• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

GIR NATIONAL PARK / गीर अभयारण्य ( प्रवास वर्णन )

GIR NATIONAL PARK

कॉन्फरन्स साठी राजकोटला जायच ठरलं  आणि अचानक गीर अभयारण्याला  भेट देण्याचा योग आला.  तोपर्यंत गीर अभयारण्याविषयी  फक्त ऐकून होते पण प्रत्यक्ष गीरला  जायचा योग आजच आला होता.  गीर …  गुजरात मधल्या जुनागड जिल्ह्यात वसलेलं आशियाई सिंहांचं   वसतिस्थान असलेलं  भारतातल एकमेव ठिकाण.  राजकोट वरून रस्ता मार्गे जाताना गिरनार हे दत्ताच जागृत देवस्थान लागतं.  गीरहून  सोमनाथ ही जवळच असल्याचं कळलं होतं.  पण हातात वेळ थोडाच असल्याने फक्त गीर अभयारण्याला  भेट द्यायचं ठरलं.  जस   जसं  अभयारण्य जवळ यायला लागलं तशी रस्त्यावरही दुतर्फा बोरीची झाडं  दिसायला  लागली .  रस्त्यावर नुसता बोरांचा सडा पडलेला . अगदी वेडावून जायला झालं . पण जंगल म्हणून आपली जी कल्पना असते , घनदाट डेरेदार वृक्ष,  हिरवगार वन ,  तसं काही दिसत नव्हतं.  झाडं  बऱ्यापैकी मातकट रंगाची,  काहीशी रुक्ष,  विरळच म्हणता येतील अशी दिसत होती.  इथे राहत असतील का एवढे  सिंह ?  मनात किंतु आलाच.  एकदा तर वाटलं,  आपण एवढ्या लांब आलोय पण काही न बघताच परत जावं लागणार की काय?  अमिताभ बच्चनच्या जाहिरातीत पाहिल्याने  मात्र गीर  बघावसं वाटत होतं.  क्लब महिंद्रा च्या हॉटेलमध्ये बॅगा टाकल्या आणि फिरायला बाहेर पडलो.  सासण  गाव होतं ते . साधं , गरीबसं ,  आधुनिकतेचा स्पर्श न झालेलं.  विटा मातीची  घरं आणि घराच्या पाठी  असलेली शेती  सांभाळणारी माणसं. हे गावकरी  गाईगुरं  राखून होते.  त्यांच्याशी बोलताना कळलं ही इथे ही सिंह  येतात. मात्र सिंह आल्यामुळे कोल्हे , तर सांपासून होणारी  शेतांची नासधूस टळते . गुरांना मात्र जपावं लागत.  तुम्ही अंधार पडायच्या आत हॉटेलमध्ये जा.  हॉटेलच्या गेटवरही  सिंह फिरतात.  बापरे .. आमची घाबरगुंडी झाली . आम्ही तिथेच त्यांच्या घरगुती धाब्यावर काठीयावाडी भोजनाचा आस्वाद घेतला आणि खोल्यांवर धूम ठोकली.  न जाणो ,  जंगलचा राजा इथेच भेटायला आला तर.  दुसऱ्या दिवशी  पहाटेसाठी  आमच्या जंगल सफारी च्या जिप्सी गाड्या बुक झाल्या होत्या.  ह्या जिप्सी ओपन जीप होत्या. त्यांना  कुठलंही ग्रिल नव्हतं.  एका जीपमध्ये सहा माणसं,  ड्रायव्हर कडे सुद्धा कसलही हत्यार नाही.  पहाट होत होती . आम्ही निघालो.  तांबडं फुटत होतं.  आमच्या जीप  जंगलातून जायला लागल्या.  म्हणे जंगल सफारी चे बारा रस्ते होते.  प्रत्येकाचा मार्ग वेगळा.  तुमचं नशीब जोरावर असेल तर तुम्हाला सिंह दिसतील.   असं  तो प्रत्येकाला सांगत होता की काय ठाऊक नाही.  जंगलातून जीप जाऊ लागली.  पाणथळ जागी बगळे,  झाडांवर अगणित पोपट ,  बुलबुल,  विविध प्रकारचे पक्षी,  माकडं … सगळं बघत पुढे चाललो होतो आणि मोरांचा थवा च्या थवा आडवा आला . एवढे मोर ?  एक मोर बघायला आसुसलेले आम्ही,  एवढे मोर दिसल्यावर काय पाहू आणि काय नको असं झालं.  इतक्यात झाडीत सांबर दिसलं आणि मग सांबरांचे  कळप दिसायला लागले . जीपच्या दोन्ही बाजूंना कोणी न कोणी प्राणी दिसतच होते.  एक नील गाईंचा कळप दूरवर दिसला.

           1906 साली  ब्रिटिश व्हाइसरॉय एच.  ई.  लॉर्ड जॉर्ज कर्झन  ला नवाब रसूल खांजीने  सिंहाच्या शिकारीचं आमंत्रण दिलं होतं.   सिंहाची शिकार हा नवाबांचा  खास खेळ होता.  लोर्ड कर्झन  जुनागडला पोचला.   स्थानिकांनी त्याला गार्‍हाण घातलं .  इथे आता पंधरा-वीसच  सिंह शिल्लक आहेत,  त्यांना जीवदान द्या.  लॉर्ड कर्झनने  शिकारीचा बेत रहित केला.  वनसंपदेच आणि वन्यजीवांच महत्व जाणाऱ्या लॉर्ड कर्झन  ने इथे सिंहांच्या शिकारीवर बंदी घातली.  सिंहांची संख्या हळूहळू वाढायला लागली.  1969  मध्ये हे अभयारण्य म्हणून घोषित झाल.  1436 चौरस किलोमीटरवर पसरलेलं हे अभयारण्य पुढे राष्ट्रीय वन म्हणून घोषित झाल.  पाचशेपेक्षा जास्त सिंहांचा मुक्त वावर असलेलं आफ्रिके खालोखाल जगातलं हे मोठं  अभयारण्य आहे.  पावसाळ्यात सिंहांचा  विणीचा हंगाम असतो तेव्हा इथे कोणालाही प्रवेश नसतो.  चाळीस हजार  चितळ,  दोन  ते अडीच हजार सांभर इथे असल्याने ‘ जीवो जीवस्य जीवनम्’ ,  ही साखळी येथे जोपासली जाते.  कमलेश्वर जलाशया मुळे प्राण्यांच्या पाण्याची सोय होते.  गाईड सांगत होता आणि अचानक त्याने म्हटलं, ‘ शांती  राख जो’  आणि बाजूच्या झाडाकडे त्याने  हात केला.  आमचे श्वास रोखले गेले.  मातकट रंगाच्या झाडीत,  खाली भुरकट रंगाचा पाचोळा  पडलाय,  वरून सुर्याची पहिली किरण अंगावर घेत जंगलचा राजा सिंह सूर्यस्नान करतोय . त्याच्यापासून काही अंतरावर सिंहीण राणी सरकार न्याहारीला काय करावं याचा विचार करत आहे आणि दोन बछडे खेळत आहेत.  साक्षात राज परिवार आमच्यापासून दहा पंधरा फुटांवर होता.  पूर्वापार काळापासून  शौर्याचं प्रतीक असलेला सिंह,  राजमुद्रेवर स्वतःचा ठसा उमटवणारा सिंह , देवीच वाहन असलेला  सिंह…  आमच्या समोर  होता . आमचे  श्वास थांबले होते.  काय त्याची  ती घनदाट आयाळ , बारीकशी  सिंह कटी,  मायाळू पण भेदक  डोळे, मात्र  वाघाच्या डोळ्यांसारखी जरब त्यात नव्हती . मात्र ते डोळे स्वतःतच मशगुल  होते.   फोटो काढण्याचही  आम्हाला भान उरलं नाही.  मोठ्यानं बोलायचं नाही आणि जीप मधून उतरायचं नाही अशी गाईडची  ताकीद आठवत होटी.  फ्लॅश न वापरता कोणीतरी  फोटो काढले. मात्र  त्याचा रुबाब फोटोत मावणार नव्हता .  एवढ्यात जीपच्या समोर भर रस्त्यावर दोन वनराज मॉर्निंग वॉक करायला आले.  आता मात्र आमची बोबडी वळली .  त्यांनी जीपला एक धक्का दिला असता तरी सगळे त्यांच्या ताटात जाऊन पडलो असतो.  सिंह त्या वनाच्या  रंगात मिसळून गेला होता.  आता त्या वनाच्या रंगाचं आणि सिंहाच्या रंगाचं  रहस्य ध्यानात आलं होतं .  सिंह राजा आदमी असतो. तो  आपणहून  आक्रमण करत नाहीत , गाईडने सांगितलं. खरच ..  ते तर आमच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते,  ते त्यांच्याच मस्तीत होते.  या सिंहांना म्हणे बंदुकीतून नशेच  इंजेक्शन देतात म्हणून ते गप्प आहेत,  इति –  एक अडीच शहाणा वदला.  वास्तविक या अभयारण्यात जैविक साखळीचा समतोल राखला गेलाय .  या वन्यजीवांना मुक्त ठेवलय .  त्यांच्या अधिवासावर कुणी  आक्रमण करत नाही,  म्हणून ते ही कोणावर आक्रमण करत नाहीत .  त्यांच्या जगाचे नियम माणूस मोडतो तेव्हाच ते त्याला शिक्षा करतात.  त्यांचे कायदे पाळणार्‍याच्या वाटेला ते कधीच जात नाहीत.   जीप हलल्या .  पुन्हा पुढे दोन-तीन वळणांवर वनराजांनी मनसोक्त  दर्शन दिलं.  प्राणीजगत अनुभवण्याची पहाट आणि संध्याकाळ अशा वेळा साधल्या , तर हे वन्य विश्व भरभरून तुम्हाला दिसतं.  पुढे निघालो तर पुन्हा एक मोरांचा थवा डोक्यावरून उडत गेला.  निळा बिलोरी प्रकाश न्याहाळण्यासाठी माना वर केल्या , तर काय …  टेकाडावर साक्षात बिबट्या उभा होता.  त्याचा आक्रमक बाज  सिंहा पेक्षा वेगळा होता.  तो आत्ता खाली झेप घेईल की काय असं वाटेपर्यंत तो दिसेनासा झाला . आम्ही कृतकृत्य झालो होतो . आता अधून मधून  दिसणारे तरस , सांबर, चितळ  सरावाचे झाले होते.  तळ्यातल्या मगरी पाहण्यात फार स्वारस्य उरल  नव्हतं.  मुंग्यांच महाकाय  वारूळ , क्वचित झाडावर दिसलेला  अजगर वनाची दहशत मध्येच जाणवून देत होते.  पण मन गीरच्या सिंहांनी भारून टाकलं होतं. 

      जीप  एका गावासारख्या दिसणाऱ्या भागाजवळ आल्या.  तिथे आफ्रिकन लोकांची वसाहत होती.  आफ्रिकन आदिवासी शतकांपूर्वी इथे आले,  इथेच राहिले आणि इथलेच  झाले. वन्य जीवनात मिसळून गेलेले  हे  मालधारी , वनात  मध  काढतात,  आपली उपजीविका करतात . गुजराती भाषा बोलणाऱ्या या आफ्रिकन लोकांचं गुजरात सरकार आता पुनर्वसन करत आहे . तिथून वनातच असलेले  कंकाई  माता मंदिर , कमलेश्वर जलाशय  बघायला गेलो.  पण गिरचे सिंह आणि करड्या , भुरक्या,  विरळ,  विस्तीर्ण अभयारण्याने मती गुंग झाली होती . कोणाला किती प्राणी दिसले हे जाणून घेण्यात मला काडीचही स्वारस्य नव्हतं.  कारण मी बघितलेलं वन्यजीवन  अद्भुत होतं आणि ते बघायला पुन्हा पुन्हा मला

गीरला जायचं होतं. 

डॉ. स्मिता दातार

drsmitadatar@gmail.com

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !