• Mon. Dec 23rd, 2024

वाचकांचे आणि लेखकांचे हक्काचे व्यासपीठ !

ASHIRWAD / आशिर्वाद

आजचा रविवार सत्कारणी लावावा म्हणून स्वयंपाकघराची साफसफाई करायचं ठरवलं.  किचनमधल्या कपाटांवरून नजर फिरवली, आणि लक्षात आलं की, किती वेगवेगळ्या त-हेची भांडी, डबे, ताटं अस्ताव्यस्त विराजमान झाली आहेत.

लगेचच डोळ्यासमोर जाहिरातीतली मॉड्युलर किचन आली.  एकसारखी कपाटं, त्यात चित्रात काढल्यासारखे एकसारखे टप्परवेअर किंवा तत्सम ‘चांगल्या ‘ कंपनीचे डबे  असतात. किचन ट्रॉलीत मेलामाईन किंवा ला ओपेलाचे डिनर सेट, नॉनस्टीक तवे, कढई  किचनची शोभा वाढवत असतात. ओट्यावर, सॉरी, किचन प्लॅटफॉर्मवर मायक्रोवेव्ह, फूड प्रोसेसर दिमतीला हजर असतात.  किती छान वाटत असेल अशा किचनमधे काम करायला. आपल्याला कधी अशा स्वयंपाकघरात काम करायला मिळेल ह्या विचारांत कपाटातले चहा साखरेचे डबे पुसायला सुरूवात केली. “किती जूने डबे आहेत हे!” मनात विचार येऊन गेला. जुन्या घाटाचे स्टीलचे डबे होते ते. त्याच्या बाजूला डाळीचे, मसाल्यांचे, मीठाचा, निरनिराळ्या आकाराचे डबे होते. एक एक डबा पुसून ओट्यावर ठेवत होते.  सहजंच डब्यांवर लिहीलेल्या नावावर लक्ष गेलं.  साखरेच्या डब्यावर सासुबाईंचं नाव लिहिले होते.  मग गंमत म्हणून इतर डब्यांवरची नाव वाचायला सुरुवात केली.  काही भांड्यांवर सासुबाईंचे, आज्जे सासुचे नाव होते.  कोणाच्या बारशाचे, मुंजीनिमीत्त, लग्नानिमीत्त बरीचशी भांडी, डबे मिळाले होते. 

उत्सुकता वाढल्याने मी वापरात नसलेली भांडी, स्टोव्ह, खलबत्ता वगैरे काढून त्यावरची नावं वाचली. बापरे! कित्ती जूनी भांडी होती.  प्रत्येकावर नाव, तारीख ई. माहिती कोरली होती. कित्येक पितळी डबे, वाट्या नावानिशी होत्या.  बरं, प्रत्येक डबा, भांडं विशीष्ट वस्तू ठेवण्यासाठीच वापरलं जायचं, हे त्याच्या घाटावरून, डिझाइनवरून लक्षात येत होतं.  

पितळी चकलीचा साचा, पूरण यंत्र,  दूधाची किटली, तेलाचं ओगराळं, तुपाची तामली, काशाची वाटी शांतपणे पहुडली होती. एकेकाळी रोजच्या वापरात ह्या वस्तू असतील.  ह्यातील प्रत्येक भांड्यावरून, डब्यावरून सासू, आज्जेसासू, नणंदा सगळयांचा हात फिरला असेल. माझे सासरेही छान स्वयंपाक करायचे, त्यांनीही ह्या वस्तू वापरल्या होत्या.  अचानक त्या सर्व भांड्यामधून मला ह्या वडिलधा-यांचं अस्तित्व जाणवायला लागलं.  असं वाटायला लागलं, ह्या सर्व गोष्टी आपण रोज वापरताना ह्या सर्व मोठ्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळत आहेत.

     परत एकदा माझ्या किचनमधे असलेल्या प्लास्टिकच्या डब्यांवर , स्वयंपाकाच्या उपकरणांवर माझं लक्ष गेलं.  मोठ्या हौसेने मी या वस्तू घेतल्या होत्या, पण कशावरही माझं किंवा माझ्या नव-याचं नाव, वस्तू  घेतल्याची तारीख काही नव्हतं.

मग मनात विचार आला, की या वस्तूंच्या रुपात आमच्या आधीच्या पिढ्यांनी आमच्याकडे परंपरा, संस्कार, आशिर्वाद सुपूर्द केले आहेत.  आम्ही मात्र आमच्या पुढच्या पिढ्यांना हे देउ शकत नाही.  आज आमची वडीलधारी मंडळी प्रत्यक्षात आमच्याबरोबर नसली, तरी ह्या सर्व गोष्टींच्या रुपाने आमच्या बरोबर आहेत. पण उद्या आम्ही आमच्या मुलांबरोबर ह्या रुपात असणार नाही.

    त्या क्षणी  ठरवलं की ह्यातली जास्तीत जास्त भांडी परत वापरायला काढायची. आणि आधीच्या पिढ्यांचे आशिर्वाद माझ्या पुढच्या पिढ्यांना मिळावेत म्हणून सर्व वस्तू घासून पुसून चकचकीत करायला घेतल्या.

  • © वैखरीजोशी

Pin It on Pinterest

error: मित्र हे पेजच शेअर कर न ! कॉपी नको न करू !