• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

RESPECT / रिस्पेक्ट भाग -९

marathi story, LOVE STORY

अवनी, ‘अंबरीशss’! असं जिवाच्या आकांताने ओरडून त्याच्याकडे धावत जायला निघते. ती चार पावलं पुढे जाताच तिच्यावर चार गुंड अचानक हल्ला करतात. तिच्या मागून एक जण येऊन तिचं तोंड दाबतो तर एक जण समोर चाकू घेऊन उभा असतो. तर बाकी दोघांच्याही हातात काठ्या आणि हत्यारं असतात. अवनी क्राईम पत्रकारितेतच काम करत असल्याने तसं पहिलं तर तिला हे असे हल्ले नवीन नव्हते. मिडिया पर्यंत खरी माहिती पोचू नये ह्यासाठी कित्येकदा तिच्यावर आणि तिच्या टीमवर असे छोटे मोठे हल्ले याआधी झाले होते

पण हा हल्ला तिच्या पत्रकारितेमुळे झालेला नव्हता हे तिला कधीच कळून चुकलं होतं. अवनीने अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी म्हणून आधीच स्वसंरक्षणाचे धडे गिरवलेले होते त्यामुळे तिचं तोंड दाबलेल्या गुंडाच्या तावडीतून ती लगेच स्वतःला सोडवून घेते पण आज तिचा सामना चार सशस्त्र गुंडांशी होता. त्याहीपेक्षा म्हणता येईल की तिचा सामना वेळेशी होता. तिला लवकरात लवकर ह्या गुंडांच्या तावडीतून सुटून अंबरीशकडे जाऊन त्याला बघायचं होतं, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. तिला स्वतःच्या जीवाची काहीच फिकीर राहिलेली नव्हती. तिचं सगळं लक्ष त्या चुराडा झालेल्या गाडीकडे होतं. त्या गुंडांना हे कळून चुकलं होते की अवनी त्यांना काहीच जुमानत नाहीये. हे लक्षात येताच एक गुंड अवनिचे हात पकडतो आणि दुसरा तिचे पाय पकडून तिला आडवं उचलतो. एवढं होऊनही अवनिची सतत त्यांच्या तावडीतून सुटायची धडपड चालू असते. 

तिला एकटीला अवरणंही त्यांना सगळ्यांना अवघड जात होतं आणि म्हणूनच हातात चाकू असलेला तो गुंड तिच्या पोटात चाकू मारायला जातो तर तितक्यात मिनुच्या वडिलांच्या घराच्या गेटवर उभा असलेला गार्ड  घरातल्या इतर गार्ड सोबत त्यांच्या दिशेने येत असताना त्या गुंडांना दिसतो. त्यांना काही कळायच्या आत एक गार्ड त्या गुंडांच्या दिशेने लांबूनच गोळी चालवतो. त्या सगळ्या गार्डसना बघून आणि त्यांच्या दिशेने रोखलेल्या बंदुका बघून ते गुंड तशेच आवनीला अक्षरशः जमिनीवर फेकतात आणि तिथून धूम ठोकून पळून जातात. अवनीला त्या गुंडांनी जमिनीवर अक्षरशः फेकल्याने तिच्याही डोक्याला आणि पाठीला मार बसतो. ती तशीच तिथून कशीबशी उठते आणि अंबरीशच्या दिशेने पा

पळायला लागते. तिलाही गुंडांसोबतच्या हतापायीत बरंच लागलेलं असल्याने तिला नीट पळता काय चालताही येत नसतं. त्यामुळे तिच्याआधीच मागून पळत येणारे गार्डस अंबरीश बसलेल्या गाडीजवळ पोहचतात आणि घोळका करून गाडीचं तुटलेलं दार आणि काचा बाजूला करत करतात. अवनी कार जवळ पोहचते तेव्हा बघते तर अंबरीशचा एक पाय पूर्ण रक्तबंबाळ झालेला असतो, त्याच्या चेहऱ्यावर जागोजागी काचा लागलेल्या असतात पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे श्वास चालू असतात. ते बघून अवनीला जग जिंकल्याचा आनंद होतो. ती अंबरीशच्या गालावर चापटा मारत त्याला आवाज देत त्याला शुध्दीत आणण्याचा प्रयत्न करते.

तसा तो डोळे उघडतो आणि अवनीकडे बघून हसायचा प्रयत्न करतो.  ते बघून‌ अवनीच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागतं. तेवढ्यात एक गार्ड तिथे एक गाडी घेऊन येतो आणि अवनीला म्हणतो, ‘मॅडम चला, आपण हॉस्पिटलला जाऊयात’. अवनी तितक्याच पटकन त्याला म्हणते , ‘नाही! आम्ही कोणत्याच हॉस्पिटलला नाही जाणार, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना घरी बोलवा आणि ह्याला घरात घेऊन जायला मला मदत करा’.

अवनिचा हा पवित्रा कोणालाच कळत नाही.पण ती कोणाचच ऐकायला तयार नसते. शेवटी ते गार्ड त्या दोघांना मिनुच्या वडिलांच्या घरात नेतात आणि डॉक्टरांना घरीच बोलावतात.

अंबरीश आज थोडक्यात वाचलेला असतो आणि अवनीही. दोघांवरही उपचार करून डॉक्टर तिथून निघतात. ते जाताच अंबरीश म्हणतो,

‘अवू, आज  तुझ्या आईमुळे वाचलो मी!’

‘माझ्या आईमुळे?’ अवनी अश्चऱ्याने त्याला‌ विचारते.

‘हो! तू जाताच आईंचा फोन आला तुझ्या मोबाईल वर. तू नव्हतीस म्हणून तो मी उचलला. त्यांना मी बोललेलं काहीच ऐकायला जात नव्हतं, म्हणून त्या म्हणल्या, ‘जरा रेंज मध्ये येतोस का?’ आणि म्हणून मी गाडीतून उतरतानाच अचानक काय झालं ते काहीच कळालं नाही मला.आणि जेव्हा शुद्धित आलो तेव्हा तू समोर होतीस’.

अंबरीश त्याच्यावर आणि अवनीवर झालेल्या हल्ल्याने खूप बिथरला होता.पण अवनी त्याची मजा करत त्याला म्हणते, ‘आई तारी त्याला कोण मारी!” आणि हसायला लागते.

अंबरीशला एवढ्या सीरियस परिस्थितीत  तिला असं मजा करताना बघून थोडं विचित्र वाटतं. त्याच्या चेहऱ्यावरचे ते एक्स्प्रेशन बघून ती त्याला म्हणते, ‘अंबरीश, अरे मला हे थोडाफार अपेक्षितच होतं’.

‘अपेक्षित होतं म्हणजे?, हे असं आपल्यावर हल्ला होणार हे तुला अपेक्षित होतं?’

‘हो!, म्हणजे माझ्यावार हल्ला होणार हे मला अपेक्षित होतं. पण तुझ्यावर नेमकं हल्ला झालाय की मला मारायचं होतं पण मी गाडीतून बाहेर पडल्याने आणि तू गाडीत असल्याने तुझ्या जीवावर बेतलं हे मला तितकं क्लिअर होत नाहीये’.

‘अवू, मला तर काहीच क्लिअर होत नाहीये तू काय बोलतियेस ते . प्लिज मला समजेल असं बोलशील का?’

‘अंबरीश, मला जे वाटतंय ते जर खरं असेल ना, तर मी तुला नक्की सांगते की अथर्वचा नैसर्गिक मृत्यू नाही तर खून झालाय. फक्त माझ्याकडे आत्ता हवे तसे पुरावे नाहीयेत. आणि एक गोष्ट मी तुला नक्की सांगते की त्या खुन्याला कळलंय की मला माहितीये की तो खुनी असू शकतो म्हणून आणि म्हणूनच माझ्यावर हल्ला झालाय. ह्या हल्ल्याने उलट मी योग्य मार्गावर आहे हे मला समजलंय. आता मला फक्त पुरावे हवे आहेत’.

अंबरीश हे सगळं ऐकून जरा चिडून आणि पॅनिक होऊनच म्हणतो, ‘अवनी, प्लीज तू कोड्यात बोलणं थांबवून मला स्पष्ट काय ते सांगणार आहेस का ?’

अंबरीशची घालमेल समजून अवनी त्याला म्हणते, ‘अंबरीश मला फक्त एक फोन कॉल करू दे, मग मी तुला सगळं सांगते ‘.

अवनी तिच्यासारखाच आज कसाबसा वाचलेला पण गंभीर जखमी झालेला तिचा फोन घेते आणि तिच्या एका कलीगला फोन करून सांगते,

‘तेजस, मी तुला ३ नंबर पाठवत आहे . मला ह्यांचे मागच्या ३ दिवसांचे कॉल रेकॉर्डस लवकरात लवकर हवे आहेत. खूप अर्जंट आहे त्यामुळे ताबडतोब हे काम कर’. अवनी फोन ठेवते आणि अंबरीशला सगळ्या गोष्टी सांगते. अगदी मिनुने परवा घडलेल्या प्रंसगाबद्दल सांगितलेल्या गोष्टीपासून ते तिने तसं सांगितल्यानंतर तीच्या मनात आलेला मिनूविषयीचा संशय आणि त्यासोबतच त्याच्याबद्दल आलेल्या वेगवेगळ्या शंका, तिचं अथर्वच्या डॉकटरांकडे जाणं, रेड लाईट एरियात जाणं, हे सगळं ती अंबरीशला सांगते. ते सगळं ऐकुन अंबरीश चाट पडतो. अवनिने प्रसंगावधान दाखवून किती गोष्टी केल्यात ह्याचं त्याला कौतुक वाटतं. ते सगळं सांगून झाल्यावर अवनी त्याला विचारते,

‘अंबरीश, तू जे मला सांगितलं त्यानुसार अथर्व जेव्हा त्याच्या घरी गेला, तेव्हा त्याच्या दारात एक ऑडी उभी होती, बरोबर?’

‘हो, बरोबर!’

‘तर, त्या गाडीचा रंग कोणता होता? हे असं काही बोलला होता का रे अथर्व तुला?

‘हो बोलला होता ना ! का?’

‘आईशप्पथ!, खरंच त्याने गाडीचा रंग सांगितला होता? ब्लॅक रंगाची ऑडी होती का?’

‘हो ब्लॅक रंगाची होती! पण तुला कसं माहित?’

‘ ते सोड. पण तुला खात्री आहे की अथवा ने तुला रंग सांगितला होता?’

‘ अगं हो मला शंभर टक्के खात्री आहे, कारण अथर्वचा फेवरेट कलर ब्लॅक आहे त्यामुळे तो म्हणाला होता की मिनुने त्याची चॉईस लक्षात ठेवून गाडीचा कलर चुज केला. म्हणून माझ्या ते चांगलं लक्षात आहे.’

‘ओह म्यान! मला वाटलंच होतं अंबरीश असं काहीतरी असणार आहे म्हणून!’ अवनी एकदम अधिरतेने म्हणते आणि लगेच घाईघाईने ती गूगलवर काहीतरी सर्च करायला लागते.

अंबरीशला अर्थातच पुन्हा काही कळत नाही. अवनीच्या डोक्यात एकदा काही आलं की ते करेपर्यंत तिला कशाचंच भान राहात नाही. तसं आत्ताही ती अंबरीशला काही न सांगताच तिच्या तंद्रीत गेली होती. तिने गूगल वरून कसलासा फोटो सेव केला आणि तो मिनुच्या वडिलांना पाठवला. तो पाठवताच ती अंबरीशकडे बघून म्हणली, ‘अंबरीश, आता मिनूचे बाबाच आपल्याला खऱ्या खून्यापर्यंत पोहचवू शकतात; फक्त मुलिवरचं प्रेम आता मध्ये यायला नको’. असं म्हणत अवनी मिनुच्या वडिलांना फोन लावते. अंबरीश अजूनही अशार्याने, कौतुकाने अवनीकडे बघत असतो. अवनीच्या जागी दुसरी कोणती मुलगी असती तर हे सगळं काय चाललंय म्हणून घाबरून गेली असती पण अवनी मात्र एखाद्या रहस्याचा शोध लागल्याच्या उत्साहात होती.

मिनुच्या वडिलांनी फोन उचलताच अवनी काही बोलायच्या आतच मिनुचे वडील तिकडून म्हणतात, ‘अवनी, बरं झालं तू फोन केलास. मी आत्ता तुलाच फोन करणार होतो. इथे एक प्रॉब्लेम झालाय’.

‘का? काय झालं काका?’ अवनी अधिरतेने विचारते.

‘अगं मिनू पळून गेलीये. मागचा एक तास झाला तिचा कुठेच पत्ता लागत नाहीये. तिचा फोन ही बंद आहे. आणि मी अंबरीशला फोन लावला तर त्याचाही फोन बंद येतोय. अवनी, तुला एक सांगू, मला अतर वेगळीच काहीतरी शंका येतीये. अंबरीश आणि मिनू तर पळून गेले नसतील ना ? कारण अथर्वची डेथ, मिनुचा आत्महत्येचा प्रयत्न. मला काहीच सुचत नाहीये  पण उगाच असं वाटतंय की अंबरीश तर ह्या सगळ्यात..’ त्यांचं वाक्य तिथेच तोडत अवनी  म्हणते,

‘काका, तुम्ही काळजी नका करू. मला माहिती आहे हे सगळं काय चाललंय ते. तुम्ही फक्त तुमचं व्हॉट्स अॅप चेक करा. तुम्हाला मी एक फोटो पाठवलाय. तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का तेवढं सांगा आणि ओळखत असाल तर प्लिज मला ताबडतोब पुन्हा फोन करा. कारण आता फक्त तुम्हीच काय ती मला मदत करू शकता’. असं म्हणत ती फोन ठेवते. तो फोन ठेवताच पुन्हा तिचा फोन वाजतो. आता तिच्या कलिगचा म्हणजेच तेजसचा कॉल असतो. ती फोन उचलताच तो म्हणतो, ‘मॅडम, तुम्हाला कॉल रेकॉर्डस पाठवले आहेत, एकदा बघा तुम्ही’.

ती लगेच घाईघाईत फोन ठेवते आणि ते कॉल रेकॉर्डस बघते.ते बघून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकतो. अंबरीश तिला पुन्हा एकदा विचारतो, ‘अवू, प्लीज मला सांग तुझ्या डोक्यात काय चाललंय ते’. त्यावर काहीच न बोलता अवनी तिच्या मोबाईल मध्ये सेव्ह झालेलं  मिनुच्या रूममध्ये ठेवलेल्या टेप रेकॉर्डर मधलं रेकॉर्डिंग जे तिने आधीही एकदा ऐकलेलं असतं ते पुन्हा एकदा ऐकते आणि ते ऐकताच सोफ्याच्या खुर्चीच्या हातावर जोरात मारत म्हणते, ‘येस! येस!,आय न्यू इट!आय न्यू इट.!’

अंबरीश तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाकडे नुसता बघत राहतो. ती अंबरीशजवळ जात त्याला आधार देत उठवते आणि म्हणते, ‘अंबरीश चल आपल्याला अथर्वच्या खुन्याला पकडायला जायचंय.

क्रमशः भाग १० वाचा : https://wachankatta.com/marathi-story-respect-part-10/

-प्रांजली कुलकर्णी

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !