सुन्न गात्रांतून उमटतो
अदृश्यतेचा खोल हुंकार….
फिरत राहतो
तना-मनात
अतृप्त आत्म्यासारखा…
बसून राहतो मानगुटीवर….
व्यापून राहतो भवतालच्या अवकाशाला
भूतकाळाची आठवण देत..
वर्तमानाच्या समंधाशी
झगडा करीत
झुलत राहतो
भविष्याच्या पिंपळावर….
घुसमटत राहतो हुंकार
क्षणाक्षणाने काळीज चिरीत जाणार्या
कैफासारखा….
कैफ…
आठवणींचा….
कैफ…
भूताचा….
कैफ…
काचेच्या वर्तमानाचा….
कैफ…
कैक झोक्यांचा….
कैफ…
वाढत्या ठोक्यांचा….
कैफ…
मदमस्त कैफाचा,
श्वासांच्या,
दीर्घ पाण्याच्या तुकड्यावर
जणू काही अधांतरी हिंदकळणार्या
शीड तुटलेल्या जहाजासारख्या…
सुन्न गात्रांतून उमटतो
उत्कट प्रीतीचा गहिंवर
आर्त हृदयातून निघालेल्या
खोल हुंकारासारखाच…
अवकाशात भरुन राहीलेली
सुन्न हुंकारांची शांतता….
भयाण…
भीषण…
आणि
एका क्षणी अचानक
फडफडत जाते टिटवी
निसंदिग्ध भविष्याची….
हुंकार तसाच…
खोल…
अदृश्य….
सुन्न गात्रांतून उमटणारा……
- श्रीनिवास नार्वेकर©