतात. ही कथा वडाच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व सांगते तशीच ती स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या धैर्यवान, कर्तृत्ववान स्त्रीचीही कथा आहे.सावित्रीच्या आई-वडिलांनी कन्या व पुत्र असा भेदभाव न करता तिला उत्तम शिक्षण दिले. सुसंस्कृत बनवले. जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. सावित्रीनेही विचारपूर्वक आपल्या पतीची निवड केली. स्वत:च्या विचारांशी ती निर्धारपूर्वक प्रामाणिक राहिली. बिकट परिस्थितीतही झुंज देण्याचा मनोनिग्रह व धैर्य कायम ठेवावे, हताश न होता परिस्थिती बदलण्याची अवितरत धडपड सुरू ठेवावी, असाच संदेश या कथेतून मिळतो.

आत्मबल आणि पतिविषयी प्रेम या बळावर एक स्त्री मोठ्यात मोठ्या दिव्यातून स्वत:च्या कुटुंबाला कशी सावरू शकते हे सत्यवान – सावित्रीच्या कथेमधून स्पष्ट होते. सत्यवान-सावित्रीच्या कथेकड़े चमत्काराच्या पलीकडेही जाऊन बघायला हवे. सत्यवानाला हृदयविकाराचा त्रास असावा आणि याची कल्पना सावित्रीला असावी. ज्या क्षणी सत्यवान लाकडे तोडताना बेशुद्ध झाला, तेव्हा सावित्रीने आपले पूर्ण वैद्यकज्ञान पणाला लावून सत्यवानावर उपचार केले असावेत. या उपचारांच्यावेळी वडाच्या अमरवृक्षाजवळील शीतल छायेचा आणि वटवृक्षापासून मिळणाऱ्या विपुल प्राणवायूचा तिला उपयोग झाला असावा.

सावित्रीने वैद्यकज्ञान आणि सेवाशुश्रूषा या बळावर सत्यवानाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले असे समजणे जास्त सयुक्तिक आहे. ही तिची एकाकी झुंज होती. या विजयानंतर तिने आपले वैद्यकज्ञान वापरून आपल्या दृष्टिहीन सासू-सासऱ्यांवरही उपचार करून त्यांना दृष्टिलाभ मिळवून दिला असावा. महाराष्ट्रात हा सण जसा वटपौर्णिमा म्हणून साजरा होतो, तसा अन्यत्र क्वचितच साजरा होतो. बंगालमध्ये हे व्रत ‘सावित्रीव्रत’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी सुवासिनी आपल्या पतीची पूजा करतात. त्याला सुगंधी उटणे, तेले लावतात. गळ्यात फुलांचे हार घालतात. हातात पुष्पगुच्छ देतात व सर्व पूजा पार पडल्यानंतर त्याला नवीन वस्त्र देतात. याशिवाय यमाची पूजा करण्याची पद्धतही बंगालमध्ये आहे. यमाला फळे, फुले व वडाची फांदी अर्पण केली जाते. उत्तर भारतात मात्र ज्येष्ठ अमावस्येला वटसावित्रीचे व्रत केले जाते. या व्रताची सुरुवात तिथे कृष्ण त्रयोदशी म्हणजे दोन दिवस आधी होते.

शहरांत मात्र वटवृक्ष अगदीच दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळेच हा सण आजच्या नव्या युगाला साजेसा ठरेल याप्रकारे साजरा केला जाऊ शकतो. वटपौर्णिमेच्या दिवशी आजकाल वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा केली जाते. यातून पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणावर होते. वडाच्या झाडाची फांदी तोडण्यापेक्षा वडाच्या रोपट्याचे पूजन करून योग्य ठिकाणी वृक्षारोपण केल्यास त्यातून , मोठा परिणाम साधला जाईल.

-EDITORIAL WACHANKATTA.COM

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !