बालपणीच्या सवंगड्यांना शोधू आपण
चंचल गोंडस उनाडक्यांना शोधू आपण
किती चेहरे लबाड झाले मोठे होता
उगाच मोठे झालेल्यांना शोधू आपण
वाटेवरती ज्यांच्या नाही इथला थांबा
घरास उपरे झालेल्यांना शोधू आपण
हरीपाठ अन् शुभंकरोती पुन्हा ऐकण्या
विस्मृतीतल्या सांजघड्यांना शोधू आपण
ज्यांच्यासाठी फुलल्या होत्या बागा इथल्या
त्या रुसलेल्या सांजकळ्यांना शोधू आपण
वडिल माणसां शिवाय वाटे सुनेच गोकुळ
घरास घरपण देणाऱ्यांना शोधू आपण
प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला