नमस्कार मित्रांनो आज या लेखमालेचा दहावा व अंतिम लेख. नाट्यप्रयोग हा एक सांघिक सर्व गोष्टी मिळून तयार केलेला प्रयत्न आहे. नटाचा अभिनयाव्यतिरिक्त इतर काही परिणाम साधणाऱ्या गोष्टींची नाटकाच्या यशस्वितेसाठी फार गरज असते . नाट्य यशस्वी होण्यासाठी सजावट, पाश्र्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल आज थोडक्यात विचार करू .नाटक हे संसाराचे चित्र आहे ही गोष्ट एकदा आपण मान्य केल्यावर केवळ अभिनयातच नाही तर सर्वच बाबतीत ते मानवी व्यवहारास धरून असावे.विशिष्ट प्रसंग नाट्यरूपाने दाखवायचा म्हटला की तो प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभा करण्यासाठी निरनिराळ्या साधनांची योजना करणं आवश्यक असते .” अधिकस्य अधिकंफलम् “या न्यायाने नृत्य’, संगीत, सजावट इत्यादीकांची जोड मिळाल्याने नाटकास उठाव मिळतो.
रंगभूमीवरील प्रकाशयोजना हाही एक स्वतंत्र तांत्रिक विषय आहे प्रकाशयोजनेत विविधता निर्माण करून विशिष्ट प्रसंगांचा चित्रणाची परिणामकारकता साधता येते. पार्श्वसंगीतात रंगभूमीच्या पाठीमागे काही सूचक नाद निर्माण करून वास्तवतेचा आभास उत्पन्न करता येतो समुद्राच्या लाटा ,घोड्यांच्या टापा, मोटारीच थांबणं इ. पूर्वी नाटकात मेघांचा गडगडाट होऊन पाऊस पडत असलेला दाखवायचं असल्यास पाऊस पडताना प्रत्यक्ष दाखवायचा नसेल तर पाठीमागे एखाद्या लाकडी फळ्यांवर वाटण्यासारखे धान्य किंवा खडे अोतीत राहिल असता पावसाचा नाद निर्माण होत असे. समुद्राच्या लाटांचा आवाज दाखवायचा असेल तर लाकडाच्या फळीवर काच कागद(sand paper )पासून आवाज काढायचे.पण आता पाश्र्वसंगीत एवढं प्रगल्भ झालेल आहे सगळ्या पद्धतीचे आवाज सगळं संगीत सहज उपलब्ध आहे . जुन्या संगीत नाटकात पाश्र्वसंगीताची योजना करण्याची पध्दत नव्हती प्रत्यक्ष रंगभूमीवर संगीताची इतकी खैरात केली जात असे रंगभूमीवरील संगीत आणि पाश्र्वसंगीत उद्दिष्टच भिन्न आहे .निदान जुन्या काळी नाटकाची पदे केवळ प्रेक्षकांना गाण्यांची मेजवानी देण्याच्या उद्देशानेच म्हटली जात असत. मित्रांनो केवळ विशिष्ट प्रसंगांत उठाव देण्यासाठी विशिष्ट भावनाविष्कारास साहाय्य करण्यासाठी पाश्र्वसंगीताची जोड दिलेली असते .या पाश्र्वसंगीताची कल्पना चित्रपटावरून सुचलेली आहे. चित्रपटात जवळजवळ प्रथमपासून अखेरपर्यंत वाद्याचे मंद स्वर ऐकू यावे अशी योजना असते .विनोदी नाटकात पाश्र्वसंगीताची जोड विशेष नसते .रंगभूमीवर पात्राचे संभाषण चालू असताना पाश्र्वसंगीत मंद असावे पाश्र्वसंगीतामुळे त्यांचं भाषण प्रेक्षकांना नीट ऐकू येणार नाही असे नसावे. रंगभूषा मेकअप – हा देखील खरोखरंच तांत्रिक विषय आहे. पण प्रत्येक नटाने स्वत़: आपली रंगभूषा करण्यास शिकणं हे जास्त श्रेयस्कर आहे .एकदा पध्दत माहिती झाली म्हणजे त्यात काही अवघड नाही .वेशभूषा- नाटक पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक असेल त्याप्रमाणे त्या काळास अनुसरून वेशभूषा करावयास पाहिजे . मित्रांनो रंगभूमीस आपण देवता मानतो निष्ठापूर्वक तिची सेवा करणाऱ्या भक्तांवर रंगदेवतेचा प्रसाद झाल्यावाचून राहात नाही,अशा प्रत्येक अभिनेत्याने नटाने विश्वास बाळगावा .आज ही लेखमाला इथेच संपत आहे. तुम्हाला मला संपर्क करायचा असेल तर माझा मोबाइल
नंबर 9820003955 .गुरुदत्त लाड .