• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

RESPECT / रिस्पेक्ट भाग -१

marathi story, LOVE STORY

आज तिलाही स्वतःवर ताबा ठेवणं कठीण वाटत होतं. तिने त्याला घट्ट मिठी मारली होती. आज जवळ जवळ सहा महिन्यांनी ते दोघे एकमेकांना भेटत होते. त्यामुळे आजची अंबरीशची मिठीही तिला जरा वेगळीच वाटत होती. पण अवनीने आज ठरवलंच होतं की गेले ५ वर्ष तिने जी त्या दोघांमध्ये एक रेष ओढलिये ती रेष आज पुसून टाकायची आणि सर्वार्थाने त्याचं व्हायचं. अशा विचारवजा निष्यायानेच अवनी अंबरीशच्या ओठांवर ओठ टेकवते. अवनीचं हे रूप पाहून अंबरीशही थोडासा गोंधळतो. त्याला क्षणभर काय करावं ते काहीच सुचत नाही पण तो लगेच स्वतःला सावरतो आणि तिच्यापासून जरासा लांब होत तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरतो. ती अगदी भांबावून त्याच्याकडे पाहते. तो क्षणभर तिच्या डोळ्यात पाहून तिला आधीपेक्षा आणखीन जवळ ओढतो आणि कपाळावर एक मोठा उसासा टाकत त्त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवतो आणि क्षणभर तसाच थांबून तो म्हणातो ‘नको’. अवनी त्याच्या ‘ नको ‘  ने खाडकन् भानावर येते. आता तिला काय करावं ते सुचत नाही. तो तितक्यात तिचे दोन्ही हात त्याच्या हातात घट्ट पकडतो आणि तिच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणतो..’इतके दिवस थांबलो आता अजून थोडं थांबूयात?

अवनी त्याच्या ह्या बोलण्याने प्रचंड गोंधळते. त्या एका क्षणात तिच्या डोक्यात नाही नाही ते विचार येऊन जातात. अगदी ‘ह्याचा आपल्यात इंटरेस्ट राहिलेला नाही पासून ते आपण ह्याला आधी इतक्यांदा नाही म्हणालो त्याचा तर हा बदला ss s..’ इथपर्यंत. ‘छे! नाही नाही! काहीही काय? अवनी कुल डाऊन…कुल डाऊन अवनी! इट्स ओके’ असं स्वतःच्या मनात पुटपुटतच अवनी नजर चोरून त्याने पकडलेल्या तिच्या हातांकडे बघायला लागते.

मुळात पक्की पत्रकार असल्याने अवनीला प्रत्येक बाबतीत जेवढा चांगला विचार करायची सवय होती तितकाच टोकाचा वाईट विचार करायचीही सवय होती. पण त्याक्षणी मात्र तिच्या मनात चांगल्या पेक्षा नको तेच विचार येत आहेत हे कोणीही तिच्या चेहऱ्याकडे बघून सांगितलं असतं आणि  अर्थातच ह्या सगळ्याचा अंदाज अंबरीशला येऊन तो तिला  सोफ्यावर बसवतो आणि तिच्या पायाशी बसत तिच्या गुडघ्यांवर आपले दोन्ही हात ठेवून तिच्याकडे बघत तो म्हणतो  ‘अवनी s s s…!’. अवनीचे हात थंड पडतात. कारण त्यांनी एकमेकांना कमिट केल्यापासून अंबरीशने कधीच तिला ‘ अवनी ‘ म्हणून हाक मारलेली नव्हती, तो कायम तिला ‘अवू ‘ म्हणायचा. पण गेल्या पाच वर्षांत आज पहिल्यांदाच त्याने तिला ‘ अवनी’ म्हटलं होतं. त्यामुळे नक्कीच मागच्या ६ महिन्यात मी इथे नसताना काहीतरी झालं असणार आणि म्हणून अंबरीश मला असं दूर करतोय हे अवनिला आता अजून तीव्रतेने वाटायला लागलं होतं. अवनी खूप घाबरली होती कारण एरवी लग्नाआधी सेक्स न करायच्या तिच्या एकटीच्या ह्या निर्णयामुळे अधून मधून का होईना त्यांच्यात कुरबुरी झाल्या होत्या. पण तिचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता पण आज माहित नाही तिच्या मनात एकही चांगला विचार येत नव्हता.

तो तिच्याकडे बघत बोलायला लागला; ‘अवनी s s s, मला माहितीये ‘लग्नाआधी सेक्स’ ही तुला न पटणारी गोष्ट आहे पण तुला हे ही माहित आहे की माझे ह्याबाबतीत……’

तितक्यात अवनिचा फोन वाजतो. तिला कशाचीही शुध्द उरलेली नव्हती.ती फक्त कानात प्राण आणून अंबरीश काय बोलतोय हे ऐकत होती.

‘अवनी फोन…!’

‘हां बोल ना तू, तुझे ह्याबाबतीत काय? ‘

‘अगं फोन वाजतोय तुझा!’

‘अं…हां ! हां ओके..’ अवनी थोडीशी भानावर येते आणि म्हणते ‘ते राहू दे मी बघते नंतर! तू बोल आधी…’. तितक्यात फोन कट होतो आणि अंबरीश तिला म्हणतो ‘अगं मॅडमचा कॉल येणार होता ना तुला?, पुढच्या प्रॉजेक्ट ची माहिती द्यायला? कॉल न घेऊन कसं चालेल? तू कॉल बॅक कर आधी!’. तितक्यात फोन पुन्हा वाजतो..अवनीला अजूनही काही सुधरत नव्हतं. ‘अगं घे ना फोन!’ अंबरीश थोडासा पॅनिक होत तिच्या हातात तिचा फोन ठेवतो. तशी ती फोन उचलते

‘हॅलो!

हां बोलतिये..

काय??????????’

ती अंबरीशकडे खूप परक्या नजरेने पाहते आणि तिथून उठून फोन वर बोलतच बालकनित जाते… अंबरीशलाही काय चाललंय ह्याची टोटल लागत नाही… मिनटाभरात अवनी बाल्कनीतून पुन्हा आत येते. अंबरीश तिला पाहून लगेच उठून तिच्या जवळ जाऊन तिला विचारतो ‘ओय काय झालं? बरिएस ना तू?’; ती काहीच बोलत नाही. अंबरीश अस्वस्थ होऊन तिचा हात हातात घेत म्हणतो ‘ काय झालंय सांगशील का?’ अवनी एकटक आणि खूप घाबरलेल्या आणि अविश्वासाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहते. त्याने तो आणखीनच अस्वस्थ होतो आणि आवाज वाढवून म्हणतो ‘ अगं ए काय झालंय? अशी का बघतेस?’ अवनी त्याचा हात झटकत आपला अवंढा गिळते आणि….

क्रमशः भाग २ वाचा https://wachankatta.com/respect-story-part-2/

-प्रांजली कुलकर्णी

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !