रणरणत्या वैशाखात
जीवघेण्या महामारीच्या वणव्यात
बेरोजगारी, हेवेदावे, भांडणाच्या कल्लोळात,मृत्युंच्या तांडवात….
कधी जर आला ना “मी “…
तर असू द्यावी एक लेखणी अन कागद हाताशी….
कारण… “मी”साक्ष देत असतो,
तुमच्या तक्रारींच्या गोंगाटापेक्षा
जमिनीवर, छतावर पडणारा माझा “टप टप टप टप ” आवाज अजूनही मधुर आहे!
बिंबवत असतो “मी”सदैव,
अजून तरी मी पडल्यावर मातीचा वास घेण्यासाठी.. तुम्हांला कोणत्याही “मास्क” ची सक्ती नाही बरं….!
आणि हो… तुमच्या त्या ऑक्सिजन अन रेमडेसिवीर सारखा काळाबाजार ही नाहीये हं ईथं…!
घ्या… श्वास भरून, छाती भरून घ्या… अगदी फुकटाय..!
हां.. पण एक अटाय…
मातीच्या गर्भात बाणासारखं रुतून मृदगंधाचे मोती जसे मी हवेत पसरवलेत ना….
तसंच… अगदी तसंच.. तुम्ही पण खोल रुतून श्वास घ्या अन बघा आसपास होकाराचे कण उधळता येतायत का ते…!!!
लोक… विशेषतः बातम्यांमधले लोक… विटंबना करतात माझी
अवकाळी म्हणून…!
दाखवतात गावभर माझ्यामुळे झालेली पडझड, नुकसानं..
पण… तुमच्या मूल्यांची, नात्यांची, माणुसकीची झालेली पडझड मीही पाहतोच आहे की…!!!
तुम्ही (म्हणे )निर्माण केलेल्या गोष्टींची भरपाई तुम्ही सरकारकडे तरी मागता….
मी (खरंच )निर्माण केलेल्या गोष्टींची तुम्ही राखरांगोळी केलीत, करताहात…. मागितलीय मी त्याची नुकसान भरपाई कोणाकडे आजवर?
गधड्यांनो… अवकाळी नैये मी
ठरवून ह्या भीषण परिस्थितीत गाडून घेतोय स्वतः ला मातीत!
म्हणूनच आत्ता कधीतरी कोसळत असेन ना मी… तर अवकाळीचं लेबल लावण्यापेक्षा….
असावी एखादी लेखणी अन कागद हाताशी….
म्हणजे तरी मला काय म्हणायचंय ते टिपता येईल तुम्हांला…!
नैतर काय… “बैल गेला अन झोपा केला ” वृत्ती आहेच तुमची…. असो!!!!!
बघा काही जमतंय का ते…??!!
©️ राहुल कुलकर्णी