सकाळी तिला उठवले..
न्हाऊ घातले…
नवे कोरे कपडे घालुन
गंध पावडर लावले …
देवा समोर नेऊन बाप्पा बाप्पा केले ..
दूधात पाव कुस्करुन खाऊ दिला …
दुपारी काऊचिऊच्या गोष्टी सांगुन भरवले …
मग मांडीवर डोके घेऊन निजवले …
संध्याकाळी गार्डन मधुन फिरवून आणले…
मग टिव्ही लावून दिला !
रात्री अंगाई गीत म्हणून झोपवले…
अंगावर पांघरुन घालून
मस्तकाचे चुंबन घेतले…
दिवा मलवून
‘गुडनाईट’ ऑन केले !…
हे सर्व
साठी पार केलेल्या
मी केले !…
नव्वदीतल्या तिच्यासाठी !…
कारण …
माझ्या लहानपणी
दररोज
तिने केले होते…
…अथकपणे माझ्यासाठी !
-© पुरुषोत्तम बेर्डे