गडद सावळया मन डोहावर
मेंदू धीवर टपला आहे
खोल तळाशी आठवणींचा
गहिवर मीन तो लपला आहे
गडद सावळया मन डोहावर
प्राक्तन उंबर झुकला आहे
ओल मुळांशी मुरली तरीही
नवथर हंबर सुकला आहे
गडद सावळया मन डोहावर
किरण आशेचे नाचत आहे
फिकट ललाट लाटांवरती
काळ सावली साचत आहे
गडद सावळया मन डोहावर
निळा चांदवा पसरत आहे
बिंब स्वतःचे निरखित हरपीत
धरती घिरटी विसरत आहे
गडद सावळया मन डोहावर
जीवन नक्षी तरंगत आहे
पैलतीराची ओढ लागूनी
स्वप्नील पक्षी खंगत आहे
- राजेश देशपांडे