स्वप्न आणि ध्येय पुर्ती यामधला अनोखा एक प्रवास-
मला आठवत आमच्या शाळेत अनेकदा शिक्षक अनुपस्थित असल्यामुळे बदली सरांचा तास व्हायचा. अशा तासावेळी हमखास काही हसी-मजाक आणि गमती जमती घडायच्या. त्यातल्या त्यात बदली सरांचा/मॅडमचा आवडता टॉपिक म्हणजे तुम्हाला मोठे पणी काय बनायचे? तुमचे ध्येय काय? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही पण खूप मजेशीर द्यायचो ते म्हणजे सर्वात हुशार सांगणार डॉक्टर बनणार, त्याखालोखालचा सांगणार इंजिनियर बनणार आणखी कमी हुशार सांगायचे वकील बनणार सर्वात कमी हुशार सांगायचे पोलीस बनू, सैनिक बनू इत्यादी. माझा सारखा डेरिंग करून जर म्हटला मोठे झाल्यावर मला डॉक्टर बनायचे तर सगळा वर्ग हसायचा आणि म्हणायचा तू डॉक्टर झाल्यावर पेशंटचा आजारच काय तर तुला पाहून ते स्वतःच पळून जातील, आता त्यांना कुठे सांगू शकत होतो तेव्हा की डॉक्टर फक्त माणसांचे नाही तर मोटार गाडी, जनावरे, शेती यांचेही डॉक्टर असतात! त्या गोष्टींची गम्मत तेव्हा कमी आणि आता जास्त वाटते कारण ज्या पोरांना सॉक्स जोडी रंग जुळणारी घालावी लागते की भिन्न चालते हेही न कळण्याच्या वयात आपण मोठे पणी कोण बनावे हे कसे सांगता येईल बर! विशेष म्हणजे खाण्या पिण्या पासून राहण्या खेळण्यापर्यंत ज्यांना आवडी निवडीच नाहीत ते काय ठरवू शकतील त्यांचे ध्येय?
लहान वयात आम्हाला सांगितले जायचे ध्येय ठरवले तरच तुम्ही कुणीतरी मोठे बनू शकाल अथवा असेच रहाल. मोठे बनणे म्हणजे नेमके काय हे तर अजूनही समजले नाहीच, आणि समजेल असे वाटतही नाही. कारण मोठी लोक जसे की सचिन तेंडूलकर याला वाटले असेल का हो भविष्यात जाऊन तो इतका मोठा खेळाडू बनेल आणि देशात नाही तर जगात क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत बनेल? सचिन ने ठेरवलेले ध्येय निश्चित मोठेच असेल परंतु त्याचा परिणाम आणि यश इतके अप्रतिम असेल असे तर नाही ना? म्हणजे पाहिलेले स्वप्न आणि गाठलेले ध्येय यात तफावत नक्कीच असू शकते यात दुमत नाही. माणसाने ध्येयवेडे असणे गैर नाही परंतु अपेक्षित साध्यचं आपले मूल्यमापन करते हेही महत्वाचे.
राजमाता जिजाऊ यांच्या प्रमाणे सर्वांचेच पालक आपल्या पाल्याला असे ध्येय ठरवून देत असतील असे थोडीच आहे? छत्रपती शिवाजी राजांना त्यांच्या आई जिजाऊनी एक स्वप्न दाखवले ते म्हणजे स्वराज्याचे, अशा स्वप्नाला आपलेसे करून महाराज खंबीर होऊन सामोरे गेले आणि बघता बघता स्वराज्य, स्वाभिमान, निष्ठा, प्रामाणिकपणा, वतन प्रेम यांची शिकवण आपल्याला देऊन गेले.
आमच्या शाळेत सांगायचे अगदी तसेच स्व. यशवंतराव चव्हाण बिनदिक्कत बोलले मोठे होऊन मला माणूस बनायचे. आता प्रामाणिक सांगा यशवंतराव खरच किती किर्तीवंत ठरले?
एक माणूस नाही तर आदर्श राजकारणी, शिस्तप्रिय विद्यार्थी, संयमी वक्ता, उत्तम प्रशासक असणारे चव्हाण साहेब राज्य आणि देश दोन्हींचे नेतृत्व अगदी खंबीर पणे करताना सर्वानीच पहिले. मग आता लहानपणी यशवंतरावांनी ठरवले असेल का मुख्यमंत्री
बनायचे अथवा संरक्षण मंत्री बनायचे?
बर आता आपल्याला सांगतात स्वप्न मोठी असावी आणि त्यांचा पाठलाग करण्याची जिद्द असावी. मग धीरूभाई अंबानींनी निश्चित स्वप्न मोठी पाहिलीही असतील, त्यांचा पाठपुरावा करण्याची जिद्दही बाळगली असेल पण अशीच स्वप्न त्यांनी अनिल आणि मुकेश
दोघांनाही पाहायला शिकवले असेल का? आणि जर दोघांनाही सारखी शिकवण देऊन पण सध्या
करण्यात इतकी तफावत कशामुळे? मुकेश अगदी यशाच्या शिखरावर आणि अनिल व्यवसाय
वाचविण्याच्या विवंचनेत असे का?
विजय मल्या यांनीही अशीच मोठी स्वप्ने कदाचित पहिली असावीत, त्यातील बहुतांशी पूर्णत्वास गेली पण असावीत; त्यांचा मुलगा सिद्धार्थ यानेही ध्येय ठरवले असणारच की परंतु त्यांचा व्यवसाय जोपर्यंत यशस्वीपणे आणि सुरळीत होता तोपर्यंत त्यांच्या मागे गोंडा घोळत फिरणाऱ्या बँका आजच्या घडीला हात धुवून मागे लागल्यात ते का उगीचच का?
एकूणच आपण ध्येय आणि लक्ष ठरविणे हा एक भाग आणि त्यापर्यंत पोहोचणे हा दुसरा भाग, या सर्व प्रवासात येणारी असंख्य वळणे ठरवतात आपण कोणते ध्येय कितपत गाठू शकतो. एकूणच माझा मते ध्येय न ठरवणे हा काही गुन्हा नाही तसेच ध्येय ठरवून वाटचाल करणे हा काही मोठा पराक्रम नाही. ध्येय वेड्या माणसांचा एकच फायदा की त्यांना दिशा असते काय करावे याची आणि ध्येयहीन माणसाचा एकच फायदा की ते जे साध्य करतील तेच त्याचं (न) ठरविलेले ध्येय समजतील. म्हणूनच वाचकाने आता ध्येय ठरावा अथवा गाठले तेच ध्येय समजा आणि एका नव्या आयुष्याची सुरवात करा तेही अगदी आनंदात.
शब्दांकन- तेजस कोल्हे