पुस्तकाची पानं चाळता चाळता मनही चाळले.
खोलवर रुतलेल्या आठवणींकडे आपोआप वळले.
आत आत मनात एक कप्पा झाकलेला.
उघडू नये म्हणून घट्ट मिटून टाकलेला.
नाही नाही म्हणताना हळूच उघडले दार.
आठवणींच्या वारूवर मनही झाले स्वार.
धावू लागले वेडे मन, वा-याच्या वेगाने.
कळे ना कोणा शोधत होते इतक्या आवेगाने.
दमून गेले,थकले,शीणले, परी ना लागे ठाव.
स्वप्नातील त्या राजाचा कुठे दिसेना गाव.
हट्ट सोडूनी मागे फिरले, तरी अडखळले पाऊल.
धुंद वारा घेऊन आला कोणाची चाहूल.
धुक्यामधूनी अलगद येऊन कवेत घेई मला.
प्रीत बहरली हलकेच, जेव्हा तो मला भेटला.
— © वैखरी जोशी