• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

RESPECT / रिस्पेक्ट भाग -८

MARATHI STORY,RESPECT FOR LOVE, MARATHI STORY

अवनिने मागच्या काही मिनिटांमध्ये जे काही अनुभवलं होतं ते तिच्यासाठी खूप अस्वस्थ करणारं होतं आणि तिच्या कल्पने पलीकडचंही.

अवनी मेन रोडला लागते आणि एका क्षणी ती न राहवून तिची गाडी एका लेनमध्ये वळवते आणि रस्त्याच्या कड्याला गाडी पार्क करून स्टेअरींग वर दोन्ही हात पालथे ठेवून त्यावर आपलं डोकं ठेवत खूप रडायला लागते.

सकाळपासून घडणाऱ्या सगळ्या विचित्र घटना, त्यात तिचं ते रेड लाईट एरियात जाणं, रज्जो, शीला, रानी, तो विचित्र माणूस, त्या माणसाला बघताच शिलाचा उडालेला थरकाप आणि तिला तिथून जा म्हणतानाची तिच्या डोळ्यात दिसलेली हिच्या विषयीची काळजी आणि ह्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या अंबरीशने तिथे जाऊन काहीही वावगं केलेलं नसल्याची मिळालेली ग्वाही. ह्या सगळ्यानेच की काय माहित नाही पण आवनीला खूप रडायला येत होतं. अवनी जवळ जवळ पाच मिनिटं तशीच गाडीत रडत राहते पण नंतर ती शांत होते. स्वतःचे डोळे पुसत ती तिच्या गाडीची खिडकी खाली करते. खडकी उघडताच तिच्या चेहऱ्यावर आलेल्या वाऱ्याच्या झुळकेने तिला प्रसन्न वाटून तिच्या चेहऱ्यावर एक छान हास्याची लकेर उमटते आणि अश्या ह्या सगळ्या पाॅझिटीवनेस सकट अवनी एक दीर्घ श्वास घेते आणि अंबरीशला फोन लावते. अंबरीशने फोन उचलताच थोडीशी भावूक होऊन व प्रेमानेच ती विचारते,’अंबरीश कुठेएस?’

अंबरीशलाही काहीतरी वेगळं जाणवून तो विचारतो, ‘अवू तू कुठे आहेस? बरीएस ना तू?’

त्याला आपल्या आवाजावरून पण आपल्याला काहीतरी झालंय हे कळतंय ह्या जाणिवेने अवनीला पुन्हा खूप जास्त भरून येतं. आपण उगाच ह्यावर संशय घेतला म्हणून क्षणभर गिल्टीही वाटतं. पण स्वतःला सावरत आणि आवंढा गिळत अवनी म्हणते,

‘मी ठीकआहे रे! तू  हॉस्पिटल मध्येच आहेस ना ? मी निघालीये तिकडे यायला म्हणून म्हटलं एकदा कॉल करु’.

‘अवू, बरं झालं कॉल केलास तू ते. मी आत्ता मिनुच्या वडिलांच्या घरी आलो आहे. मिनूसाठी आणि त्यांच्यासाठी डब्बा करून ठेवायला सांगितला होता त्यांच्या शेफला, तोच घ्यायला आलो होतो.’

‘ओके ओके मला लोकेशन पाठव मी येते तिकडे तुला घ्यायला. गाडी नसेल ना तुझ्या कडे!.

अवनीला कधी एकदा ती अंबरीशला भेटेल असं झालं होतं. अवनीने अंबरीशने पाठवलेलं लोकेशन पाहिलं तर ते अगदीच जवळ होतं त्यामुळे अगदी दहा मिनिटात अवनी मिनुच्या वडिलांच्या घरी पोहचते.

एखाद्या मोठ्या बिझनेसमनचं असतं अगदी तसचं मिनुच्या वडिलांचं घर होतं. मोठ्ठा बंगला त्यासमोर लाईनीत सगळ्या मोठ्या ब्रँडच्या गाड्या,  जागोजागी सुरक्षा रक्षक, मोठी बाग आणि असं बरंच काही. ते सगळं पार करून अवनी त्यांच्या दारात पोहचते तर अंबरीश दारातच तिची वाट बघत उभा असतो. ती त्याला बघताच थोडी धावतच त्याला जाऊन खूप जास्त घट्ट मिठी मारते. अवानीच्या अशा वागण्याने अंबरीशला अवनिला काहीतरी झालंय हे मात्र नक्की कळतं. तो तिला थोडा बाजूला करत तिचा चेहरा आपल्या हाताने वर करत तिला विचारतो,

‘काय झालं?’ अवनिच्या डोळ्यात पाणी असतं. ती तश्याच भरल्या डोळ्याने त्याच्या कडे बघते आणि काही नाही म्हणत पुन्हा त्याला बिलगते. तितक्यात तिथे एक नोकर येतो आणि ‘साहेब टिफीन’ असं म्हणतो. त्याने भानावर येऊन अंबरीश त्याच्या हातून टिफीन घेतो आणि अवनिला विचारतो, ‘तुला पाणी प्यायचय?’

‘नको. तू चल आता पटकन फक्त. मला तुझ्याशी खूप काही बोलायचये आहे’. असं म्हणून अवनी त्याचा हात धरून घराबाहेर पडते. दोघेही गाडीत येऊन बसताक्षणीच अवनी अंबरीशला विचारते,

‘अंबरिश त्या फोटोंचा नेमका काय घोळ आहे? त्या रेड लाईट एरियात पुढे काय झालं?

तुला अथर्वने तिकडून कॉल केला एवढंच तू मला सांगितलंस. त्यापुढे काय झालं?

‘अगं हो सांगतो, पण तू आधी गाडी तर सुरू कर. मी सांगतो वाटेत तुला सगळं’.

‘नाही! मला आत्ता सांग. नाहीतर पुन्हा आपलं बोलणं अर्धवट राहील’. हे पटल्याने अंबरीश सांगायला सुरूवात करतो,

‘त्या दिवशी अथर्वचा मला फुल दारूच्या नशेत फोन आला की मी असं असं ह्या ठिकाणी आहे. मला मिनुला हर्ट करायचं म्हणून मी इथे आलोय अणि आज रात्रीसाठीची मझी आयटम पण मी शोधलिये. तेव्हा तू लवकर इथे ये. तू माझा यार आहेस तुझ्या पासून मी एकही गोष्ट लपवली नाही तेव्हा ही गोष्ट पण तुला सांगावी म्हणून मी तुला कॉल केला. असा अथर्वचा‌ फोन आल्यावर मी पार उडालोच. त्या दोघांमधले इश्यूज मला तेव्हा माहिती झाले होते, पण हा आज अचानक असा का वागतोय ह्याची काहीच मला टोटल लागत नव्हती. म्हणून मी आहे तसाच तिकडे जायला निघालो. तिकडे पोहचलो तर हा तसा रस्त्यालाच  एका मुलीच्या गळ्यात हात टाकून तिला जवळ घेऊन उभा होता. अवू, मला एवढं वेगळं वाटलं ना ते बघून पण त्याही पेक्षा भयानक कधी वाटलं सांगू? जेव्हा मी त्याच्या जवळ गेलो आणि त्या मुलीला पाहिलं तेव्हा. अवू, आपल्या अक्षूच्या (अंबरीशची सख्खी बहिण) वयाची मुलगी होती ती माहितीये. आणि ह्या नालायकला नशेत त्याची काहीच तमा राहिलेली नव्हती. त्यात ती इतकी घाबरलेली वाटत होती आणि ते सगळं बघून मला असह्य होऊन मी अथर्वला म्हणलो, साल्या तुझ्या बहिणीच्या वयाच्या मुलीसोबत झोपणारेस तू? आणि तेही तुझी बायको जिवंत असताना?

त्याने तर त्या दिवशी लाजच सोडली होती.मी असं म्हणताच तिथेच हातभर लांब उभ्या असलेल्या एका बाईला जवळ ओढून मिठीत घेत तो म्हणाला, ‘बरं ठीक ए! मग ही चालेल? ही तिची आई ए बघ. मग तिच्या सोबत झोपतो. ओके?’

अवनी हे सगळं श्वास रोखून ऐकत होती. ती नुकतीच शिलाला भेटून आल्याने, तिकडे जाऊन आल्याने तिला आणखीनच अंबरीश सांगत असलेली घटना स्पष्ट दिसत होती.

‘आणि मग पुढे? अथर्व झोपला शीलासोबत? आणि त्या फोटोत ती शीला आणि ती दुसरी मुलगी तुला का किस करत होती?’ अवनीने एखाद्या लहान मुलीसारखे त्याला प्रश्न विचारले.

अवनीच्या तोंडून शिलाचं नाव ऐकून अंबरीश अचंबित होऊन तिला विचारतो, ‘ए तुला कसं माहित तिचं नाव शीला आहे म्हणून ?

तशी अवनी त्याला म्हणते, ‘ ते तुला काय करायचंय! तू आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे’.

‘अगं हो, थोडा तरी दम धर. सांगतोच तर आहे ना सगळं मी!’ आणि अंबरीश पुन्हा सांगायला लागतो,

‘अथर्वने त्या मुलीला जवळ घेताच ती मुलगी म्हणजेच शिला आणि रानी म्हणजेच फोटोत्तली ती दुसरी मुलगी आमचे किस घ्यायला लागल्या आणि तेव्हाचेच ते फोटो आहेत.

ह्या प्रकाराने मला एकदम स्वतःचीच किळस वाटली आणि मी त्या मुलीला जोरात ढकललं आणि ती अक्षरशः बाजूला कोसळली. पण त्याक्षणी माझा एवढा संताप झाला होता की मझ्यामुळे तिला काही लागलं असेल वगैरे ह्याची मला काहीच पडलेली नव्हती. मी अथर्वची कॉलर पकडली आणि त्याला ओढत गाडीत घेऊन येउन बसवलं. तो तर पूर्ण नशेतच होता त्यामुळे त्याला कशाचीच शुध्द नव्हती. मी तिथून गाडी काढायला लागलो तर, रानी म्हणजे जीला मी ढकललं होतं ती माझ्या कारच्या खिडकीपाशी आली म्हणली, ‘सहाब्ब, दवाई के लिये तो भी पैसा देते जाओ’. तिच्या कडे बघितलं तर अवू, तिच्या डोळ्याच्या अगदी जवळ काच घुसली होती आणि नुसतं रक्त वाहत होतं.त्याक्षणी माझा जीव इतका कलवळला. मला पुन्हा तिच्यात आपली अक्षू दिसली. मी तिला पैसे देणार तोच तिच्या पाठीवर दोन्ही हातांनी धपाटे घालत तिची आई (शीला) तिला म्हणली, ‘ हरामखोर, भिक मांगेगी तू. ये सिखाया तेरे को मेने. धंदे के पहिले दीन गिराहिक नही मिला तो तू भीक मागेगी? भीक मागेगी तू?’ असं म्हणत ती तिला बदडत तिकडून घेऊन गेली.

अवू, खरं सांगतो, आयुष्यात इतकं जास्त हेल्पलेस मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या बहिणीच्या वयाच्या मुलीने मला किस केलं होतं, तिलाच मी जखमी केलं होतं आणि वरतून तिचीच आई तिला मझ्यामुळे मारत होती. अवू, मला न राहवून मी पैसे घेऊन अथर्वला गाडीत लॉक करून त्यांच्या मागे गेलो आणि त्यांना पैसे द्यायला लागलो तर तितक्यात तिथे एक माणूस आला आणि त्या दोघींनाही अमानुषपणे मारायला लागला. धंद्याच्या वेळी टाईमपास करताय म्हणून. ते सगळं माझ्या कडून नुसतं पहावलं गेलं नाही आणि म्हणून त्या मुलींना वाचवायच्या नादात माझी त्या माणसासोबत हाता पायी झाली. आजूबाजूचे काही लोक मध्ये पडले आणि त्या माणसाला तिथून घालवलं पण ह्या प्रसंगामुळे शीलाला खूप भरून आलं आणि ती म्हणाली,      ‘हमारे लिये पहिली बार किसी ने झगडा किया हैं. बहुत अच्छा लगा सहाब थांक यू’.

अवू, हे सगळंच भयानक होतं गं. एक माणूस त्यांना एवढा मारून गेला होता पण त्याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं. त्यांना मी त्यांच्यासाठी त्या माणसाशी भांडलो ह्याचाच एवढा आनंद झाला होता म्हणून सांगू.’

अवनीलाही भरून आलं होतं. ती तिचा आवंढा गिळत आणि अंबरीशचा हात हातात घेत म्हणते ‘मग पुढे?’

‘मग पुढे काही नाही. शिलाने आग्रह करून मला तिच्या खोलीत नेलं आणि अगदी आनंदाच्या भरात तिची सगळी स्टोरी सांगून टाकली.

तिला काही महिन्यांपूर्वी एड्स झाल्याचं तिने सांगितलं.पण त्यामुळे तिचा धंदा बसला.तिची मुलगी रानी, २० वर्षांची. शीलाने तिला आत्तापर्यंत ह्या सगळया जगापासून खूप लांब ठेवलं होतं.तिला शिकवलं होतं. पण आता तिचा धंदा बसल्याने रानीला धंद्यात आणल्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता म्हणून तिने राणीला धंद्यात आणलं होतं. आणि त्यादिवशी तिचा पहिलाच दिवस होता आणि अथर्व तिचा पहिलं गिऱ्हाईक.

अवनी, त्या दिवशी नकळत म्हण, नाहीतर रागात म्हण पण अथर्व एका लहान मुलीचं आयुष्य…’

असं म्हणत अंबरीशलाही थोडं भरून येतं.

तो सावरून तिला म्हणतो, ‘असो लाँग स्टोरी शॉर्ट हे सगळं ऐकून माझ्याकडे त्या दिवशी होते तेवढे पैसे मी राणीच्या हातात ठेवले तर ती इतक्या आनंदाने मला म्हणाली,’थाँक यू भैय्या!, अभी इन पैसोसे मैं कॉलेज की फी भरुंगी और फिर से काॅलेज को जाऊंगी’. तिला दुजोरा देत लगेच तिच्या पाठोपाठ शीला म्हणाली,

‘हा इसे हफ्तेभर पाहिले ही कालेजसे निकाला था. पैसा नही‌ भरा था ना. पर अभी फिर से जाएगी ये’.

अवूं, मी त्याचक्षणी कसलाच मागचा पुढचा विचार न करता तिला म्हणलो की , ‘हिला प्लीज ह्या धंद्याला लावू नका.मी देईन हिच्या शिक्षणाचा खर्च. फक्त मला माझ्या होणाऱ्या बायकोशी एकदा बोलू द्या’ असं त्यांना सांगताच त्या दोघी ही खूप खुश झाल्या. त्यांनी माझ्या बद्दल सगळी विचारपूस केली. मी ही त्यांना आपल्याबद्दल सांगितलं तर त्यांना तुझा फोटो बघावा वाटला म्हणून त्यांना मी तुझा फोटोही दाखवला आणि पुन्हा तुला घेऊन त्यांना भेटायला येईश असं सांगितलं. असं म्हणत अंबरीश त्याच्या खिशातून एक पत्र काढतो आणि अवनीला देत म्हणतो,

अवु, हेच सगळं मला आज सकाळी तुला सांगायचं होतं. अवनी त्याच्या हातातून पत्र घेत घाई घाईत ते वाचायला लागते. त्यात अंबरीशने तिला आत्ता जे काही सांगितलेलं असतं ते लिहिलेलं असतं आणि आणखीन शेवटी त्याने लिहिलेलं असतं की,

‘अवनी, मला त्या दिवशी पहिल्यांदाच ‘सेक्स’ ह्या गोष्टीची गंभीरता कळाली. एखाद्या मुलीला एखाद्या अनोळखी व्यक्तीला तिचं सर्वस्व देतनाची काय घालमेल असते किंवा भीती असते ती मी राणीच्या डोळ्यात आणि स्पर्शात बघितली. अवनी, मला माहितीये मी तुझ्यासाठी अनोळखी नाही. आपलं काही महिन्यातच आता लग्न ही होणार आहे पण एकद्याच्शी कायदेशीर काहीच नातं नसताना त्याला आपलं सर्वस्व देणं ही काही सोपी गोष्टी नाही हे मला ह्या प्रसंगामुळे कळलय. त्यामुळे इथून पुढे मी कधीच तुला सेक्ससाठी कन्विंस करायचा प्रयत्न करणार नाही. मला माहित्येय तू मझ्यासाठी स्वतःला ह्या बाबतीत खूप बदललं आहेस. इतके दिवस मला ह्याची जाणीव नव्हती पण आता झाली आहे तेव्हा तुझ्या प्रत्येक प्रयत्नांसाठी थॅंक यू आणि मी वेळोवेळी केलेल्या वेगवेगळ्या डिमांडसाठी सॉरी’.

ते वाचून अवनी खूप रडायला लागते. आणि  अंबरीशचा चेहरा स्वतः च्या हातात पकडत त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवते आणि त्याच्या गळ्यात पडत ‘लव यू’ म्हणते. अंबरीश तिला ‘ए वेडा बाई’ म्हणत तिचे डोळे पुसतो आणि तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणतो,

‘अवू ऐक ना, आपण आपल्या लग्नासाठी साठवलेले पैशे रानीच्या शिक्षणासाठी आणि शीलाच्या उपचारासाठी वापरुयात का?, आणि हे बघ मी तुला दाखवण्यासाठी त्यां दोघींसोबत माझा फोटोही काढला आहे’. असं म्हणत तो त्याच्या मोबाईलमध्ये काढलेला त्यांच्यासोबतचा सेल्फी अवनीला दाखवतो. अवनी तो फोटो बघते आणि खूप अभिमानाने, कौतुकाने आणि ‘”रिस्पेक्टने” त्याच्या कडे बघते आणि म्हणते,

‘अंबरीश, मला आत्ता ना जगातलं सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखं वाटतंय, त्यामुळे ते लग्नसाठीचे पैसे म्हणजे काय क्षुल्लक गोष्ट आहे अरे मझ्यासाठी! त्यामुळे देऊन टाक तू ते. आणि तुला अजुन पैसे हवेत का?  सांग मला तसं! कारण तुझ्या होणाऱ्या बायकोचं प्रमोशन झालंय त्यामुळे तू बास सांग फक्त तुला काय हवंय ते!

‘काय सांगते अवू?’ असं म्हणत दोघेही पाणावलेल्या डोळ्यांनी आणि भरल्या मनाने आदराने आणि समाधानाने एकमेकांना मिठी मारतात.

पण अजून त्यांचा संघर्ष संपलेला नव्हता. नियतीला त्यांना अजून गुपितं सांगायची होती.

गाडीत त्यांचं बोलणं संपल्यावर अवनी तिथून निघायच्या आधी अंबरीशला म्हणते,

‘अंबरीश, तू बस इथे. मी 5 मिनिटात आले.’

‘अगं ए कुठे चाललीस? सांगून तर जा! आणि आधीच आपल्याला खूप उशीर झालाय लवकर ये’. असं मिनुच्या वडिलांच्या घराच्या दिशेने जाणाऱ्या अवनीकडे बघत अंबरीश ओरडून म्हणतो.

अवनीही त्यांच्या घराच्या गेटपर्यंत पोहचते आणि तिला भयंकर जोरात आवाज येतो म्हणून ती घाबरून मागे बघते आणि ‘अंबरीशssss’ असं जोरात किंचाळते; कारण अंबरीश बसलेल्या गाडीवर एक ट्रॅक धडकल्याने त्या गाडीचा चुराडा झाल्याचं ती बघते.

क्रमशः भाग ९ वाचा : https://wachankatta.com/marathi-story-respect-5/

-प्रांजली कुलकर्णी

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !