‘प्रिय निरांजनी….
साऊचा मोर आणि सोनचाफा =====================
प्रिय निरांजनी, महिनो न् महिने एखादा चातक पावसाच्या बहराची वाट पाहात राहावा आणि पहिल्या पावसाचा पहिला थेंब झेलताच सर्वार्थाने तृप्त होऊन जावा, असं वाटतंय आज… ही आणि अगदी अश्शीच तृप्तता लाभली तुझ्या भेटीनं… पावसाचा बहर येतो आणि जातोही.. पण तृप्तता मात्र कायम राहते त्याची.. ही तृप्तता यापुढे मला जपता यायला हवी आयुष्यभर… निरांजनी… आपल्यातल्या शांततेचा शोध घेत राहणारी तू… आपली भेट झाली आणि त्या शांततेपलीकडे काही आहे, हे विसरुनच गेलो काही काळ.. खरं तर शांतता बोलू लागली की बर्याच वेळा अस्वस्थ व्हायला होतं, मन सैरभैर होतं, कितीतरी नेणीवा फेर धरुन नाचू लागतात सभोवती… बोलणार्या शांततेची फार धास्ती वाटते मला… अंधार परवडला, पण चांदणं नको, अशी अवस्था होऊन जाते काहीशी… अंधारातल्या गडदपणापेक्षाही चांदण्याची धूसरताच अधिक अंगावर येते माझ्या.. चांदणं अंगावर सोसता यायला हवं. ते अंगावर घेऊन सोसणं आणि त्याला तसंच वागवत राहणं, ही बाब सोपी नाही. हा धीरोदात्तपणा उगाचच कोणाच्या ठायी असत नाही. माझ्या ठायी आहे वा नाही, मला कल्पना नाही. जाणून घेण्याचा प्रयत्नही नाही करणार मी.. निरांजनी, मला आजही आठवतोय तो समुद्र… फेसाळणार्या मनाला अलगद किनार्यापाशी आणून सोडणारा… (मनाला… की.. मनांना ??) तुझं ठाऊक नाही, पण मी मात्र अलगद झुलत, लहरत होतो त्या मनफेसाळ लाटांवर… पुशिंच्या साऊचा मोर जणू माझ्याच मनात बागडत होता. हा मोर खरं तर कर्णाच्या कवचकुंडलांप्रमाणे आयुष्याचं अविभाज्य अंग आहे माझ्या… पण मध्येच केव्हातरी तो कसा आणि कुठे गायब झाला, कुणास ठाऊक ? पण तुझ्या मोकळेपणाने लहरणार्या केसांची शपथ घेऊन सांगतो, निरांजनी, हा मोर जणू मला पुन्हा सापडला. तुझ्या रुपानं… आता तो हाती धरुन ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फार मोठी जबाबदारी आहे ती.. पेलवणं अशक्य नाही, पण कठीण मात्र नक्की आहे.
लहानपणी हवेत उडणारी कापसाची म्हातारी खेळताना खूप मजा यायची. खूप गंमतही वाटायची. आज एवढ्या वर्षांनंतरही खेळ तसाच.. हवेत उडणार्या कापसाच्या म्हातारीला पकडण्याचा.. पण त्यातली गंमत ? ती कुठेय ? म्हातारी पकडण्यातली लहानपणची गंमत कुठे शोधायची ? ही मजा, ही गंमत कैक वर्षांनी गवसली मला.. तुझं मनमोकळं हंसू त्या कापसाच्या म्हातारीसारखं पकडण्याचा प्रयत्न करु लागलो मी.. मनातल्या मनात…! तुझं लाघव रातराणीच्या सुगंधासारखं तना-मनात पसरलं आणि मग माझं अख्खं शरीरच रातराणी बनून गेलं. निरांजनी, मला आवडेल असं रातराणी बनून जगायला.. तुझा सुगंध घेऊन.. रातराणीला परका सुगंध घेऊन जगायला लागावं, हे रातराणीचं दुर्भाग्य…? की त्या सुगंधाचं परजीवीत्व…? खरं तर हे असं काही नाही… नसतंही… आणि नसावंच… पण इथं काय ? सुगंध परजीवी असावा ? की… रातराणी…? अंधाराची पुटं अंगावर चढू लागली की दोघांनाही परजीवीत्वाचं भान नसावं ? हे भान जाणीवेचं…. की…. नेणीवेचं…? सगळा कोलाहल दाटून आलाय मनात… जाणीव-नेणीवदेखील परजीवीत्वाची पुटं घेऊन आपल्या अंगावर चढतायत की काय, असं वाटण्याजोगी वेळ येऊ घातलीय आणि त्याचवेळी ही पुटं दूर करणारा, मनाचं आभाळ उजळवून टाकणारा रवीकर हा गोजीरवाणा माझ्या मनाला आपल्या पसामध्ये बध्द करु पाहतोय. हे सत्त्य… वास्तव… मृगजळ… की…?? पण निरांजनी, आवडेल मला हे बध्द होणं… शांततेचे सूर ऐकता-ऐकता बेभान होऊन अलगदपणानं बध्द होणं खरंच आवडेल मला, निरांजनी… खूप दिलंस… न मागता दिलंस… अगदी भरभरुन… पण ही नेणीव तर नव्हे..? पानगळ सुरु झालीय.. आता नवी पालवी.. नवे अंकुर.. नवा बहर.. नवे आकार.. नवे श्वास.. निरांजनी, ऐकू येऊ लागलाय मला हा श्वास… हा श्वास.. तुझा…. की… माझा…? किंबहुना त्या श्वासांची थरथर मनाच्या अवघ्या आसमंताला थरारुन टाकतेय. हा श्वास पिऊन घ्यायचाय मला.. श्वासाचा प्याला काठोकाठ भरुन वाहू लागलाय, निरांजनी.. या फेसाळणार्या प्याल्यावर आवेगाची, उत्फुल्लतेची नजर जाण्यापूर्वीच मला हा प्याला रिता करुन टाकायचाय… आवेग क्षणिक.. उत्फुल्लताही क्षणिक… निर्गुण निराकार भावनेनं हा प्याला रिता करायचाय, निरांजनी… गात्र गात्र माखून टाकणार्या आपल्या रात्री, आठवतात तुला, निरांजनी ? पापण्यांच्या कडांवरुन चंद्रचांदणं ओघळताना ‘तू किती सुंदर दिसतेस गं’ असं म्हणताच सोनचाफ्यासारखं हसली होतीस आणि तो सोनचाफा त्या क्षणी माझ्या अंगांगावर दरवळला होता. अजूनही दरवळतोय.. तू श्वास घे, निरांजनी… माझ्या गात्रां-गात्रांत भिनलेला हा सोनचाफा कदाचित तुझ्याही रंध्रारंध्रात भिनून जाईल. हा सोनचाफा जपून ठेव, निरांजनी… बर्याच दिवसांनी गवसलाय हा सोनचाफा मला… आणि तुलाही…! हा सोनचाफासुध्दा साऊचा मोर बनून तुझ्या तना-मनात बागडताना बघायचाच मला… निरांजनी, हा मोर बराच काळ जपला मी… पण… एका अनाहूत क्षणी… तो कधी, कुठे उडून गेला, काही कळलंच नाही. शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही. अनाहताचा नाद केवळ येत राहीला. मोर नाही तो नाहीच. पण आज… त्या मोराची जागा आता सोनचाफ्याने घेतलीय. खरं तर हा साऊचा मोर हवाच आपल्या मनात.. अगदी प्रत्त्येकाच्याच मनात हवा… बागडण्यासाठी… आनंदण्यासाठी… भरभरुन फुलण्यासाठी… तुझ्या सहवासानं माझ्या मनात मोर नाही, पण हा सोनचाफा मात्र दरवळला. हा दरवळ आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करायला हवा मला… करेन मी… नक्की करेन… एक अभ्र उल्का कोसळली होती कधी काळी माझ्या आभाळातून… एका क्षणात रितं झालं माझं आभाळ…
‘रंग उमलता सहवासाचे, चंद्राला ती विसरुन गेली, चांदणझोके सदा घेऊनी, चंद्रचांदणी निघून गेली….’ हे रितं आभाळ आता पुन्हा भरुन आलंय… तुझ्या सोनचाफ्यानं… आसमंतात पसरु लागलाय हा दरवळ… तना-मनात, अणूं-रेणूंत भरुन, साठवून ठेवायचाय हा दरवळ मला… याच दरवळाचा पाठलाग करीत येईल (कदाचित) साऊचा मोर… माझ्या मनात बागडायला… दिसू लागलाय, निरांजनी… बहर दिसू लागलाय मला… नवी आशा.. नवी भाषा.. नवा अंकुर.. नवी दिशा.. हा बहर फुलायला हवा, निरांजनी… आणि तो तूच फुलवायला हवायस… तेवढ्यासाठी, त्या क्षणासाठी, त्या क्षणापर्यंत… थांबशील..? तू विचारशील (कदाचित), ‘किती स्वार्थी आहेस रे तू ? केवळ त्या क्षणापर्यंत थांबू मी ? पुढे काय ?’ निरांजनी, पुढे काय हे सांगण्यासाठी मी कशाला हवा ? हा बहर फुलल्यानंतर तू पुढे तरी कशी जाशील ? ये, निरांजनी… अभिसारीकेचा आवेग घेऊन ये… राधेचं एकजीवीत्व घेऊन ये… कुब्जेचं प्रेम घेऊन ये… मीरेची प्रीती घेऊन ये… बहर फुलायचा थांबलाय, निरांजनी… तुझ्यासाठी.. तुझ्या जाणीवेसाठी.. तुझ्या अस्तित्वासाठी.. तुझा दरवळ प्राशून घेण्यासाठी… …. आणि दूर कुठेतरी थांबलाय साऊचा मोर… प्रतिक्षेत… कुणीतरी साद घालेल आणि तिला प्रतिसाद देत त्या नादाचा माग काढत येण्यासाठी… पुन्हा.. तुझ्याचसाठी… येशील, निरांजनी…???
- श्रीनिवास नार्वेकर©