ग्रामीण सामाजिक जाणिवांची सोशिक होरपळ : ‘भूडईतल्या वाफा’
आजच्या संगणकीय युगात सर्वच बाबतीत अद्यावत होत असतांना असे देखील काही भाग आहेत जिथे अजूनही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, शिक्षणासाठी धडपड सुरूच आहे. अशा दुर्गम खेडे विभागातील जीवंत चित्रण स्वतः शिक्षक असल्याने आलेल्या स्वानुभवातून तसेच सुयोग्य कल्पकतेच्या आधारे लेखक मा. विजय बिंदोड यांनी आपल्या ‘भूडईतल्या वाफा’ या वऱ्हाडी कथा संग्रहातून वस्तीतल्या अगदी रोजच्या पाहणीतल्या व्यक्तीरेखांच्या सहायाने ग्रामीण भाव-भावनांची, सामाजिक जाणिवांची जीवंत होरपळ मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
या कथा संग्रहात एकूण चौदा वऱ्हाडी कथांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध लेखक युवा कादंबरीकार मा.पुष्पराज गावंडे यांची प्रस्तावना आणि राजकुमार तिरपुडे यांचे कल्पक मुखपृष्ठ आणि मुक्ता प्रकाशन द्वारा केलेली सुयोग्य अक्षर जुळवणी,आकर्षक छपाई यामुळे कथासंग्रहास आणखी साज चढला आहे.
सुरुवातीलाच मनोगत व्यक्त करतांना स्वतःला ‘निंबाचे कडू झाड’ या शब्दात लेखक विजय बिंदोड व्यक्त होतात. तेव्हा त्यांच्या सडेतोड आणि आणि रोखठोक व्यक्तीमत्वाची ओळख वाचकाला होते.
पण हे निंबाचे झाड जरी कडू असले तरी तितकेच ते हळवे आणि भावनिक सुद्धा आहे याची प्रचिती प्रत्येक कथेतून मांडलेल्या मार्मिक प्रसंगातून
वाचकाला येते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या ‘भूडईतल्या वाफा’ मनाला चटका देऊन जातात.
या संग्रहातील पहिली कथा ‘पूर्नब्रम्ह’ येणुबुडीच्या कुटुंबाची व्यथा मांडणारी आहे. एकीकडे अन्नाची नासाडी करणारे तर दुसरीकडे हातावर पोट घेऊन जगणारे कुटुंब. त्या कुटुंबातील आई घरी चिल्यापिल्यांच्या काळजीपोटी भाकरी थापून शेतात जाते. दुपारी मुलं त्या भाकरी खाणार तोच कुत्रा त्या भाकरी पळवतो,मुलं भाकरीसाठी कुत्र्यामागे धावतात कशीबशी भाकरी मिळवतात. लाळ, रेती, धुरळा लागलेल्या भाकरी धुऊन आनंदात खाऊन संध्याकाळी घडलेली हकीकत आईला सांगतात. लेखक जेव्हा ही परिस्थिती पाहतात तेव्हा त्यांना प्रचंड आत्मक्लेश होतो. एकंदरीत एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून एक गहन विषय यातून लेखकांनी मांडला आहे.
दुसरी कथा ‘गिल्ली’ यातून ‘मध्या’ नावाच्या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून भोंदूबाबांच्या सांगण्यावरून लोक कसे फसतात याचे मिश्किल चित्रण लेखकांनी केले आहे. खरंतर माणूस म्हणजे नेमके काय? याचे समर्पक उत्तर कथेचा शेवट करतांना एक बौध्दिक खाद देणारा प्रश्न विचारून लेखक करतात.
तिसरी कथा ‘यक शब्द’ च्या माध्यमातून स्वतःच्या बालपणातील एका प्रसंगाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी शब्द जीवनात किती महत्वाचे असतात हे पटवून देतात.
चौथी ‘वस्तरा’ काल्पनिक कथा आहे. यामध्ये लेखकाला स्वप्नात तथागत गौतम बुद्धांच्या दरबारात एक वस्तरा दिल्या जातो आणि बुद्धी कौशल्याच्या आधारावर त्याचा कसा वापर करावा हे त्यांनीच ठरवावे अशी स्पष्ट सूचना देखील मिळते.
पाचवी कथा ‘पुस्तक’, सहावी ‘दारू’ छान रेखाटलेल्या आहेत. सातवी कथा ‘इदूऱ्याची कटींग’ या कथेच्या गावातील उडानटप्पु परभ्या म्हणजेच इदूऱ्या आणि लेखकाचे आवडते पात्र ‘कचरू बुढा’ यांच्या मिश्किलपणाच्या गमतीजमती आहेत. आठवी कथा ‘चिंगी’ अचानक समाजमाध्यमावर भेटलेल्या माजी विद्यार्थिनीची कथा आहे.
नववी कथा ‘पोटाचा धर्म’ च्या माध्यमातून लेखक मानवतेच्या दृष्टीकोनातून वाचकाचे हृदय जिंकण्यात यशस्वी होतात. अल्पवयात एका बांधकाम व्यवसायिकाच्या प्रेमात पडणाऱ्या आईच्या पोटी जन्म घेऊन मूळ हिंदू असलेल्या विश्या धर्मांतर करून मौलाना रह्यमान बनून लेखकांपुढे येतो जीवन जगण्याचे तत्वज्ञान सांगायला लागतो, लेखक त्याला धर्मांतराच्या बाबतीत विचारतात तेव्हा त्याने दिलेले उत्तर काहीसे असे असते,
“सर गरिबाले जगासाठी रोटी पाह्यजे सर.. धर्म कोणताह्य असला तरी काय फरक पडते “
हेच उत्तर लेखकाच्या प्रगल्भ वैचारिक पातळीचे दर्शन घडविते.
दहावी कथा ‘खुटी’ यामध्ये ‘कचरू बुढा’ या पात्राच्या माध्यमातून लोकांना बढाया मारून मूर्खपणा करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीचे अनुभव वाचावयास मिळतात.
शेवटी कमाई,कन्ह्या, माय या कथा वाचकाला भावुक करणाऱ्या नि रंजक कथा अत्यंत खुबीने लेखकांनी साकारल्या आहेत. एकंदरीत लेखक मा. विजय बिंदोड यांनी स्वानुभव आणि सुयोग्य कल्पकतेची पद्धतशीर मांडणी करून वऱ्हाडी भाषेतील तसेच वऱ्हाडी शिकू इच्छिणाऱ्या सर्वच रसिकांसाठी एकमेवाद्वितीय पर्वणी या कथासंग्रहाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. सर्व रसिकांनी हा वाचनीय कथा संग्रह अवश्य वाचावा असे मी नम्र आवाहन करतो.
असेच सकस व दर्जेदार साहित्य प्रसवत लेखक मा. विजय बिंदोड सरांची लेखणी बहरत राहो या अपेक्षेसह भावी साहित्यिक वाटचालीकरिता सरांना शुभेच्छा देतो.
प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला
कथासंग्रह : भुडईतल्या वाफा
मुक्ता प्रकाशन, अकोला
स्वगत मूल्य: २००