गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन…. या निमित्ताने २००९ साली मी केलेल्या त्यांच्या दोन कवितांचा स्वैर अनुवाद…. Stray Birds आणि My Song…
‘भटके पक्षी’ (Stray Birds)
मूळ कविता – रविन्द्रनाथ टागोर ; स्वैर रुपांतर – श्रीनिवास नार्वेकर
वैशाखीच्या उन्हात न्हाऊन येती गात हे भटके पक्षी
विसावता क्षणी खिडकीवरल्या झरोख्यातून उडून जाती
पानगळीच्या येत नशिबी पीतपर्ण ते अवघे भारुन
थकूनि पडते, पडूनि थकते, नि:शब्दांचे भरुन अंगण……….
© श्रीनिवास नार्वेकर (१७.०३.०९ मध्यरात्री २.२६ वा.)
‘माझे गाणे’ (My Song)
मूळ कविता – रविन्द्रनाथ टागोर ; स्वैर रुपांतर – श्रीनिवास नार्वेक
अलवार सूरांची छेडीत नक्षी लहरत येई माझे गाणे
सभोवताली गुंफून बाहू जणू मायेचे वक्षी कोंदणे
स्पर्शूनी जाई माझे गाणे आभाळलेल्या तुझ्या ललाटी
गूज कुजबुजे तुझ्या अंतरी एकाळलेल्या तुझ्याचसाठी
स्वप्नामधूनी विहरत राही, पंखांच्या या क्षितिजावरती
गर्दीमधूनि, माझे गाणे, फिरे सदोदीत तुझ्याभोवती
बोल हृदयीचे छेडूनि जाई, असीम असत्या सीमेवरती
अंधारलेल्या काजळराती, माझे गाणे, ध्रुव दाखवी
तुझ्या दिसावे नयनी गाणे, माझे गाणे… माझे गाणे…
जुळून यावे सूर अंतरी, तुझे नि माझे एकच गाणे…
निजतील माझे डोळे जेव्हा, संपेल माझ्या मुखी तराणे
तुझ्या वसावे हृदयी निरंतर, माझे गाणे… माझे गाणे…
© श्रीनिवास नार्वेकर (१७ मार्च २००९ मध्यरात्री ३.२६ वा.)