अनंत युगांचा प्रवास करून तिचे डोळे थकले,
पण मिटले नाहीत..
तिने पाहिलं,
अहील्येला शिळेतून मुक्त करणारा राम,
सीतेची अग्नीपरिक्षा घेताना,स्वतः शिळा झालेला..
साक्षात देवाचं हे रूप पाहून, तिचे डोळे घाबरले,
पण मिटले नाहीत..
तिने पाहिले,
राधेच्या डोळ्यातले अश्रू,
रुक्मिणीच्या मनातली सल,
आणि द्रौपदीचा फाटलेला पदर..
प्रेमाचं प्रतीक बनलेल्या वेणुचे सुर ही तिला वाटले भयावह तेव्हा..
तिचे डोळे घाबरले पुन्हा,
पण मिटले नाहीत..
ती तशीच चालत राहिली, युगानुयुगे,
पाहत राहिली,
जपलेले दुःख, लपलेले अश्रू, साठवलेला अपमान,
अनंत युगांचा प्रवास करून तिचे डोळे थकले,
पण मिटले नाहीत अजूनही,
कारण अजून त्या डोळ्यात आहे,
सीतेचे सत्य, राधेच प्रेम, द्रौपदीचा स्वाभिमान,
अजून तिच्या डोळ्यात फुलतात स्वप्न,
आणि तिच्या ओटीतली उद्याची लेकर,
पाहत राहतात उद्याचे सूर्योदय, त्याच डोळ्यांत,
म्हणूनच तिचे डोळे मिटत नाहीत कधीच…
– किर्ती हवालदार
kirti22hawaldar@gmail.com