!! ” सफर सिनेमांची “….!
१९७४ साली पहिल्यांदा हिंदी सिनेमाला एक मोठे समांतर आव्हान उभे राहिले. एक मोठे वादळ अक्षरशः तडाखे देत हिंदी सिनेमाचा तोपर्यतचा सुरू असणारा प्लॉट आतबाहेर हलवत होते. सिनेमा कशासाठी ? हा प्रश्न नव्यानं उभा करत होते.सिनेमाचे मनोरंजन मुल्य बाजूला ठेवून त्याला चिंतनपर वास्तवाचा आरसा दाखवण्याची वेळ आलेली होती. हा आरसा काही साधासुधा नव्हता . इथे समाजात घडणाऱ्या रोजच्या कहाणीवर सिनेमा वास्तवात रेखाटला जाणार होता. व्यावसायिक बाजू दूर ठेवून सिनेमाला एका नव्या पण आवश्यक साच्यात बांधण्याचा तो एक समांतर प्रयोग होता. विशेष म्हणजे हे आव्हान आणि हे वादळ हिंदी सिनेमात जे दोघे पहिल्यांदा घेऊन आले ते दोघेही नवशिके होते.आपला पहिलाच घेऊन त्या दोघांनी वादळाची जबरदस्त सुरूवात केली. यानंतर या वादळाने सिनेरसिकांच्या एका पिढीलाच आपलेसे केले. आजही सर्वोत्तम भारतीय सिनेमा सांगायचा असेल तर बहुतांशी सिनेमे याच वादळाच्या भागातील सांगावे लागतात. हिंदी सिनेमाच्या परंपरागत रचनेला अत्यंत वास्तववादी पातळीवर आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे पहिले दोन कलावंत याच सिनेमा मधून पुढे आले आणि नंतर त्यांनी अक्षरशः राज्य केले. मी गोष्ट सांगतोय ते महान दिग्दर्शक शाम बेनेगल आणि अत्यंत प्रतिभावंत अभिनेत्री शबाना आझमी यांची. १९७४ साली पडद्यावर आलेल्या ” अंकूर ” या सिनेमा मधून बेनेगल यांनी दिग्दर्शक म्हणून तर शबाना अभिनेत्री म्हणून पुढे आली.
अंकूर…हा सर्वार्थाने पहिला समांतर सिनेमा आहे.सिनेमाच्या नावाप्रमाणेच हा अंकूर हिंदी सिनेमाच्या कातळावर अक्षरशः पसरला आणि सिनेरसिकांना अनोख्या जगाची आणि कठोर सामाजिक वास्तवांची उतरंड दाखवत समांतर सिनेमा चालू लागला.आपल्या अवतीभवती घडणाऱ्या क्रांतिकारी विषयांना स्पर्श करत आणि त्यावर वास्तववादी भाष्य करत समांतर सिनेमाचे युग सुरू झाले ते अंकूर पासून .लक्ष्मी आणि किश्त्या या दलित जोडप्याला मुलबाळं नाही .लक्ष्मी याकरिता आसूसलेली आहे. किश्त्या हा मुकबधीर आहे आणि दारुच्या व्यसनात बुडालेला आहे. पण तो मनाने अत्यंत चांगला आहे. इकडं शहरात जमीनदाराचा मुलगा सूर्या शिक्षणात फारशी प्रगती करत नाही .जमीनदार आपल्या गावाकडील मालमत्ता जपण्यासाठी त्याला गावी पाठवतो. जमीनदारापासून तिथल्या एका स्त्रीला प्रताप नावाचा मुलगा आहे. आणि सूर्याचे देखील लग्न जमवले गेलय.सूर्या गावाकडे येतो आणि तिथे घरकाम करणारी लक्ष्मी व किश्त्या यांची गाठ पडते. दलित असूनही लक्ष्मीच्या हातचे जेवण जेवाण्यास सूर्याची हरकत नाही . तो जातपात मानत नाही .मालमत्ता जपता जपता सूर्या आपल्यामधील सरंजामशाहीचे अवशेष दाखवायला सुरूवात करतो.नारळाच्या झाडावरील ताडी चोरुन प्याला म्हणून सूर्या किश्त्याचे मुंडण करवतो आणि गाढवावरुन मिरवणूक काढतो.हा अपमान किश्त्या सहन करु शकत नाही . तो गाव सोडून रात्रीच परागंदा होतो. इकडं सूर्याची नजर लक्ष्मीवर येते . पण ती दाद देत नाही . तिच्या भविष्याच्या सुरक्षिततेच्या हमीवर सूर्या लक्ष्मीला आपलं बनवतो. थोड्याच दिवसात लक्ष्मी सूर्याच्या घरातच रहायला येते. इकडं ही गोष्ट सर्वत्र पसरते आणि खुद्द जमीनदार गावी येऊन सूर्याची कानउघाडणी करतो. त्याची बायको सरोज हिला गावी पाठवतो. सरोजला घरातील लक्ष्मीचा वावर खटकतो. लक्ष्मी पहिल्यांदा जेवण बनवण्यापासून वंचित केली जाते आणि नंतर इतर कामापासूनही. अशातच लक्ष्मीला दिवस जातात . सूर्या घाबरतो. तो वारंवार विनवणी करतो पण लक्ष्मी मुल पाडायला तयार नाही . भित्रेपणाने सूर्या तिच्या पासून आपले संबंध वेगळे करतो आणि तिच्याशी वर्तन बदलतो. इकडं रात्री अचानक परागंदा झालेला किश्त्या झोपडीत परततो आणि त्याला पाहून लक्ष्मीला रडू कोसळते. किश्त्या तिला समजवून घेतो. आपल्या बाळाकरता पुन्हा एकदा सूर्याकडे तो काम मागायला चालू लागतो. पण भित्रा सूर्या अशी समजूत करून घेतो की , किश्त्या त्याचा जीव घ्यायला येत आहे. माणसांकरवी किश्त्याला पकडतो आणि जबरदस्त मारहाण करतो. ते पाहून लक्ष्मी रागाने लालबुंद होते आणि सूर्याला आव्हान देते. जखमी अवस्थेत किश्त्या व लक्ष्मी आपल्या झोपडीकडे चालत जात असतानाच…एक लहानसा मुलगा सूर्याच्या खिडकीवर दगड भिरकावतो. ही आहे अंकूरची कथा.कथेत नाविन्य वाटत नसले तरी सिनेमात केलेले भाष्य खूपच भेदक आहे .गावाकडील चालीरीती आणि पध्दती , जमीनदारीचे उरलेले अर्धमुधे अवशेष ,वासनेचे विविधांगी रुप हे अगदी योग्य रितीने सिनेमा व्यक्त करतो.सिनेमात कसलेही गीत नाही . पण ही कसर पूर्णपणे कॕमेरा भरून काढतो. अस्सल ग्रामीण बाजं दाखवण्यात सिनेमा अव्वल ठरलाय.अंकूर एक हेलावणारा अनुभव देतो.
अंकूर..हा हिंदी सिनेमाला नव्या वळणावर घेऊन जाणारा सिनेमा आहे.तत्पूर्वी हा प्रयत्न झाला खरा , परंतु इतक्या खोलवर नाही .शाम बेनेगल यांनी ते धाडस केले आणि शबानाने आपल्या पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांना आणि बरोबरीच्या कलावंताना देखील अक्षरशः अभिनयाचे पाठ पढवले. लक्ष्मी तंतोतंत उभी केली ती नजरेतून , भाषेतून आणि अगदी सहज वर्तनातून. याबद्दल तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शबानाने नंतर मागे वळून पाहिलेच नाही . अंकूरमधील दोन दृश्य महत्त्वाची आहेत .एकामध्ये दिवाळी सणादिवशी जुगार खेळताना सर्व काही गमवलेला स्वामी आपल्या पत्नीला पणाला लावतो तो प्रसंग आणि जेव्हा भर जातपंचायतीमध्ये ” केवळ पोटाची भूकच महत्त्वाची नाही ” असे ठामपणे कठोर सत्य मांडणारी स्त्री . अंकूर तुम्हाला आत बाहेरून पोखरून काढतो . गरीबी व जात यांच्या दैनंदिन व्यवहारावर बोट ठेवतो. लैंगिकता आणि जोडीला भित्रेपणा यांच्या सांगडीमधून समोर येणाऱ्या कौर्याला आरसा दाखवतो. महत्त्वाचे म्हणजे गरीबीमधून जीवनात आलेली हतबलता घालवण्यासाठी व्यवस्थेवर कठोर प्रहार करण्यासाठी उभा करतै. अंकूर ..याचकरता पहावा लागेल.
उमेश सूर्यवंशी umeshsuryavanshi111@gmail.com