प्रिय निरांजनी,
खूप काळानंतर असं शांतपणे भेटतोय आपण, नाही ? खूप काळानंतर बोलतोय तुझ्याशी. शांsssत आहे सगळं. सगळं शांत आहे एकदम… सामसूम… कुठलीही हालचाल नाही, कुठलेही आवाज नाहीत. कुठलीही गडबड नहीत, कुठलेही गोंधळ नाहीत. सगळं शांत आहे… वाटतं कधीतरी, अशाच नीरव शांततेत संपून जावं असंच… अगदी शांतपणे… कोणालाही न सांगता… कोणाचाही कुठलाही निरोप न घेता… असंच… अचानक… आणि आपण निरोप घेतो म्हणजे तरी काय करतो, निरांजनी! तर सगळ्यांना ढोल बडवून आपणच आपल्या जाण्याची वर्दी देत राहतो. झूठ आहे सगळं.. मिथ्या म्हणतात ना या झूठला तुझ्या भाषेत… तर ते मिथ्या आहे सगळं… सगळं खरंच मिथ्या आहे… हे जग, हे जगणं, ही तू, हा मी, हे सगळे…. सगळं सगळं मिथ्या आहे…. आये भी अकेला, जाये भी अकेला… दो दिन की जिंदगी है, दो दिन का मेला.. सगळं मिथ्या आहे, निरांजनी… अंssss ??? नाही, म्हणजे मला तुला हे नव्हतं काही सांगायचं. हे असं होतं बघ कधीकधी… सांगायचं असतं काही वेगळंच आणि मग अचानक असं हरवून जाणं….. नाही, नाही, नाही, नाही, मला तुला काही वेगळंच सांगायचं खरं. चांगलं… चांगलं… चांगलं सांगायचं काहीतरी… काय बरं ते ?? हां, शांतता… तर ना, या शांततेतच आत्ताच अचानक काही क्षणांपूर्वी कुठूनतरी ‘सहेला’ ऐकू आलं आणि…. एक तार तटकन तुटली. तुटतानाही ती त्या शांततेत झणझणत गेल्यासारखी वाटली खरी, पण लगेच लक्षात आलं, तार तुटलीय… कधीचीच… आत्ता ऐकू आलासारखा वाटलं तो फक्त कदाचित विरलेला प्रतिध्वनी…
तार तुटली म्हणजे मग सूरही तुटला… म्हणजे संपलं ना सगळंच… अं ?? हो, ती शांतता… अं ?? अरे हो, त्या सहेलाबद्दल सांगत होतो ना का तुला ? तर कुठे होतो आपण ? हां, म्हणजे ते आत्ताचं सहेला ऐकू आलं आणि अख्खा माहौलच बदलून गेला , निरांजनी… माझ्यापुरता तरी… आपली अगदी पहिली भेट आठवली, निरांजनी ? अं ??? हो, म्हणजे… आता आठवली, काय करणार? सहेला म्हटल्यावर मला तेवढंच आठवतं, निरांजनी… तुला नाही आठवत आपली ती समुद्रावरची पहिली भेट, निरांजनी? त्या खळाळणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांसमोर बसलो होतो आपण. एकमेकांचे हात हातात घेऊन… एकमेकांची बोटं एकमेकांच्या हातात घट्ट रुतवून… तुझी मान माझ्या खांद्यावर… माझं डोकं तुझ्या डोक्याच्या आधारानं… नक्की कोण कुणाला आधार देतंय काहीच कळत नव्हतं खरंतर… हात घट्ट होते फक्त एकमेकांत मिसळलेले… त्या किनाऱ्यावर एवढी गर्दी होती आजूबाजूला, पण आपल्यासाठी मात्र सगळं शांत होतं. कुणीच काही विचारायला येत नव्हतं आपल्याला… कुणीही पोरं बागडत नव्हती आपल्या अवतीभवती… आपण जणू त्यांच्यात नव्हतोच…. की ते कुणीच नव्हते आपल्यात ?
शांssत होतं सगळं.. अगदी शांत… कितीतरी वेळ असेच बसलो होतो आपण… शांत… एकमेकांजवळ… एकमेकांसाठी…
आणि अचानक माझे कान टवकारले.. मला कुठूनतरी सहेला ऐकू येत होतं…
मी तुला विचारलंसुद्धा, ऐकलंस ?
‘काय ?’
‘सहेला’ ऐकू येतंय…’
‘तू खळखळून हसली होतीस… म्हणालीस, ‘अरे वेड्या, समुद्रावर एवढ्या गजबजाटात कोण कशाला सहेला लावेल ?’
गजबजाट…. मला तो गजबजाट कदाचित ऐकूच येत न्हवता म्हणून सहेला ऐकू आलं असेल.
मी शांsssत… त्या शांततेत तूही शांत… खरं तर तू त्या गजबजाटात…. शांतता माझ्यासाठी होती केवळ…
आत्ताच अचानक शांततेत कुठूनतरी पुन्हा हे सहेला ऐकू आलं आणि ती सगळी आठवण अगदी काल घडल्यासारखी डोळ्यांसमोर उभी राहिली…..
काही क्षण शांत असेच…. मनांची जुळवाजुळव करत असल्यासारखे…
‘निघू या ?’
तू असंच काहीतरी विचारलंस बहुतेक. मी भानावर होतो की ठाऊक नाही, पण तू बहुतेक पुन्हा विचारलंस, ‘निघू या ?’
मी काही न बोलता उठलो. तसेच हातात हात धरुन पुन्हा परतीच्या वाटेवर चालू लागलो… परतीच्या वाटेवर…
आणि अचानक एका क्षणी तू थबकलीस. माझा हात तुझ्या हातात अधिकच घट्ट पकडलास आणि म्हणालीस, ‘आलंss… मला ऐकू आलं… सहेला…’
क्षणभर तशीच कडेकोट शांतता… sssssssss
जे आपल्याला ऐकू येतं ते तशाच शांततेत दुसऱ्यालही ऐकू येणं हा केवढा विलक्षण योग असावा?
‘निरांजनीss’
‘अंss?’
‘कधी कधी वाटतं, हे क्षण असेच राहावेत एकमेकांचं एकमेकांना ऐकू येण्यासाठी… केवळ एकमेकांसाठी… तसं घडेल की नाही नाही, तसं होईल की काही माहिती नाही, पण आशा बाळगायला काय हरकत आहे.. नाहीतरी आशा वेडीच असते, म्हणतात ना ?’
ती हसली.
विखुरलेल्या चांदण्यासारखं हसली…
मी तर माझ्या बाबांच्या त्या गोष्टीतल्या त्या जमिनीखालून जाणाऱ्या इंद्राच्या ऐरावताची अजूनही वाट बघतोचं आहे. न जाणो, कधीतरी एखाद्या बेसावध क्षणी येऊन निघूनही जाईल… पण अशाच एखाद्या सावध क्षणी गाठण्याची आशाही आहेच ना ?
“प्रिय निरांजनी”
- श्रीनिवास नार्वेकर©