शांत चेहरा बघून घे तू निघण्याआधी
एकदाच गे हसून घे तू रडण्याआधी
रुसवे फुगवे संशय सारे जुने खुलासे
टाकून दे तू चितेत माझ्या विझण्या आधी
येतील छळण्या आठवणी त्या चालून तुजवर
विखरून दे त्या पुन्हा नव्याने रुजण्याआधी
आधीही होतो चालत अताही चालत आहे
आताच वळ तू गाठ पुन्हा ती पडण्याआधी
तसाच राहिन ढग होऊन मी दंव भरलेला
गाठ सुरक्षित छप्पर मी कोसळण्या आधी
प्रविण ज. बोपुलकर
खेट्री, जि. अकोला