भाषिक वैविध्य बघायचं असेल तर मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करत असू, तर वसईला अशी भाषा कानावर पडतो. आपण जर विरार स्लो ट्रेनने प्रवास करत असू. तर वसईला अशी भाषा कानावर पडतो. ती म्हणजे सामवेदी भाषा. ‘कड गेलंत’? अड? तड? कोहा हा?’ म्हणजे कुठे गेला होतास? जकले कोहा हा? म्हणजे कसा आहेस? जकले म्हणजे सगळे— अड म्हणजे इथे, तड म्हणजे तिथे, कादो म्हणजे कशाला? ही ‘कादोडी’ बोली. पुढे मीरा रोडला आपल्या कानांवर शब्द पडतात ” काल गाडीत
उस्मान मिलो व्हतो. गावातली जमीन इक्कूची हाय बोल्लो, चिपलूनला जायचा रस्ता बेस हा का खराब? एसटीची टिकीट हानला पन माका एसटी लागता” हे आपले कोकणी मुस्लिम बांधव बोरिवलीत तर हमखास ‘ आवजो, बैंसी जावं चा कलकलाट सुरु होतो. गोरेगाव जोगेश्वरीपर्यंत हमखास एखाद तोंडाला तोंड लागलेलं असत. एक ” तुम सिदा खडा रह ना, मेरे काख मी किदर घुसता है? दुसरा ” अबी और किदर घुसू?” पीछे से ढकल रहा है देक ना, मेरे को थोडी हौस है तेरे घाम का बास लेने की? एक ” इदर बॉम्बे मे रहना हैं, तो अपना बरतन ( वर्तन) बराबर रखो” दुसरा ” भ भा भो तू कोण सांगनार रे माला? आमची मुंबै हाय, आम्ही आमचं बरतन घासू नायतर खरकटं ठेवू” एक ” तू पण मराठी हायस का आदी नाय बोलायचा मग भाई? चल सोड” दोन मराठी ‘फुटायच्या’ आधी युती करून विरले पारलेला उतरतात.
कुणाला जर आपली मराठी बी घडवून घ्यायची ‘ आशेल’ तर न्यूज चाणेल वरची राजकीय चर्चा ऐकावी. एखादा प्रवक्ता शिरा ताणून बोलत असतो ” पश्चिम महाराष्ट्राने निश्चितपने सिंदुर्ग रत्नाग्री म्राटवाड्यावर वर अन्याय केलाय द्या ठिकानी हे मी विदर्भसाहित पष्ट करू इचितो ह्या ठिकानी —” मी एकदा एक चर्चा बघत बसलो होतो, तर एक णेता पाच मिनिटात एकशे पाच वेळा ‘ द्या ठिकानी’ बोलला होता. आणि त्याला टफ देण्यासाठी दुसऱ्या पार्टीचा पर वकता एकशे आठ वेळा ‘ त्या ठिकानी’ बोलला होता. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेतच.
टपोरी भाषेची नशा काही औरच असतें ना भाई, बोले तो. टपोरी हा शब्द बहुतेक ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्यांवरून आला असावा. किंवा पान टपरीवर उभे राहून वासूगिरी करणाऱ्या छपरी पोरांवरून आता छपरी पण तसाच एक शब्द. आता ह्या छपरी पोरांची बोली पण टिपिकल असते. पक्या, ” भाई, चल वंटास हो हितना, पतली गली से निकल चल, नायतर टवका देन” पक्या” ” तू मला ढोस देतो? चार हाफ हायत आपल्या नावावर” म्हणजे चार हाफ मर्डर केल्या आहेत मी. ” तू फक्त मला टच कर रे नाय तुझी मोटली केली ना, तर अमुक गल्लीचा नाव नाय सांगनार” मोटली करणे म्हणजे मारून नेऊन टाकणे. आता पक्याने एवढा’ आवाज दिल्यावर सुन्या त्याचे ‘कानचेक’ करतो. म्हणजे कानाखाली मारतो आणि मग नावावर दोन हाफ असलेला पक्क्या भाई तिथून कल्टी मारतो. पण जाता जातासुन्याला धमकी देऊन जातो, ” तुझी तर आता मी आ –तू हितच थांब– मी आलोच” असं म्हणून पोरं आणायला गेलेला पक्या भाई काही परत येत नाही. सुन्या भाई पण एखाद्या बार मदी जाऊन फूल टू अठावीस होतो आणि तिथे ” बगतो काय रे? म्ह्णून कुणाला तरी नसून सुजवून घेऊन घरी जातो.
एकदा माझ्या ओळखीचं एक कुटुंब ‘फ्लीम’ शूटिंग बघायला आलं होत. सीनच लायटिंग सुरु होत. काही वेळाने बघतो तर ते कुटुंब गायब. नंतर कळलं त्याच पलायन रहस्य. ते म्हणाले की ” किती घाण घाण शिव्या देतात हो तुमच्या सेटवर माणसं. एक तर आमच्या बेबीची मुंडी काट म्हणाला. एचीमायला उचल म्हणाला” अरे देवा! त्यांना मग मी समजावलं की “अहो बेबी आणि एच एम आय नावाचे लाईट्सचे प्रकार आहेत. ते ऍडजस्ट करत होते ते”
एकदा आम्ही तिघे नट मित्र एका ‘आनंदस्थळी’ मन मोकळी करत’ बसलो’ होतो. aamcha एक मित्र आधीच उद्विग्न होता. त्यात तिथला वेटर आगाऊ होता वेटर म्हणजे वाट बघायला लावणारा. त्याची आणि त्या उद्विग्न मित्राची थोडी ‘मचमच’ झाली. थोड्या वेळाने तो वेटर पुन्हा आला. ” और क्या चाय्ये? म्हणूंन विचारू लागला. मित्रांन त्याच्याकडे रागाने बघितलं आणि म्हणाला “तू इधरसे जा, हम हाक मरेंगे तब आने का” त्या तंग वातावरणात पण मला सोड्याच्या बाटलीसारखं हसू फुटलं. तर अश्या ह्या भाषेच्या गमती. हाक मारण्यावरून सांगतो, की माणूस ‘गेल्या’ नंतर नातेवाईकांना ‘हाक’ मारायला जाण्यापेक्षा तो जिवंत असतानाच त्याच्या हाकेला ओ देणं जास्त योग्य नाही का?
राजेश देशपांडे rjsh.deshpande@gmail.com