• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

THE DISCIPLE | द डीसायपल

THE DISCIPLE MOVIE REVIEW

नेटफ्लिक्स वर द डीसायपल बघितला. डीसायपल म्हणजे शिष्य. चित्रपटातील नायक शरद नेरुलकर गायक आहे. त्याचा गायक म्हणूनचा प्रवास वर्तमानात मधेच आठवणीतून लहानपण अस करत दाखवलाय. काळ पुढे सरकतोय. त्याच्या वडिलांचा गायकीचा अभ्यास असतो. ते त्याच्याकडून रियाज करून घेत असतात. पण, त्यांचा जास्त अभ्यास संगीताची थियरी आणि गायक, गायकी यावरचा असतो. घरात त्याचं फार कौतुक नसत. कारण, त्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम दिसत असतो. त्या संगीतात कुटुंब उत्तम स्थितीत राखलं जाण्याची ताकद नसते. वर्तमानात तो एका स्पर्धेत उतरतो. उत्तम गातो पण, त्याला बक्षीस मिळत नाही. त्याला निराश वाटत.त्याचे गुरु त्याला योग्य सल्ले देत असतात. तो त्यांना खूप मानत असतो. त्यांची सेवा करत असतो. गाताना चित्त स्थिर , प्रसन्न असण गरजेच असत. त्याच्या विचार भरकटण्याने तो नुसता सैरभैर होत नाही.

त्याच्या गाण्यावर त्याचा परिणाम होतो. अधेमध्ये माई म्हणजे विदुषी सिंधुबाई जाधव याचं गाण आणि जीवनविषयक तत्वज्ञान आहे. त्या माई उत्तम गायिका. त्यांचे शिष्य म्हणजे याचे गुरुजी. तो गुरुजींना सांभाळत असतो. ते त्याच्यावर अवलंबून असतात. त्यांची आर्थिक स्थिती फार बरी नाही. एका रुममध्ये राहात असतात. (सगळे कलाकार श्रीमंती आयुष्य जगू शकत नाहीत. हे सत्यही विदित केलेलं आहे.) त्याचे गुरु कार्यक्रम करतात. पण, त्यावर गुजराण होण कठीण असत. शेवटी त्याचे गुरुजीही म्हणतात की कोणी वेळेवर पैसे देत नाही. उशिराने देतात. वा तसेच रखडवतात. एकीकडे माईची आदर्श संगीत साधना यावरचे विचार आणि एकीकडे गुरुजींचा एकटे असूनही जीवन जगतानाचा व्यावहारिक संघर्ष. तो गुरुजींच्या चेहेऱ्यावर तसा दाखवलेला नाही. याच्या घरी आजीकडून , आईकडून नोकरीबाबत बोलण. मध्यमवर्गीय घराघरातली अपेक्षा. तो जिथे नोकरी करतो. तिथे तयार केल्या जाणाऱ्या फार यश न मिळालेल्या गुणी गायकांच्या सीडीज विकायला ठेवल्यावर त्याला ग्राहक न मिळणं. यातून जीवनातला कलासाधना आणि व्यवहार यातला संघर्ष जाणवतो.

इथे संगीत या कलेचा आधार घेतला आहे. कोणतीही कला दाखवता आली असती याठिकाणी. कुठेतरी एक तत्वज्ञान जाणवत. माणसाच्या आकांक्षा, इच्छा , ध्येय , नाव मिळवण या सगळ्यातून मी चा शोध चालू आहे. कलेसाठी मेहनत घेणारे दोन प्रकारचे लोकं असतात. एक मेहनत करून त्याचं फळ म्हणून यश मिळाव , नावलौकिक मिळावा ही इच्छा बाळगणारे.

दुसऱ्या प्रकारात ते ध्येयाप्रत पोचण्यासाठी मेहनत घेतात. पण त्यांचं ध्येय यशापयश नसत. तर त्यांना कलेची साधना करून आंतरिक समाधान त्यातून मिळत. अधिकाधिक शिकण, मेहनत घेण आणि त्या गोष्टीच्या अधिकाधिक खोलात जाणं. मार्गात यश मिळत वा मिळतही नाही. पण, त्यांना त्याची फिकीर नसते. गीतेत सांगितलेलं ते अक्षरशः जगत असतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
पण, जे यशापयशाची अपेक्षा करतात. तीही चूक का? तर नाही. त्यांची मेहनतही मोलाची असते. पण, त्यात यश न मिळालेले लगेच निराश होतात. त्यांचा कलेवरचा विश्वास उडू शकतो. ध्यास कमी होऊ शकतो. जे व्यवहार आणि कला याचा संगम करू इच्छितात त्यातलेही काही मेहनत घेतात. तेही आशा निराशा यात अडकतात. पण, काही असे असतात की ज्यांना अचानक नशिबाने यश मिळून जात. गुण असतात. पण, मेहनत फार नाही. कलासक्त असलेले जेव्हा नावलौकिक सहजी मिळवतात तेव्हा ते पथभ्रष्ट झाल्याची उदाहरणं मिळतात.

यश मिळालेले मुख्य कलेपासून दूर गेलेत याची जाणीव मेहनत घेताना यश मिळत नाही म्हणून निराश होणाऱ्यांना समजण गरजेच. या सगळ्यात आपण काय आहोत. आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आपल्यातले नेमके गुण कोणते? कशावर लक्ष केंद्रित करायला हव? आपल्या मर्यादा आणि कौशल्य वा खुबी स्वतःला कळायला हव्यात. यात मेहनत केल्यावरही आपल्या मर्यादा जाणवून त्या दूर करण वा मर्यादा जाणून जे गुण आहेत त्यातच आणखी काय करू शकतो हे बघण आवश्यक असत. म्हणजे यशाचे आणखी दरवाजे खुले होतात.

या चित्रपटात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. संगीत क्षेत्रात नावासाठी न गायलेल्या पण, तरीही नाव असलेल्या गायिकेच्या कॅसेट्स तो दान करायला जातो तेव्हा ते नाव आमच्या लिस्ट मध्ये नाही. त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे का ? नाहीतर आम्ही घेऊ शकत नाही. अस सांगितलं जात. फुकटही घेता येणार नाहीत? दान देताना त्याला त्या सीडीज मौल्यवान आहेत. एकमेव आहेत. हे सांगायला लागतं. ज्या नावलौकिकासाठी मनुष्य धडपड करतो ते किती काळ टिकत? काही काळानंतर लोकांच्या स्मरणातूनही दूर जातात. मग शेक्सपियर म्हणतो ते काय आहे नावात? याचा खरा अर्थ समजतो. नाव म्हणजे तिथे नावलौकिक. समाधान फक्त आंतरिक महत्वाचं. त्यात आर्थिक स्थिती आणि समाधान याची जोडी जमवता येते का ? लोकांना सत्य सांगितलं तर आवडत नाही. हे शरद शाळेत शिकवत असतो तिथे त्याच्या झालेल्या अपमानाच्या प्रसंगात दिसून येत.


जीवन जगण्यासाठी पैसा हवा. मग तत्वज्ञान सांगणाऱ्या माई ! त्यातही कलाकारांचं आयुष्य चघळणारी लोकं असतात. त्यांना त्यांच्या कलेच्या उंचीबद्दल नाही तर त्यांच्या चारित्र्याच्या खोलीबद्दल कुतूहल असत. कलाकारांना माणूस म्हणून स्वीकारा. त्यांच्या कलेचा आदर करा हेही दाखवलय.


शेवटी, शरद कला आणि व्यवहार दोन्हीचा संगम साधतो. कलेची साधना करता करता तो उत्तर प्रदेशातील संगीताचा प्रसार करणं या ध्येयातून नवीन तंत्रज्ञानाच सहाय्य घेऊन नवीन कंपनी सुरु करतो. त्याची पत्नी, मुलगी अस कुटुंब असत. आर्थिक परिस्थिती लगेच खूप उंचीची दाखवली नाहीये. तो ट्रेनने प्रवास करताना दाखवलाय. लगेच यश कार , बंगला वगैरे दाखवलं नाही. पण, आशेचा किरण मात्र आहे.

शरद नेरुलकर हा नायक आदित्य मोडक याने साकारला आहे. कायम टेन्शन मध्ये किंवा निराश दाखवलाय. वय वाढल्यावर मिशा, शरीर स्थूल असे बदलही दाखवलेत त्याच्याबाबतीत. शेवटी मुलीबरोबर खेळताना हसतो तेव्हा आपल्यालाही बर वाटत. नाव मोठ व्हायची आस त्याने चेहेऱ्याच्या भावावरून छान दाखवलेत.


माईचा आवाज ज्यांनी दिलाय. तो आवाज लक्ष वेधून घेतो. एका गायिकेचा असा आवाज असण्यापेक्षा काहीसा गोडवा असलेला आवाज असता तरी बर झाल असत.


आजी आणि नातवाचा संवाद सहज आलाय. तो कपडे घ्यायला जातो तेव्हाही झालेला संवाद. चित्रपटाशी सामान्य प्रेक्षकाला आपला वाटतो.
संगीतावर आधारित असल्याने ती बाजू भक्कम आहेच. पण, लेखन, दिग्दर्शन आणि संकलन अशा तीन महत्वाच्या बाजू उत्तम सांभाळणाऱ्या चैतन्य ताम्हाणे यांचं कौतुक.
स्मिता पोतनीस

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !